वीजपुरवठ्यातील समस्या कधी सुटणार ?
सांगरूळ / गजानन लव्हटे :
वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या तारा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि लो होल्टेज या समस्यांचे निराकरण करून वीज महावितरण ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा कधी देणार? असा प्रश्न ग्राहकांतून व्यक्त होत आहे.
विजेचा शोध जगाच्या विकासातला महत्त्वाचा घटक मानला जातो. मानवाच्या दैनंदिन जीवनात अनेक बाबतीत विजेवर अवलंबून राहावे लागते. विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात आजही महावितरणकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
- वाकलेले व गंजलेले खांब
ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी पूर्वीचे खांब आहेत. काही खांब गटारीतच असल्यामुळे ते जमिनीलगत गंजलेले आहेत. त्यामुळे असे खांब वाकलेले असल्याचे पहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी असे खांबा चौकाच्या ठिकाणी आहेत. यावरून वाहणाऱ्या विद्युत वाहक तारा जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. त्यामुळे या धोकादायक आहेत.
- वीज वाहक तारांचे जमिनीपासून अंतर कमी झाले
पूर्वीच्या काळी खांब बसवताना नियमानुसार त्याची उंची ठेवल्याने तारासुद्धा जमिनीपासून उंचीवर होत्या. ग्रामीण भागात खांब बसवल्यानंतर अनेक वेळा गावातील मेन रोड आणि गल्लीबोळातीलही रस्त्यांची उंची वाढली. त्यामुळे जमीन आणि तारा यामधील अंतर कमी होत गेले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची उंची वाढली, त्या ठिकाणी रस्ता आणि तारा यांच्यातील अंतर खूपच कमी झाल्याने धोक्याचे झाले आहे. तारा लूज पडल्याने त्या एकमेकीना चिकटल्याने शॉर्टसर्किटचे प्रकार घडत आहेत.
- लो होल्टेज मोठी समस्या
दिवसेंदिवस घरोघरी विजेवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्या साधनसामग्रीवर मागणी एवढा वीजपुरवठा करणे शक्य नसल्याने लो होल्टेजची समस्या निर्माण झाली. ग्रामीण भागात घरगुती पिठाची गिरणी, जनावरांच्या गोठ्यामधील कडबाकुट्टी मशीन, फॅब्रिकेटर व्यवसायातील वेल्डिंग, कटिंग व ड्रिलिंग मशीनची संख्या वाढत गेल्याने सायंकाळी ग्राहकांना लो व्होल्टेजचा सामना करावा लागतो. एलईडी बल्बसुद्धा पूर्ण क्षमतेने घरामध्ये प्रकाश देऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे.
- दर्जेदार कामाची वाणवा
पूर्वी महावितरणकडून वापरले जाणारे खांब आणि विद्युत वाहक तारा दर्जेदार होत्या. पूर्वीच्या खांब बसवताना दगड, सिमेंट, वाळूचा वापर केला जात होता. जमिनीच्या वर दोन-अडीच फूट खांबाच्या भोवताली कॉंक्रिटीकरण केले जात होते. त्यामुळे खांबाचे आयुर्मान जास्त होते. सध्या ठेकेदारांमार्फत काम करून घेतले जात असल्याने अनेक ठिकाणी खांब फक्त जमिनीत खड्डा खणून बसवला जातो आणि तेथील उपलब्ध माती, मुरूमाद्वारेच त्याचे फिटिंग केले जाते. यामुळे त्याची उभारणी मजबूत होत नाही.
- महिन्याला वीज बील तरीही
पूर्वी सहामाहीनंतर तिमाही वीज बिले वसूल केली जात होती. तरीही वीज मंडळाकडून वीजपुरवठा दर्जेदार केला जात होता. सध्या बिलांची वसुली महिन्याला केली जाते. बिलाचे पैसे महिन्याला मिळून सुद्धा महावितरण कडून योग्य प्रकारे ग्राहकांना वीजपुरवठा केला जात नाही.
- घरगुती वीज पूर्ण क्षमतेने द्यावी
विजेवर चालणाऱ्या उपकरणांची संख्या घरोघरी वाढत आहे. वीजपुरवठा मात्र आहे त्या साधनसामग्रीवरच केला जातो. त्यामुळे सायंकाळी घरामधील एलईडी बल्ब सुद्धा पूर्ण क्षमतेने प्रकाशित होत नाहीत. त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो. महावितरणने सर्व्हे करून घरगुती विजेचा पूर्ण क्षमतेने पुरवठा करून ग्राहकांना दिलासा द्यावा
-लहुजी सासणे, संचालक, दत दूध संस्था, सांगरुळ
- वाहन चालकांना त्रास
ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावरसुद्धा वीज वाहक तारा जमिनीपासून खूप कमी अंतरावर आहेत. ऊस वाहतुकीच्या काळात उसाच्या ट्रॉलीला अनेक ठिकाणी या तारा अडकतात. यातून ऊस वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी वाळके गवत आणि कडबा वाहतूक करताना वीजवाहक तारांना स्पर्श झाल्याने ट्रॉलीतील गवत जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महावितरणने लोंबकळणाऱ्या तारांची उंची वाढवून वाहनचालकांना दिलासा द्यावा.
- दत्तात्रय मगदूम, ऊस वाहतूक ट्रॅक्टरचालक