संकुलात मॅटवरील कुस्तीसाठी प्रशिक्षक नेमणूक कधी ?
शिवाजी विद्यापीठातील सुसज्ज कुस्ती संकुलात मल्लांची कोंडी
कोल्हापुरातील मल्लांना मॅटवरील सरावसाठी बाहेरगावी मोजावे लागतात ज्यादा पैसे
कोल्हापूर: अहिल्या परकाळे
पारंपारिक मातीतील कुस्तीइतकेच बदलत्या काळानुसार मॅटवरील कुस्तीलाही महत्त्व आले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने करोडो रुपये खर्च करून मॅटवरील कुस्ती संकुल उभारले आहे. या संकुलातून जास्तीत जास्त मल्ल तयार करण्याचा मानसदेखील विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आङे. परंतु या संकुलात अद्याप मॅटवरील कुस्तीसाठी लागणाऱ्या तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती मात्र केलेली नाही. त्यामुळे प्रशिक्षकाची नेमणूक कधी होणार? असा प्रश्न केला जात आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केलेली मातीतील कुस्ती जगप्रसिध्द आहे. त्यामुळे शहरातील पेठापेठांमधील तालमींमध्ये देशभरातील पैलवान येवून सराव करतात. ही गोष्ट खरी आहे, कुस्ती हा भारताचा पारंपारिक खेळ आहे, जो देश-विदेशातही खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. कुस्तीमध्ये डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा अतिशय प्रसिध्द आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापुरातील अनेक पैलवानांनी बाजी मारली आहे, हा इतिहास आहे.
मॅटवरील कुस्तीचा सरावाचे प्रशिक्षण कोल्हापुरच्या मल्लांना मिळत नसल्याने शिवाजी विद्यापीठाने सुसज्ज कुस्तीसंकुल उभारले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात या संकुलाचे उद्घाटनही केले. मॅटवरील कुस्ती संकुलाचा वापर करून येथील 10 वर्षापुढील पैलवानांना हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी जाहीर केले होते. परंतू गेल्या पाच महिन्यापासून मॅटवरील कुस्तीला प्रशिक्षकच मिळत नसल्याचे बोलले जात आहे. देशासह महाराष्ट्रातही अनेक मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये सर्वोच्च यश संपादन केले आहे. तरीही विद्यापीठाला योग्य प्रशिक्षक मिळत नसल्याची चर्चा आहे.
शिवाजी विद्यापीठातील कुस्ती संकुल गेल्या पाच महिन्यापासून सरावासाठी खुले करण्यात आले आहे. परंतू प्रशिक्षक नसल्याने येथे कसा सराव करायचा असा प्रश्न आहे. काही प्रमाणात विद्यार्थी सरावासाठी येत असले तरी कुस्तीतील डावपेच शिकवण्यासाठी प्रशिक्षकच नसल्याने सराव करणाऱ्या मल्लांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाजी विद्यापीठाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे यशस्वीपणे नियोजन केले होते. अशा स्पर्धांसाठी विद्यापीठांतर्गत मल्लांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या तालमीत घडलेल्या मल्लांनी देश-विदेशात विद्यापीठासह कोल्हापुरचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तेंव्हा त्या मल्लांना सुविधांसह तज्ञ प्रशिक्षकांची गरज असते. कुस्तीसंकुल असूनही प्रशिक्षक नसल्याने मुंबई, पुण्याला जावून मॅटवरील कुस्तीचा सराव करण्याची वेळ मल्लांवर आली आहे.
प्रशिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे
शिवाजी विद्यापीठातील मॅटवरील कुस्ती संकुलात मल्लांना सराव करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काीह दिवसात नियुक्ती केली जाईल. असे असले तरी काही मल्ल कुस्ती संकुलात सराव करीत आहेत.
डॉ. शरद बनसोडे (संचालक, क्रीडा विभाग, शिवाजी विद्यापीठ)