For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनखाते हत्तीचा बंदोबस्त करणार तरी कधी?

11:14 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
वनखाते हत्तीचा बंदोबस्त करणार तरी कधी
Advertisement

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल, सीमाहद्दीत धुडगूस सुरूच : हत्ती अद्याप सीमहद्दीतच, दिवसभर डोंगर परिसरात

Advertisement

बेळगाव : मागील पंधरा दिवसांपासून सीमाहद्दीत दाखल झालेल्या हत्तीकडून आता शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. बेकिनकेरे येथील मल्लाप्पा भातकांडे यांच्या शेतातील केळी आणि नारळाच्या झाडांचे हत्तीने नुकसान केले आहे. त्याबरोबर उभ्या पिकात धुडगूस घातल्याने पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे. आजरा येथून एक हत्ती कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर स्थिरावला आहे. त्यामुळे सीमाहद्दीतील बेकिनकेरे, अतिवाड, कौलगे, होसूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर डोंगर परिसरात विश्रांती घेत असला तरी रात्री डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात धुमाकूळ घालू लागला आहे. वनखात्याच्या बेजबाबदारपणामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. मागील पंधरा दिवसांपासून हत्ती स्थिरावला असला तरी वनखात्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना चिंता

Advertisement

परिसरात हत्ती असल्याने शेताकडे जाणेही शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनू लागले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीच्या अंधारात शेताकडे जाऊ लागले आहेत. मात्र, जीव मुठीत घेऊनच पिकांना पाणी द्यावे लागत आहे. चारा-पाण्यासाठी हत्ती शिवारातच उतरू लागला आहे. त्यामुळे शेताकडे कसे जावे? अशी चिंताही शेतकऱ्यांना लागली आहे. वनखात्याने हत्ती स्वत:हून आजरा वनक्षेत्राकडे जाईल, असे आवाहन केले होते. मात्र, अद्याप हत्ती सीमाहद्दीवरच आहे. त्यामुळे वनखाते हत्तीला पिटाळून लावणार का? की हत्ती कायमस्वरुपी सीमाहद्दीवर वास्तव्य करणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

महाराष्ट्र वनखाते मात्र निवांत!

हत्ती पंधरा दिवसांपासून सीमाहद्दीत धुडगूस घालत असला तरी वनखाते मात्र निवांत असल्याचे दिसत आहे. मूळचा आजरा तालुक्यातील हत्ती असल्याने महाराष्ट्रातील वनखाते हत्तीला पकडण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. हत्तीला पिटाळून लावण्यासाठी कोणत्याच उपाययोजना हाती घेतल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दररोज नुकसान होऊ लागले आहे. हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणीही होत आहे.

Advertisement
Tags :

.