‘एलसीबी’ला जमिनीवरचं कधी दिसणार?
कोल्हापूर / संतोष पाटील :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) दर आठवड्यात अक्षरश: किलोत गांजा सापडतो. आश्चर्याची बाब म्हणजे शहरातील गर्दीच्या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या गांजाच्या पुड्या दिसत नाहीत. गांजासह गल्लोगल्लीचे फाळकुटदादा, अवैध सावकारी, घरफोडी, चेनस्नॅचरवर पायबंद घातल्याचे दिसत नाही. किलोतील गांजा आणि गाडीचोर, अपघाताने सापडलेल्या चोरीचे मार्केर्टिंग यापलिकडे हवेतील ‘एलसीबी’ला जमिनीवर अवैध प्रकार दिसतील काय? हा खरा प्रश्न आहे.
गेल्या काही महिन्यापासून पोलिसांना मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला गांजा सापडत आहे. कधी एक किलो, कधी तीन किलो, कधी गांजा पिकवणारी शेती, ही तशी धडाकेबाज समजणाऱ्या ‘एलसीबी’ नजरेत भरणारी कामगिरी म्हणावी लागेल. गांजाच काय, वेळोवेळी दुचाकी चोरटे अन् भुरट्या चोरांकडून सोने वसुलीची किमयाही एलसीबी करत असते. ‘एलसीबी’ म्हणजे जिल्हाभर कार्यक्षेत्र. ना पोलीस ठाण्याच्या हद्दीची मर्यादा, ना कारवाईसाठी कुणाच्या परवानगी गरज. असा पॉवरफुल विभाग म्हणजे पोलीस दलाचे नाक, कान, डोळेच जणू. अशा रुबाबदार विभागाचा खिसाही तितकाच मोठा अन् वजनदार असल्याची चर्चा सहज कानावर पडते, असो.
जिह्यातील ‘एलसीबी’ धडाकेबाज कामगिरी करण्यात माहीर असल्याची अनेक उदाहरणं देता येतील. रोज किमान दोन ते चार कारवाया ‘एलसीबी’कडून होतातच. चंदगडपासून शिरोळपर्यंत आणि कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यात म्हणे ‘एलसीबी’चे अगदी स्ट्राँग नेटवर्क आहे. तगडे नेटवर्क आहे म्हणून तर इतक्या कारवाया हा विभाग करत असावा. मग कुणी याला कारवाई म्हणो अथवा कारनामे. ‘एलसीबी’ विभाग तसा अॅक्टिव्हच म्हणावा लागेल. असा अत्यंत गुणी आणि कार्यक्षम विभाग मग किरकोळ गोष्टीकडे कशाला लक्ष देईल? बडे आणि तगडे मासांची शिकार अंगवळणी पडल्याने सर्वसामान्यांच्या नजरेस पडणाऱ्या गांजा विक्रीसारख्या तुच्छ गोष्टीकडे या विभागाने का म्हणून लक्ष द्यावे.
दर काही दिवसांनी किलोत गांजा पकडणाऱ्या ‘एलसीबी’चे जिल्हाभर आणि शहरातील पानटपऱ्यावर, चौकात थांबणाऱ्या व्हॅनमधून पुडीतून विक्री होणाऱ्या गांजाकडे होणारा कानाडोळा बुचकळ्dयात टाकणारा आहे. किलोत गांजा पकडायची सवय लागल्यामुळे कदाचित पुडीतील गांजा स्थानिक पोलीस ठाण्याने पहावा, असा प्रघात असू शकतो. ‘एलसीबी’ पोत्यानं पकडते आणि ठाणेदार चिल्लरमध्ये, असाच हा प्रकार असावा.
पुडीतील गांजा कोल्हापूरचं सामाजिक स्वास्थ हरवत आहे. स्वस्त आणि सहज उपलब्धता होत असल्याने ही ठिकाणे तर नशेबाज तरुणाईचे हॉटस्पॉटच आहेत. तरुणाईला गांज्याच्या धुराची गुंगी कमी पडू लागल्यानेच नशा वाढवण्यासाठी झुरक्याच्या जोडीला अनेक प्राणघातक औषधांचा वापर होत आहे. या नशेबाज तरुणाईवर त्यांच्या कुटुंबासह यंत्रणेने वचक न ठेवल्यास अल्पावधीत कोल्हापूरचा उडता पंजाब झाल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूरचा उडता पंजाब होऊ दे, नाही तर ‘डुलता अँड झिंगता कोल्हापूर‘! हवेत असणाऱ्या ‘एलसीबी’ला त्याचे सोयरसुतक असण्याचे कारणच नाही, हे मात्र खरे.
- उपकाराचे ओझे...?
मागील काही महिन्यांपासून दहा किलोपासून अगदी 90 किलोपर्यंत विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांना सापडत आहे. याचा अर्थ गांजाची मागणीही वाढली आहे. विक्रीसाठी आणलेला गांजा पकडण्यात पोलिसांना यश येत आहे. मात्र ज्या ठिकाणी विक्री होते, ती ठिकाणे बहुसंख्य नशेबाजांना माहिती आहेतच, सर्वसामान्य कोल्हापूरवासीय ती दाखवतील. खुलेआम येथे विक्री होते, तरीही पोलीस यंत्रणा कारवाई का करत नाही, केली तरी यावर नियंत्रण का आणू शकत नाही, हा प्रश्न अचंबित करणारा आहे. एकतर कारवाई करण्याची मानसिकता नाही किंवा यावर यंत्रणेचा वचक राहिलेला नाही. या पुडीतून गांजा विक्री करणाऱ्यांच्या अशा कोणत्या उपकाराच्या ओझ्याखाली यंत्रणा आहे? अगदी 30 रुपयांपासून सहज उपलब्ध होत असताना विक्रीची ठिकाणे यंत्रणेला माहिती नाहीत, असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल.
- अर्थकारण आणि यंत्रणा
गांजाची नशा कमी पडते म्हणून तरुणाई ट्रामॅडॉल आणि इपेड्रीनसारख्या औषधांचा वापर करत आहे. अगदी 20 रुपयात 10 गोळ्या मिळतात. गांजाचे शरीरावर साईड इफेक्ट होतातच, आता या औषधामुळे स्मृतीभ्रंश, पोटविकार, आदी गंभीर आजारांचा सामना नशेबाज तरुणाईला करावा लागणार आहे.
- नशेबाजीला आवर घाला
जिह्यात गांजा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. शांत आणि समृद्ध शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. पण गांजा, चरसबरोबर आता कोकेनसारखे ड्रग्स खुलेआम पुरवणारे रॅकेट तयार झाल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. अशा अंमली पदार्थांची उपलब्धता करून देऊन कोल्हापूरला टार्गेट केले जात आहे का ? असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तींना पायबंद घालावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा दोन महिन्यांपूर्वीच दिला होता.
सतेज पाटील, आमदार