परीक्षेतील गोंधळ थांबणार कधी? अर्थकारणासाठी होतेय पेपर फुटी
स्पर्धा परीक्षेपासून ते साध्या शिष्यवृत्ती परीक्षेपर्यंत पेपरफुटी उघडकीस
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
स्पर्धा परीक्षेपासून ते अगदी गणित प्रज्ञाशोध परीक्षेपर्यंत काही ना काही गोंधळ होत आहे. गोपनीय असलेल्या परीक्षेत अलीकडे गोपनीय विभागाकडूनच पेपर फुटीचे प्रकार समोर येत असून चुकीचे प्रश्नही येत आहेत. एवढेच नाही तर सारथी सीईटीला सेट परीक्षेचा जुनी प्रश्नपत्रिका जशीच्या तशी आली होती. यामुळे परीक्षेच्या गोपनीय विभागावरच शिक्षण क्षेत्रासह समाजातील प्रत्येक घटकाकडून शंका उपस्थित केली जात आहे. सीईटी परीक्षेच्या तपासात तर गतवर्षी ही शंकेची सुई खरी ठरली असून संर्बधितांवर कारवाईदेखील झाली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणापासून ते प्राथमिकपर्यंतच्या राज्यशासन, विद्यापीठ, युजीसी असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो. ती परीक्षा का फेल जाते. कोठे गफलती व लबाडी होते याचा विचार करण्याची गरज असल्याचे शिक्षण तज्ञांचे मत आहे.
तंत्रज्ञान प्रगत झाल्याने दिल्लीतील माणूस गल्लीतील परीक्षार्थींना सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवतो. या पेपरफुटीमागचे लाखो रूपयांचे अर्थकारण वारंवार समोर येत आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर आता तर मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेचा पेपरही फुटल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यार्थी हुशार असतात परंतू काही विघ्नसंतुष्ट लोकांकडून अप्पलपोटीपणामुळे पेपरफुटीसारखे प्रकार घडत आहेत. या प्रकारांवर राज्य किंवा केंद्र शासन या प्रकारावर निर्बंध घालणार की नाही, असा प्रश्न शिक्षण तज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
आपल्या शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हावेत, यासाठी प्रत्येक शाळा प्रयत्न करीत असते. परंतू काहीवेळा विद्यार्थी लिपिक, शिपाई किंवा शिक्षकांशी जवळीक साधून विद्यापीठाकडून किंवा शासकीय यंत्रणेकडून आलेली प्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रयत्न करतात. गडबडीत काही ना काही चुक होते आणि चोरीचा प्रकार उघकीस येतो. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. अशात झालेली परीक्षा रद्द होते आणि वर्षभर अभ्यास करून पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. संबंधितांवर कारवाई झाली तर गुणवंत विद्यार्थ्यांचा यात काय दोष, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम
सरकारी नोकरीच्या अपेक्षेने हजारो विद्यार्थी घरापासून लांब राहून महिन्याला हजारो रुपये खर्च करुन अभ्यास करतात.सरकारी नोकरी लागली की आपले भविष्य उज्वल अशी त्यांना आशा असते.कोणत्याही शासकीय परीक्षेच्या तारेखेची आणि निकालाची ते चातकासारखे वाट पहातात.पण गेल्या काही वर्षात परीक्षाच झाल्या नाहीत. आता परीक्षा होऊ लागल्या आहेत,मात्र सर्वच परीक्षांचे पेपर फुटून निकाल लांबणीवर पडत आहेत.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे वय निघून जात असून त्यांना आपले भविष्य अंधकारमय वाटत आहे.यातूनच नैराश्य येऊन अनके विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्या आहेत.या विद्यार्थ्यांचा शासनाने विचार करण्याची गरज आहे.
गैरवापर करणारावर कडक कारवाई व्हावी
दोन दशकापुर्वी पेपरचे गट्टे गाडीने जावूनसुध्दा प्रचंड गोपनीयता पाळली जायची. परीक्षाही सुरळीत पार पडायच्या. परंतू आता परीक्षा पध्दत ऑनलाईन करीत टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. ऑनलाईन माध्यमातून पेपर गेल्यानंतर प्रिंटींग होऊन विद्यार्थ्यांच्या हातात जाईपर्यंत व्हॉटसअॅपवरून व्हायरल होतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा गैरवापर करणारावर कडक कारवाई झाली पाहिजे. तरच काही प्रमाणात परीक्षा पध्दतीवर कंट्रोल आणता येईल, असे तज्ञांचे मत आहे.
नैतिक अधिष्ठान भक्कम असणारी माणस परीक्षेच्या कामात असावीत
नैतिक अधिष्ठान भक्कम असलेली माणस परीक्षेच्या कामात असावीत. तंत्रज्ञानाचा वापर करताना जीआरई किंवा तोफेल या परीक्षा पध्दतीप्रमाणे गैरप्रकारांच्या शक्यता दूर केलया पाहिजेत. ऑनलाईन पध्दतीत मानवी हस्तक्षेप आहे तोपर्यंत परीक्षेत गैरप्रकार घडत राहणार.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)