For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरणार कधी रण ?

06:31 AM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
सरणार कधी रण
Advertisement

पश्चिम आशियात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षाने आता केवळ लष्करी सीमारेषा ओलांडल्या नाहीत, तर तो नागरी जीवन, जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांनाही हादरवून सोडत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा प्रश्न समोर येतो तो हे रण कधी सरणार? या संघर्षाची तीव्रता वाढवणारी सर्वात धक्कादायक घटना म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. 1989 पासून इराणच्या सत्तेचे केंद्र असलेल्या या नेत्याचा हल्ल्यात मृत्यू होणे म्हणजे केवळ नेतृत्वाचा अंत नव्हे, तर एका विचारसरणीवर थेट प्रहार आहे. अशा घटनेनंतर इराणकडून तीव्र प्रत्युत्तर येणे अपरिहार्यच होते. त्यामुळेच इराणने आखातातील अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या मित्रदेशांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. या संघर्षाचे स्वरूप आता अधिक धोकादायक बनले आहे. सुरुवातीला लष्करी तळ, क्षेपणास्त्र यंत्रणा आणि रणनीतिक ठिकाणे लक्ष्य केली जात होती. मात्र आता नागरी भाग, ऊर्जा प्रकल्प आणि व्यापारी मार्ग यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. म्हणजेच युद्ध आता केवळ सैनिकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात घुसले आहे. हीच या संघर्षाची खरी भीषणता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत केलेली वक्तव्येही गोंधळ निर्माण करणारी आहेत. एकीकडे ते युद्ध “जवळपास संपलं” असल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे “आणखी कठोर कारवाई” करण्याचे संकेत देतात. या विरोधाभासी भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता वाढली आहे. युद्ध संपवण्याची भाषा आणि युद्ध तीव्र करण्याची कृती या दोन टोकांमध्ये अमेरिका अडकलेली दिसते. त्याचवेळी बेंजामिन नेतन्याहू यांची भूमिका अधिक स्पष्ट आणि कठोर आहे. “जोपर्यंत आवश्यकता आहे, तोपर्यंत कारवाई सुरू राहील.” या वक्तव्याचा अर्थ, इस्रायल या संघर्षाला दीर्घकालीन मोहिमेच्या रूपात पाहत आहे. इराणच्या लष्करी क्षमतेला पूर्णपणे निष्प्रभ करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे दिसते. या सर्व घडामोडींचा परिणाम केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित राहिलेला नाही. पश्चिम आशियातील हवाई क्षेत्र बंद झाल्याने हजारो उ•ाणे रद्द झाली आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास विस्कळीत झाला आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच जागतिक वाहतूक व्यवस्थेला एवढा मोठा धक्का बसला आहे. कतार एअरवेज आणि अमिरात सारख्या विमान कंपन्यांना मर्यादित सेवा सुरू ठेवावी लागत आहे, तर रिपॅट्रिएशन फ्लाईट्सद्वारे नागरिकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे चित्र युद्धाच्या व्यापक परिणामांचे द्योतक आहे. मात्र या संघर्षाचा खरा प्रश्न आहे तो संपेल कसा? हाच. इतिहास सांगतो की, पश्चिम आशियातील युद्धे पटकन संपत नाहीत. कारण ही युद्धे केवळ भूभागासाठी नसतात; ती विचारसरणी, वर्चस्व आणि सुरक्षिततेच्या संकल्पनांवर आधारित असतात. इराणसाठी हे अस्तित्वाचे युद्ध आहे, तर अमेरिका आणि इस्रायलसाठी तो सुरक्षेचा प्रश्न आहे. युद्धाचा कालावधी सहा आठवडे असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी वास्तव वेगळे असू शकते. कारण एकदा संघर्ष नागरी आणि आर्थिक क्षेत्रात पोहोचला की, तो अधिक गुंतागुंतीचा बनतो. ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्यास जागतिक तेल बाजार ढवळून निघू शकतो. त्याचा परिणाम भारतासारख्या देशावरही होऊ शकतो. भारताच्या संदर्भात या युद्धाचे परिणाम अजूनच गंभीर आहेत. देशाची 80 टक्के तेल आयात पश्चिम आशियातील देशांवर अवलंबून आहे. आखातातील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती आधीच 10-15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर पडेल आणि महागाईचा दर पुन्हा एकदा 6 टक्क्यांच्या वर जाऊ शकतो. याशिवाय, दुबई, सौदी अरेबिया, कुवैतसारख्या देशांत काम करणारे सुमारे 90 लाख भारतीय नागरिक धोक्यात आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने आधीच सतर्कता वाढवली आहे आणि रिपॅट्रिएशनसाठी विशेष विमानसेवा सुरू केली आहे. व्यापारी मार्ग बंद झाल्याने भारताची निर्यातही प्रभावित होणार आहे. विशेषत: रसायने, औषधे आणि इंजिनिअरिंग उत्पादनांची शिपमेंट्स विलंबाने पोहोचतील.  देशातील आर्थिक तज्ञ सांगतात की, हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास भारताच्या जीडीपी वाढीवर 0.5 ते 1 टक्क्यांचा फटका बसू शकतो. स्टॉक मार्केटमध्येही अस्थिरता दिसते आहे. शेअर बाजारात ऊर्जा आणि आयात-निर्यातीशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली. याचबरोबर, भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमी शांततेची आणि संवादाची भूमिका घेतली आहे. सर्व बाजूंना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता परिस्थिती अशी आहे की, भारताला आपल्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी नवीन पुरवठा स्रोत शोधावे लागतील. रशिया आणि अमेरिकेशी असलेले संबंध यात उपयुक्त ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे राजनैतिक हस्तक्षेप. संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन देश आणि इतर आंतरराष्ट्रीय शक्तींनी मध्यस्थी करणे आवश्यक आहे. अन्यथा हा संघर्ष आणखी देशांना ओढवून घेईल आणि त्याचे रूप जागतिक युद्धासारखे होण्याची भीती नाकारता येत नाही. “सरणार कधी रण?” या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी अनिश्चिततेच्या धुक्यात दडलेले आहे. कारण युद्ध सुरू करणे सोपे असते, पण ते थांबवणे अत्यंत कठीण असते. प्रत्येक हल्ला हा पुढच्या हल्ल्याचे कारण बनतो आणि सूडाचे चक्र सुरूच राहते. या संघर्षात जिंकणारा कोण आणि हरणारा कोण, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या कृत्यात मानवतेचे काय? नागरी जीवितहानी, आर्थिक नुकसान आणि अस्थिरता यांचा सर्वाधिक फटका सामान्य माणसालाच बसतो. त्यामुळे या रणाचा शेवट जितक्या लवकर होईल, तितकेच मानवजातीसाठी हिताचे ठरेल. पण सध्याच्या परिस्थितीकडे पाहता एकच प्रश्न पुन्हा उभा राहतो तो म्हणजे हे रण खरोखर सरणार आहे का, की ते आणखी भडकणार आहे?

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.