कांदा मार्केट परिसरातील गटारींचे काम कधी पूर्ण होणार?
बेळगाव : कांदा मार्केट परिसरात मागील तीन महिन्यांपासून गटारींचे बांधकाम ठप्प आहे. काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. रात्रीच्यावेळी गटारीमध्ये पडून नागरिक जखमी होत आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या रविवार पेठ, कांदा मार्केट परिसरात मागील काही महिन्यांपासून गटारींचे बांधकाम केले जात आहे. जुन्या गटारी काढून त्याठिकाणी नव्या गटारी बांधण्यात येत आहेत. परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. सध्या सण-उत्सव, लग्न सराईमुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. केवळ बेळगावच नाही तर गोवा, गोकाक, कोकणातील खरेदीदार शहरात येत आहेत. त्यांना या गैरसोयीचा फटका बसत आहे. कांदा मार्केट येथे रस्ते अरुंद असल्यामुळे गर्दीच्या वेळी ये-जा करणे अवघड होते. अशातच गटारींचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत असल्यामुळे गटारीचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.