आयजीएमच्या एस.टी.पी. प्रकल्पास मंजुरी कधी ?
प्रस्ताव १.६४ कोटींचा
प्रदुषण मंडळाचे आदेश
तातडीने मंजुरीची मागणी
कोल्हापूर
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील (आयजीएम) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एस.टी.पी.(सीवेज ट्रीटमेंट प्लांट) व ई.टी.पी. (इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट) उभारणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या या प्रकल्पाचा प्रस्ताव 1.64 कोटी रुपये खर्चाचा असून, तो जिल्हा नियोजन समिती व संचालक आरोग्य सेवा मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने प्रकल्पाच्या उभारणीस विलंब होत आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया न झाल्याने आयजीएम रुग्णालयातून बाहेर पडणारे लाखो लिटर बायोमेडिकल वेस्ट थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. यामुळे प्रदूषणासोबतच गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कडक भूमिका घेतली असून, तत्काळ प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार, प्रकल्प सुरू करून 13 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
महापालिकेचा मलनिसारण प्रकल्प वारंवार नादुरुस्त होत असल्याने रुग्णालयातील सांडपाणी थेट भुयारी गटारींमार्गे पंचगंगा नदीत मिसळते. आयजीएम प्रशासनाने या समस्येवर उपाय म्हणून 15 केएलबी क्षमतेच्या एस.टी.पी. आणि 10 केएलबी क्षमतेच्या ई.टी.पी. प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य सेवा मंडळ, मुंबई येथे पाठविलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळाल्यास सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया होईल आणि पंचगंगा नदीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनाने यास प्राधान्य देत तातडीने मंजुरी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.