येळ्ळूर प्रभाग पाचमधील समस्या कधी दूर होणार?
तानाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्या गटारी साफ : कार्यकर्त्यांचे कौतुक
वार्ताहर/येळ्ळूर
येळ्ळूर प्रभाग 5 मध्ये गटारी, रस्ते, पाणी यासारख्या अनेक समस्या असून, त्या कधी दूर होणार, अशी विचारणा ग्रामस्थांनी केली आहे. या प्रभागात विराट गल्ली, तानाजी गल्ली, मारुती गल्ली मल्लिकार्जुन गल्ली व नेताजी गल्लींचा समावेश होतो. तानाजी गल्लीसह इतर गल्ल्यांतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या दोन्ही बाजुंच्या गटारी तुंबल्या असून, पाण्याचा निचरा होत नाही. ठिकठिकाणी सांडपाणी बाहेर पडून दुर्गंधी सुटली असून, वेळोवेळी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कानाडोळा केल्यामुळे तानाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज पुढाकार घेत गटारी साफ करण्याचे काम हाती घेतले. त्यात महेश घाडी, बजरंग बिर्जे, सुनील घाडी, प्रभाकर बेडके, दीपक घाडी, ओमप्रकाश घाडी, सचिन घाडी, दीपक भातकांडे आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
तानाजी गल्ली, विराट गल्ली व मारुती गल्लीमधून शिवार रस्त्याने अनगोळमार्गे उद्यमबागला जाण्याचा जवळचा मार्ग असून, कामगारवर्गासह शेतकऱ्यांची मोठी ये-जा असते. तानाजी गल्लीत ठिकठिकाणी माती, लाकूड व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय विद्यार्थी खेळण्यासाठी रस्त्यावर आणि कामगार व शेतकरी घरी परतण्याची वेळ एकसारखीच असल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो. याच गल्ल्यांतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, रस्ता नावालाच आहे. रस्ता उखडून खड्डेमय झाला असून डांबरीकरणाचा पत्ताच नाही. पिण्याच्या पाणीपुरवठ्याची हीच स्थिती असून कमी दाबाचा पुरवठा आणि दोन दिवसानंतर येणाऱ्या पाण्यामुळे महिलांचा सकाळचा वेळ नळावरच जातो. पदरात मात्र सात-आठ घागरी पाणी आणि वादावादी मात्र नित्याचीच झाली आहे.
ग्रामपंचायतीने समस्या त्वरित सोडवाव्यात
या प्रभागातून तीन प्रतिनिधी निवडून दिले असून, निवडून गेल्यापासून आजतागायत आपल्या प्रभागात समस्या जाणून घेण्यासाठी एकही दौरा नाही की समस्या निवारण नाही. ग्रामपंचायत अध्यक्षा, पीडीओ, प्रभाग सदस्य यांनी तात्काळ या भागाचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रभाग पाचमधील युवक मंडळांनी आणि नागरिकांनी केली आहे.