प्रियंकाचा डंका कधी वाजणार काय?
वायनाडमधून लोकसभेत प्रियंका गांधी निवडून येणार यात काही शंका उरलेली नाही. महिन्याअखेर निकाल आल्यावर त्या संसद सदस्य बनतील ही विरोधी पक्षांकरिता एक चांगली बाब आहे. एकीकडे राहुल गांधी तर दुसरीकडे प्रियंका अशी डबल बॅरल गन विरोधकांच्या दिमतीला त्यामुळे असणार आहे. त्यामुळे निदान काँग्रेसच्या बाकावर एक नवे चैतन्य दिसणार आहे.
उठसुठ विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेसवर तोंडसुख घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्त सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण हजारजबाबीपणात प्रियंकाचा हात धरू शकेल असा एकही नेता विरोधकांकडे नाही. दुसरे म्हणजे त्या हिंदीमधील फर्ड्या वक्त्या असल्याने सरकारवर बाजू उलटवताना त्यांचे वत्तृत्व कामाला येणार आहे. बहीण-भावाची ही जोडी संसदेत सक्रिय झाली तर काय बहार आणेल ते संसदेच्या येत्या अधिवेशनात जरूर दिसून येईल. पण प्रियंकाना संसदेत आणून काँग्रेसने खरोखर काय साधले याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात आताच सुरु झालेली आहे. याला कारण बहीण-भाऊ एकत्र आल्याने सरकारला काँग्रेसने उगीचच सावध केल्याचे मत विरोधी पक्षातील एक गट प्रगट करत आहे.
प्रियंका यांना आल्याआल्या नामोहरम करण्यासाठी त्यांचे वादग्रस्त पती रॉबर्ट वद्रा आणि त्यांची कथित जमीन प्रकरणे भाजप लवकरच परत काढेल. रॉबर्टने काय घोटाळे केलेले आहेत याबाबत हरयाणात आणि केंद्रात गेली दहा वर्षे सत्तेत असूनही फारशी काही वाच्यता केलेली नाही. रॉबर्टला तुरुंगाची हवा दाखवण्याची भाषा करणारे आता परत सक्रिय होतील. जर रॉबर्टने काही गैर केले असेल तर त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. पण त्याचे नाव पुढे करून प्रियंकाला बदनाम करण्याचे राजकारण सुरु झाले नाही तरच नवल ठरेल. राहुल हे अगोदरच लोकसभेत आणि सोनिया गांधी या राज्यसभेत असल्याने प्रियंका यांचे खासदार होणे म्हणजे भाजपच्या घराणेशाही विरोधी राजकारणाला धार चढवण्यासारखे होणार आहे असे काँग्रेस विरोधकांचे मत आहे. प्रियंका यांच्या लहानपणापासूनच त्यांचे एक वलय तयार झाले. ‘नात अगदी आजीच्या वळणावर गेली आहे. अगदी तिच्यासारखी दिसते’, असा तेव्हा जनताजनार्दनाचा कौल झाल्याने त्या राजकारणापासून नंतर दूर राहिल्या तरी ‘अमेठी का डंका, बिटिया प्रियंका’ असा जयघोषच त्यांच्या नावाने सुरु झाला. मुलगा राहुल मंद, डल, तर मुलगी प्रियंका हुशार आणि चुणचुणीत. अशी काहीशी खूणगाठ लोकांनी मनाशी बांधली. ती किती चूक आणि किती बरोबर हे काळाने दाखवून दिले. जर राहुल हे काँग्रेसचा वर खाली होणारा मुच्युल फंड मानले तर प्रियंका या फिक्स्ड डिपॉझिट. त्यातून हमखास व्याज हे मिळणारच. थोडक्यात काय तर राहुल हे बेभरवशाचे प्रकरण तर प्रियंका म्हणजे खणखणीत नाणे असा समज केला गेला. पुढे काय घडले त्याने तो सपशेल फोल ठरला.
काँग्रेस केंद्रात सत्तेत असताना आपल्यावर गृहिणी पदाची जबाबदारी आहे असे सांगत सक्रिय राजकारणापासून प्रियंका दूर राहिल्या आणि त्यांनी केवळ अमेठी आणि रायबरेलीची केवळ जबाबदारी सांभाळली होती. ती फार जबाबदारीने आणि तडफदारीने सांभाळली असती तर 2019 मध्ये राहुल यांचा अमेठीतून पराभवच झाला नसता आणि तो देखील स्मृती इराणी यांच्या हातून. ब्रँड प्रियंका हा मोठा मानला गेला. जेव्हा काँग्रेसची चलती होती तेव्हा तर राजकारणापासून स्वत:ला दूर भासवणाऱ्या प्रियंका ही झाकलेली मूठ होती. त्यामुळे त्यांचा गाजावाजा फार झाला. प्रियंका या पडद्यामागून राजकारणात भाग घेत होत्या. खरे तर त्याकाळची काँग्रेस कार्यकारिणी ही सोनिया, राहुल आणि प्रियंका हेच होते. त्यात मनमोहन सिंग यांचा देखील समावेश नव्हता. होऊन दिला गेला नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या वाताहतीत सिंहाचा वाटा हा घराण्याचा आहे या प्रचारात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही.
काँग्रेसची कुंडलीच अशी आहे की गांधी नेहरू घराणे वगळले तर पक्ष म्हणजे कवचकुंडले काढलेल्या कर्णासारखा होतो. हे चांगले की वाईट ही गोष्ट अलाहिदा. पण पक्षाची प्रकृती सध्या तरी अशीच आहे. ब्रँड प्रियंका मोठा बनवण्यात काँग्रेसमधील भाट मंडळींचा मोठा हात होता. एकदा का प्रियंका राजकारणात आल्या की भल्याभल्याची छुट्टी करतील असे मानले गेले. यांना राजकारण खरोखर किती कळते याबाबत अगदी मूलभूत शंका जाणकार घेऊ लागले. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश जिंकायचा आदेश राहुल यांनी दिला होता. प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी होती तर जोतिरादित्य शिंदे यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशची. त्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील एकूण 403 जागांपैकी अवघ्या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या. काँग्रेसच्या भ्रमाचा भोपळा केवळ फुटलाच नाहीतर त्याने प्रियंका यांच्या राजकारणातील पदार्पणाने एक प्रकारे अपशकूनच घडला. तीच गत गेल्यावर्षी झालेल्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत झाली. प्रियंका यांनी प्रचाराची जबाबदारी घेतली पण काँग्रेसची संघटना जागेवर आहे की नाही बघितलेच नाही. गेल्या काही दशकात दिग्विजय सिंग आणि कमल नाथ यांनी राज्यातील सारा पक्षच पोखरून काढला आणि त्यांच्यावरच लढाईचे नेतृत्व दिल्याने ती शेंदाड शिपायांची लढाई ठरली. काँग्रेस चारी मुंड्या चीत झालीच पण त्याने राहुल यांच्या भारत जोडो यात्रेने कमावलेल्या पुण्याईवर देखील थोडे पाणी फिरवायचे काम केले. तात्पर्य काय तर संघटना कशी बांधायची आणि रणनीती कशी आखायची आणि आपल्या विरोधकाला खिंडीत कसे पकडावयाचे यावर काँग्रेसमध्ये खोलवर विचार आणि कृती झाल्याशिवाय मोदींना आस्मान दाखवायची बात पक्षाने सोडून द्यावी.
काँग्रेसमध्ये धुरंधर नेते नाहीत असे नाही. पण कोण किती शहाणा आणि कोण अतिशहाणा याची पारख करण्याची कलाच सोनिया काळापासून जणू विलुप्त झाली आहे. त्यामुळेच गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या उपटसुंभांची चलती झाली. अहमद पटेल आता हयात नसले तरी त्यांनी काँग्रेसचे बरेच नुकसान केले असे हळूहळू ऐकू येऊ लागले आहे. काँग्रेसला जास्त घरभेद्यांनी मारले आहे. बाहेरच्यांनी नव्हे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काही वर्षानंतर अरुण नेहरू जेव्हा अमेठीमधून काँग्रेसच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा ‘इस आदमी को आपने यहाँ आनेही कैसे दिया? अशी ती एका सभेत गरजली आणि स्वत:ला चाणक्याचा बाप समजणारे नेहरूसाहेब हे तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाला फेकले गेले. ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ अशी जाहिरात असायची आजघडीच्या काँग्रेसला कठोर परिश्रमाला पर्याय नाही. नुसती गाढव मेहनत नको. पण धोरणाने काम केले गेले पाहिजे. आपल्या शत्रूला/प्रतिस्पर्ध्याला आतबाहेरून ओळखता आले पाहिजे.
ज्यांचा भूतकाळ उज्वल असतो, त्यांचा भविष्यकाळ देखील उज्वल असतो, असे मानणे फसवे ठरेल. कधी काळी जवळजवळ साऱ्या देशावर राज्य केलेल्या मुघलांचा एक वंशज एव्हढा दिवटा निघाला की त्याची सत्ता केवळ दिल्लीतील लाल किल्ल्यापुरती राहिली. राहुल गांधींना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवायचा असेल तर पंडित नेहरू यांचे ‘आराम हराम हैं’ चे तत्व अंगीकारून अटकेपार झेंडे लावण्याची मराठ्याची मनीषा बाळगली पाहिजे, त्याकरिता जगले पाहिजे. प्रियंका त्यांना कितपत साथ देणार त्यावर सारं ठरणार आहे. वादग्रस्त सेबी प्रमुख माधवी पुरी बुच प्रकरणात मोदी सरकार दिवसेंदिवस जास्तच ओढले जाऊ लागले आहे ही सत्ताधाऱ्यांकरता धोक्याची घंटा आहे. केंद्र मौनीबाबा बनल्याने संशय जास्तच बळावत आहे. भाजपला महाराष्ट्र जिंकण्याची घाई झालेली आहे आणि तिथे काम फत्ते झाले की मग विरोधकांना गुंडाळण्याची मोहीम तेज होईल. महाराष्ट्रातील मोहीम फसली तर मात्र फसगत होणार आहे.
सुनील गाताडे