मोकाट कुत्र्यांचा उपद्व्याप थांबणार तरी कधी?
शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर : बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास देखील आता घाबरत आहेत. कुत्र्यांच्या कळपाकडून लहान मुले, वयोवृद्ध, महिलांवरील हल्ले वाढले असल्याने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर, वयोवृद्ध आणि महिलांवर यापूर्वी कुत्र्यांच्या कळपाकडून हल्ले झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्यांचाही पाठलाग करून त्यांचा चावा घेतला जात असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. वडगाव, अनगोळ, टिळकवाडी, गँगवाडी, गणेशपूर, हिंडलगा, सदाशिवनगर, जाधवनगर आदी ठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने ते कधी कोणावर हल्ला करतील त्याचा नेम नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, वृद्धांसह सर्व वयोगटातील लोक रस्त्यावरून चालत जाताना देखील आता घाबरत आहेत.
एक कोटी रुपये राखीव
मनपाच्या अर्थसंकल्पात भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी लाख रुपयांची तरतूद केली जाते. 2024 मध्ये 1 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरी देखील मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेला अपयश आले आहे.
गतवषी 3183 जणांना कुत्र्यांचा चावा
गतवषी 3183 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही आकडेवारी पाहता दर महिन्याला सरासरी 250 ते 270 जणांचा कुत्र्यांकडून चावा घेतला जात असल्याने ही गंभीर बाब बनली आहे.
एबीसी सेंटर सुरू करणार
शहरात 40 हजारांहून अधिक मोकाट कुत्री आहेत. त्यापैकी 2000 कुत्र्यांची निर्बीजीकरण करण्यात आले आहे. सध्या असलेले एबीसी केंद्र स्थलांतरित करण्यासाठी जनतेतून मागणी केली जात आहे. त्यामुळे नजीकच्या बायोमेडिकल जागेत एबीसी सेंटर सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेल्याना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
-शुभा बी. मनपा आयुक्त
मोकाट कुत्र्यांचे केले जाणार निर्बीजीकरण : महापालिकेचा पुढाकार, मागवल्या निविदा
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महानगरपालिका पुढे सरसावली आहे. यासाठी निविदा मागवली असून ठेकेदार निश्चित झाल्यानंतर कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. मनपाच्या निर्णयामुळे बेळगावकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कुत्र्यांच्या कळपाकडून शालेय विद्यार्थ्यांसह वृद्ध व महिलावर्गावर हल्ले करून चावा घेतला जात आहे. दरवर्षी अनेक जण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांना घराबाहेर पडण्यास देखील कठीण झाले आहे. शहरात 40 हजारांहून अधिक मोकाट कुत्री असल्याची नोंद महापालिकेकडे आहे.
मात्र, यापैकी केवळ 2 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण थांबले असल्याने झपाट्याने मोकाट कुत्र्यांची पैदास वाढत आहे. दरवर्षी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात लाखो रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, त्या निधीचा योग्य विनियोग होत नसल्याने कुत्र्यांची समस्या जैसे थे आहे. गतवर्षी शहर आणि उपनगरात तब्बल 3 हजारहून अधिक जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बेळगावकरांतून केली जात आहे. शहरातील मोकाट कुत्री पकडून ती बाहेर सोडण्याचा प्रस्ताव देखील होता. मात्र, आता मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. मनपाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून निविदा मागवण्यात आली असल्याने 20 फेब्रुवारी 2025 ही निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.