सीएचबी ग्रंथपालांचा तास अन् तासिकाचा तिढा सुटणार कधी?
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत तासिका तत्वावरील (सीएचबी) ग्रंथपालांना मात्र नवीन नियमानुसार मानधन दिले जात आहे. ग्रंथपालांना तास आणि तासिका तत्व चुकीच्या पध्दतीने लागू केला. नियमानुसार संपूर्ण काम करूनही तास अन् तासिकांमध्ये अडकवून मानधनात राज्य शासनाकडून कपात केली जात आहे. सीएचबी प्राध्यापकांच्याबरोबरीने काम करूनही ग्रंथपालांचा तास अन् तासिकाचा तिढा कधी सुटणार, असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांकडून सीएचबी प्राध्यापकांना तास आणि तासिका तत्वावर मानधन दिले जात होते. त्यामुळे सीएचबी प्राध्यापकांवर वारंवार अन्याय होत होता. परंतू बीएस्सी, बीकॉम, बीएच्या सीएचबी प्राध्यापकांची बिल 60 मिनिटानुसार तर व्दितीय व तृतीय वर्षाची बिल 48 मिनिटानुसार पाठवण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांनी महाविद्यालयांना दिले आहेत. परंतू सीएचबी ग्रंथपालांचे मानधन 60 मिनिटाप्रमाणे काढावे, अशा सूचना न दिल्याने त्यांना जुन्याच पध्दतीने मानधन देण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घेतला आहे. याचच अर्थ राज्य शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येते. परिणामी दर महिन्याला सर्वसाधारण 3 हजार असे वर्षाला 30 हजार रूपये ग्रंथपालांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नवीन शिक्षण सहसंचालक आमच्या मानधनाचा विचार कधी करणार, असा सवाल सीएचबी ग्रंथपालांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाने सीएचबी प्राध्यापकांना 60 मिनिटानुसार मानधन देताना ग्रंथपालांनाही त्याचप्रमाणे मानधन देण्याचे जाहीर केले आहे. परंतू शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांकडून ग्रंथपाल अध्यापनाचे काम करीत नाही, असे कारण पुढे करीत ग्रंथपालांना 48 मिनिटानुसार मानधन दिले जात आहे. परंतू ग्रंथपालांना प्रत्येक पुस्तकाचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचबरोबर पाहिजे ते पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना देवून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. महाविद्यालयाचे ग्रंथालय समृध्द असेल तरच विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास आणि महाविद्यालयाचा शिक्षणाचा दर्जाही चांगला असतो. त्यामुळे जास्तीत जास्त चांगली पुस्तक आपल्या ग्रंथालयात ठेवण्यासाठी नेहमीच ग्रंथपाल धडपडत असतात. प्रत्येकाला बौध्दिक विकासासाठी मदत करणाऱ्या ग्रंथापालांवरच शासन अन्याय करीत असल्याचे बोसलले जात आहे. राज्यभरात शेकडो तर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत किमान 25 ते 30 सीएचबी ग्रंथपाल कार्यरत आहेत. या ग्रंथपालांची होणारी आर्थिक पिळवणूक कधी थांबणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
सीएचबी ग्रंथपालांना 900 रूपये प्रमाणे मानधन द्या
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सीएचबी ग्रंथपालांना आठवड्याला 42 तर महिन्याला 168 तास काम करावे लागते. राज्य शासनाचा आदेश डावलून शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालये 36 तासाचे मानधन 48 मिनिटानुसार देतात. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे 36 तासाचे 900 रूपये प्रमाणे मानधन मिळावे, या मागणीचे निवेदनया मागणीचे निवेदन सीएचबी ग्रंथपालांनी कोल्हापूर विभागीय उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालकांना दिले आहे.
महेश केसरकर (जिल्हासचिव, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ)