For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घसरण कधी थांबणार?

06:08 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
घसरण कधी थांबणार
Advertisement

जबर पडझडीचा जमाना एकदम सुरु झालेला दिसतोय. भांडवल बाजारात पडझड आहे तशीच राजकीय क्षेत्रातदेखील. एखाद्या रोलरकोस्टर राईडप्रमाणे. पण ही झपाट्याने चाललेली सफर वरच जात नाही, गाडी घसरतच चालली आहे. भयावहपणे. ही घसरण कधी थांबणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement

गेल्या 25 वर्षात झाली नव्हती एवढी जबर पडझड सध्या भारतीय भांडवल बाजारात होत आहे. काय करावे हे सामान्य गुंतवणूकदाराला कळेनासे झालेले आहे. गेल्या पंधरवड्यात निफ्टी-50 तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स गडगडत चालला आहे. गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपये गायब झालेले आहेत.  सरकारने कॅपिटल गेन्स टॅक्समध्ये केलेले बदल हटवल्याशिवाय बाजार कधी वर परत येणार नाही. शेअरबाजारातील या ‘रक्तपाता’ विषयी दिलासा देणारे पंतप्रधान काहीतरी बोलतील अशी आशा असणाऱ्या वर्गाला निराशा हाती आली आहे. समाजमाध्यमामध्ये गिरच्या जंगलातील ‘शेरां’ बरोबर (सिंहाबरोबर) त्यांनी आपला फोटो टाकल्याने त्यांनी ‘शेर’ आणि ‘शेअर’ यात गल्लत केलेली आहे अशी फिरकी घेण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अशी पडझड सुरु असताना दुसरीकडे मात्र अतिश्रीमंत व्यक्ती अथवा कुटुंबांच्या संख्येत मात्र 15 ची वाढ झालेली असून देशात अशी 191 गब्बर कुटुंबे आहेत की ज्यांच्याकडे कुबेर पाणी भरतोय. थोडक्यात काय तर अमेरिका आणि चीनच्या खालोखाल भारतात बिलिनियर्सची फौज वाढत आहे. गरिबी कमी होत आहे की नाही हा एक अतिशय वादाचा मुद्दा आहे. गरिबी झपाट्याने कमी होत आहे असे दावे सत्ताधारी करतात तर अदानी-अंबानींच्या ओंजळीने सरकार पाणी पीत असल्याने गरिबांचे हाल कुत्र खात नाही असा विरोधकांचा आरोप आहे. ज्याने त्याने आपापला निष्कर्ष काढावा कारण अलीकडील काळात सरकारकडून फारशी अधिकृत माहितीच उपलब्ध होत नाही.

Advertisement

दुष्काळात तेरावा महिना यावा त्याप्रमाणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही भारतीय मालावर 2 एप्रिलपासून वाढीव व्यापार कर लागू करण्याचे जाहीर करून बाजारातील नैराश्य अजूनच वाढवलेले आहे. भारतासारख्या विकसनशील देशावर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने असे अन्यायकारक धोरण घेतले तरी अजूनतरी मोदी सरकारने त्याविरुद्ध तोंड उघडलेले नाही. अशी कृती अमेरिकेने चीन, मेक्सिको आणि

कॅनडाविरुद्ध केली तेव्हा अमेरिकन मालावर त्यांनी तात्काळ वाढीव आयात कर लावून ‘ठोशास ठोसा’ अशी कारवाई केली आहे. या अशा घटनांमुळे प्रस्थापितांविरुद्ध वातावरण तयार होत नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. पण या वातावरणाचे सोने करणारा कोणीही विरोधक सध्यातरी दिसत नाही आहे हे देखील तेव्हढेच खरे.

सरकारी दावे काहीही असोत पण देशात मंदीची काही लक्षणे दिसू लागली आहेत. टीव्ही सेट, फ्रीज, स्मार्टफोन अशा वस्तूंची विक्री हळूहळू कमी होऊ लागली आहे तर मोठ्या कंपन्यांनी नवीन रिटेल दुकाने काढणे सध्यातरी सोडून दिलेले दिसत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या कंपन्यांचा माल पूर्वीसारखा उठत नाही आहे. गमतीची गोष्ट म्हणजे राजकीय क्षेत्रातदेखील या जबर पडझडीची लागण झालेली दिसत आहे. मायावती यांनी कालपरवापर्यंत ज्याला आपला वारस म्हणून घोषित केलेले होते त्या आपल्या भाच्याला म्हणजेच आकाश आनंदला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून त्यांनी केवळ काढलेच नाही तर त्याची पक्षातून देखील हकालपट्टी केली आहे. आकाशचे वडील आनंद कुमार यांना त्यांच्या जागी नेमले तर त्यांनी मला हे पद नको असे सांगून केवळ पक्षाचा उपाध्यक्ष राहणेच पसंत केले आहे. उत्तरप्रदेशात बसपबरोबर युतीचा प्रस्ताव राहुल गांधींनी मंडला होता तो मायावतींनी केवळ धुडकावलाच नव्हे तर काँग्रेसवर हल्लादेखील केला. एखादा चमत्कार झाला तरच बसपला परत बरे दिवस येणार असे दिसत आहे.

उत्तर प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघणारे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना आव्हानांचा काळ सुरु झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकांत भाजपने घेतलेली भरारी तसेच महाकुंभचा त्याने केलेला वापर याने योगी आदित्यनाथ यांचे पारडे मजबूत दिसत आहे. काँग्रेसची स्थिती सध्यातरी ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशीच आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीतील निवडणूका हरल्यानंतर काँग्रेसला घरचा आहेर मिळू लागला आहे. काल परवापर्यंत काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य असलेले तारिक अन्वर हे बिहारमधील येत्या निवडणूकात पक्षाने चांगली कामगिरी केली नाही तर फार कठीण होईल असे जाहीरपणे सांगितले आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाचे भाजपबरोबर असलेल्या युती सरकारविरुद्ध लोकभावना आहे आणि अशावेळेला काँग्रेसने व्यवस्थीत आघाडी करून बिहार जिंकले नाही तर ‘भगवान ही मालिक हैं’ असे ते एकप्रकारे सुचवीत आहेत.

पंचाहत्तरीला पोहचत असलेल्या नितीशच्या ‘खटारा गाडी’ मुळे बिहारचे नुकसान झालेले आहे. आता युवा नेतृत्वाची गरज आहे असे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव सांगत आहेत. ‘गुजरातचे लोक येऊन बिहारचा विकास कदापिही करणार नाहीत’, असे सांगत ते एकाचवेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना निशाणा बनवत आहेत. भाजपला देखील नितीशची धोंड नको आहे पण तो नसला तर सत्ता मिळणार नाही या भीतीने सध्या दम खाणे सुरु आहे. लोजपचे चिराग पासवान यांनादेखील मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष जणू गायब झालेला आहे. भाजपच्या विजयाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो अथवा शरद पवारांचा राष्ट्रवादी अथवा मिणमिणता काँग्रेस पक्ष हे सारेच हवालदिल दिसत आहेत. फडणवीस सरकार फारसे चांगले करताना दिसत नसले तरी तिला शिंगावर घेणारा कोणी विरोधी नेताच दिसत नाही.

भाजपशासित ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल हा पक्ष तोळामासा झालेला आहे. सत्ता गेल्यावर पटनाईक यांची पक्षावरील पकड सुटलेली आहे. भाजपचे सरकार चांगले काम करत नाही कारण मुख्यमंत्र्याला खाली खेचून त्याच्या जागी बसण्याची कारस्थाने काही वजनदार मंडळी करत असल्याने सरकारातच बेदिली माजलेली आहे. श्रेष्ठींच्या कृपेने पद मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना फारसे कोणी विचारत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. जे पी न•ा यांची मुदत संपल्याने आंध्रमधून पुढील राष्ट्रीय अध्यक्ष आणायचा भाजपचा विचार सुरु आहे. असे घडले तर एकाच घावात बरेच पक्षी मारले जाणार आहेत. अशी नेमणूक केली गेली तर तो एकीकडे चंद्राबाबू नायडू यांना इशारा आहे तर दुसरीकडे एका दक्षिणी राज्यात भक्कमपणे पाय रोवण्याचा बेत भाजपने आखला आहे असा होतो.

तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकार विरोधी लोकभावना वाढत असताना डिलिमिटेशनच्या वादग्रस्त मुद्यावर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे स्वत:ला ‘छाव्या’ प्रमाणे प्रोजेक्ट करत आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये पुढील सहा महिन्यात निवडणूक समझोता होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. केरळमध्ये शशी थरूर यांनी काँग्रेसच्या नाकी दम आणलेला आहे. या दोन्ही राज्यात पुढील वर्षी निवडणूका आहेत.

चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या बंगालच्या ममता बॅनर्जी या भाजप आपल्याविरुद्ध नवीन काय खेळी करणार या चिंतेने बेजार दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाने सारेच प्रादेशिक पक्ष सावध झालेले आहेत. ‘आपली घसरण कशी थांबणार?’ या एकाच चिंतेने त्यांना थकवलेले आहे. आर्थिक प्रश्न तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर होत असलेली केंद्राची कोंडी आणि विरोधी पक्षातील शक्तिपात देशाच्या राजकारणात नवीन वारे वाहवणार काय ते पुढील काळात दिसणार आहे. ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे’, अशी शेखी भाजप आजतरी मिरवत आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.