सुनिता विल्यम्स सुखरुप येणार कधी ?
अंतरिक्षात अमेरिकेच्या अंतराळ स्थानकात सुनिता विल्यम्स ही अंतराळ वीरांगना गेले अनेक महिने अडकलेली आहे. या स्थानकात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याने तिला पृथ्वीवर परत आणता येणे जटील झाले आहे. तिची प्रकृती समाधानकारक आहे, हे तिने अंतराळातून साधलेल्या संपर्कातून दिसून येते. तथापि, या अंतराळ स्थानकासंबंधी नुकत्याच देण्यात आलेल्या एका वृत्ताने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अंतराळ स्थानकाला (स्पेस स्टेशन) आता भेगा पडू लागल्या असून त्याला गळती लागली आहे, असे अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिला आता लवकरात लवकर पृथ्वीवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अंतराळ स्थानकात 50 स्थानी गळती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्थानकात एकटी सुनिता विल्यम्स नाही तर तिच्यासमवेत इतरही काही अंतराळवीर आहेत. त्यांच्या भवितव्याला काही धोका नाही असे स्पष्ट करण्यात आले असले, तरी अंतराळ स्थानकात गळती निर्माण होणे, ही धोक्याची घंटा आहे असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. रशियानेही या संबंधीची माहिती दिली आहे.
गळती बंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत आहे, ही समाधानाची बाब मानण्यात येत आहे. तथापि, श्वसनासाठी लागणाऱ्या वायुची गळती त्वरित रोखली गेली नाही, तर अंतराळवीरांवर संकट कोसळू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. सुनिता विल्यम्ससह सर्व अंतराळवीरांना सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असली तरी या गळतीमुळे हे कार्य अधिक कष्टप्रद झाले आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य माणसांच्या हाती केवळ देवाची प्रार्थना करणे, एवढा उपाय राहिला आहे.