शिवाजीनगर येथील बोळांमधील स्वच्छता कधी?
महापालिकेचे दुर्लक्ष, कचऱ्यांमुळे वाढते दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याला धोका
बेळगाव : शिवाजीनगर तिसरी गल्ली येथील बोळांमध्ये मागील अनेक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नाही. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला आहे. तसेच मंगळवारी झालेल्या पावसामुळे गटारी तुंडुब भरल्या असल्याने महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. तिसरी गल्ली येथील बोळांमध्ये स्वच्छता करावी, यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन ते तीन वेळा संपर्क साधण्यात आला. कामगार उपलब्ध झाल्यास स्वच्छता करण्यासाठी पाठवून देऊ, असे आश्वासन देण्यात आले. परंतु या ठिकाणी कर्मचारी अथवा अधिकारी फिरकलेच नाहीत. मागील वर्षी ‘तरुण भारत“मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच मनपा प्रशासनाला जाग आली होती. त्यानंतर त्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. आता पुन्हा एकदा कचरा साचला आहे. कचरा उचल झाली नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ या ठिकाणचा कचरा उचल करावा, अशी मागणी केली जात आहे.