ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा दूर होणार?
अधिकृत दर जाहीर न करता गाळपाला सुरुवात : शेतकऱ्यांत तीव्र नाराजी : उसाला किमान 3200 ते 3800 दर देण्याची मागणी
बेळगाव : यंदा अतिवृष्टी, पिकांवर पडलेला रोग यामुळे पीकहानीशी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ऊस पिकासंदर्भात काही समस्या भेडसावत आहेत. ऊसतोड, वाहतुकीचा दर निश्चित न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्याशिवाय राज्यातील साखर कारखाने उसासाठी अधिकृत दर जाहीर करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने ऊस उत्पादकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात 76 कारखाने असून त्यापैकी 56 कारखान्यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ऊस गाळपाला सुरुवात केली. मात्र आतापर्यंत कोणत्याच साखर कारखान्याने रिकव्हरी (साखरेचा अंश), ऊसतोडणी, वाहतूक (एच अॅण्ड टी) व आधारभूत किंमत (एफआरपी) जाहीर केली नसल्याने उसाला चांगला दर मिळेल या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. अलीकडेच केंद्र सरकारने संबंधित प्रदेशातील उसाच्या दर्जावरून प्रतिटन 3100 ते 3400 रु. दर घोषित केला आहे. मात्र साखर कारखान्यांनी हे मान्य करून दराची घोषणा केलेली नाही. शिवाय ऊस तोडणी व वाहतुकीसह प्रतिटन उसाला किमान 3200 ते 3800 दर द्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. पण ही मागणी साखर कारखाने मान्य करण्यास तयार नाहीत.
कारखान्यांनीच शेतकऱ्यांच्या जमिनीत जाऊन ऊसतोड करावी की शेतकऱ्यांनी ऊसतोड करून कारखान्याला न्यावा, यावर अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे साखर कारखाने एच अॅण्ड टी नावाने प्रतिटनास अंदाजे 720 ते 1050 रुपयापर्यंत कपात करीत आहेत. तसेच 8 ते 15 कि. मी. दूरच्या ऊस वाहतुकीला व 100 कि. मी. दूरवरून उसाची वाहतूक करणाऱ्यांना कारखाना एकच दर देत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. कारखान्यांच्या चुकीमुळे ऊस उत्पादकांचे प्रतिटनास 450 ते 760 रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. त्यामुळे कारखान्यांनी याची शहानिशा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.
साखर कारखान्यांच्या समस्या
कामगारांचे वेतन, सुविधा, भाडेतत्त्वावर वाहने घेणे, कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था करणे, त्यांच्या निवासाची सोय या सर्व बाबी अधिक खर्चिक ठरल्या आहेत. ऊस उत्पादन व वाहतुकीचा खर्च 25 टक्क्यांनी वाढला आहे. बाजारपेठेत साखरेच्या दरात चढ-उतार होत आहे. उसापासून उपउत्पादने तयार करण्याचे विभाग स्थापन करणे, बाजारपेठेची व्यवस्था करणे यासाठी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. बँकांचे व्याज भरणे अशा अनेक समस्यांना साखर कारखान्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची दखल घेतच उसाला दर जाहीर करावा लागतो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या समस्या जाणून घेऊन सहकार्य करावे, असे कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी म्हटले आहे.