शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार कधी?
बेळगावच्या समस्यांचा ‘तोच तो’ पाढा वाचून नागरिक वैतागले : शहराच्या प्रवेशद्वारासह वर्दळीच्या रस्त्यांचीही अक्षरशा चाळण, प्रशासनही ढिमच
तरुण भारत टीम/बेळगाव
तेच बेळगाव... तोच पाऊस... तेच रस्ते... तेच खड्डे... तेच पडणे... तेच धडपडणे... प्रशासनाच्या नावे शिमगा करणेही तेच... अन् त्याकडे साफ दुर्लक्ष करणेही तेच... तेच उदासीन नागरिक... आणि तेच आंदोलन... तीच मलमपट्टी... तीच डागडुजी... आणि पुन्हा गत तीच... डोकेदुखीही तीच...
ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या ‘तेच ते’ या कवितेतील ओळीप्रमाणे बेळगावच्या समस्यांचा ‘तोच तो’ पाढा वाचून लोक वैतागले आहेत. याचे कारण म्हणजे बेळगावच्या रस्त्यांची झालेली दयनीय आणि तितकीच बकाल अवस्था. शहर परिसरातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा एकही रस्ता खड्डेमुक्त किंवा डबकीमुक्त राहिलेला नाही. हे चित्र काही नवे नाही. परंतु दुर्दैवाने या समस्येवर ठोस उत्तरही शोधले जात नाही.
‘तरुण भारत’ टीमने संपूर्ण शहराचा फेरफटका मारला असता, जे चित्र समोर आले ते अत्यंत खेदजनक आहे. शहरातील उड्डाणपुलांच्या दुरवस्थेबद्दल सर्वप्रथम ‘तरुण भारत’ने वृत्त दिले. त्यानंतर ठिकठिकाणी आपल्या परिसरात झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल लोकांनीही तक्रारी दिल्या. काही संघटनांनी संस्थांनी निवेदनेही दिली. परंतु खंत यांचीच आहे की या निवेदनानंतर पुढे काहीच होत नाही. रेल्वेस्थानक, बसस्थानक, महत्त्वाचे चौक, शहराचे प्रवेशद्वार किंवा अन्य वर्दळीचे ठिकाण असो, रस्त्यांची चाळण झालेलीच आहे.
पावसाळ्यापूर्वी, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी ही मागणी दरवर्षीचीच आहे. एकदा पक्का रस्ता करून दिला तर दरवर्षी या तक्रारी उद्भवणार नाहीत. असे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वाटत नाही का? त्यांच्या कामावर त्यांचाच विश्वास नाही का? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत, महापौर-उपमहापौर आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी कोण पुढे येणार? हा प्रश्न आहे.
सरकारी-खासगी संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव
दुर्दैवाने सरकारी व खासगी संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. पालिकेने रस्ते तयार केले की पाणीपुरवठा मंडळ जलवाहिनीसाठी रस्ता खोदते, पुन्हा रस्ता झाला की गॅस पाईपलाईनसाठी रस्ता खोदला जातो. त्यानंतर पुन्हा केबल वायर घालण्यासाठी, कधी चोवीस तास पाण्याच्या पाईपलाईनसाठी अशा एक ना अनेक कारणास्तव रस्ता खोदलाच जातो. जर या सर्व विभागांमध्ये समन्वय साधला गेला व एका प्रभागाचे काम पूर्ण होईपर्यंत दुसरीकडे खोदकाम केले गेले नाही तर थोडी तरी सुसूत्रता येईल. आज परगावाहून जर कोणी बेळगावला आले तर त्यांना आपले बेळगाव अभिमानाने दाखवावे अशी परिस्थिती नाही.
गांधीगिरी पण तिही तेवढ्यापुरतीच
शहरात अनेक संघ-संघटनांबद्दल आदर असूनही या संघटना आंदोलन करून निवेदन देतात पण पाठपुरावा करण्यात कमी पडतात. मग खड्ड्यात झाडे लावणे, कधी विद्यार्थ्यांनीच मुरुम टाकणे अशी गांधीगिरी होते पण तिही तेवढ्यापुरतीच, हे नम्रपणे नमूद करावे असे वाटते. गट-तट, पक्षीय मतभेद विसरून ज्या दिवशी बेळगावकर रस्त्यासाठी अभूतपूर्व आंदोलन करून अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला सळो की पळो करून सोडतील त्या दिवशी या शहराच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. फक्त ते सुद्धा दिवास्वप्न ठरू नये.
नागरिकांच्या सोशिकतेची परिसिमाच
सध्या वाहतूक पोलीस दुचाकी आणि चारचाकी चालकांना अडवून कागदपत्रे तपासणे, दंड ठोठावणे यामध्ये व्यस्त आहेत. परंतु रस्त्यांची चाळण झालेल्या रस्त्यांवर वाहन हाकताना पाठ आणि शरीरातील इतर हाडे मोडत आहेत, त्याची जबाबदारी ना मनपा घेते, ना पोलीस प्रशासन घेते. नागरिकांच्या सोशिकतेची ही परिसिमाच म्हणावी लागेल.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था किती आहे याची सचित्र झलक पहा व विचार करा.