दोडामार्ग पोलिसांकडून पंचनामा न करण्याचा 'अजब' पवित्रा
गाडगीळांना न्याय मिळणार कधी?
सावंतवाडी । प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल येथील शेतकरी श्रीपाद गाडगीळ यांच्या मालकीच्या शेतमांगराची अज्ञाताने ३ ऑक्टोबर रोजी तोडफोड केल्याच्या घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. यासंदर्भात गाडगीळ यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी केवळ 'अदखलपात्र गुन्हा' नोंदवून घेतला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीचा पंचनामा करण्याची तसदी घेतली नाही.उलट पंचनाम्याची तरतूद नाही' असा दावा केला पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या श्रीपाद गाडगीळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ऑनलाईन तक्रार अर्ज केला. परंतु, हा अर्ज चौकशीसाठी पुन्हा दोडामार्ग पोलीस ठाण्याकडेच आला. विशेष म्हणजे, दोडामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा "पंचनामा करण्याची तरतूद नसल्याचे" सांगून हा अर्ज 'दप्तरी फाईल' केल्याचे गाडगीळ यांना कळवले आहे.पोलिसांनी पंचनामा करण्याची तरतूद नाही, असे कळवणे म्हणजे त्यांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची व्याख्याच नाहीये काय? असा प्रश्न गाडगीळ यांना पडला आहे. खरे तर, हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा व वस्तुस्थितीचा पंचनामा करणे अत्यावश्यक आहे. मात्र तसे न केल्याने, गुन्हेगारांना पाठबळ देण्यासारखा हा प्रकार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गाडगीळ यांचा जुना मातीचा शेतमांगर कोसळला होता, त्यामुळे त्यांनी नियमानुसार ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन नव्याने चिऱ्याचा शेतमांगर बांधायला सुरुवात केली होती. अर्धवट बांधकाम झाले असतानाच अज्ञाताने हे बांधकाम तोडून टाकल.एखादी घटना घडूनही पोलीस वस्तुस्थितीचा पंचनामा करत नसतील, तर त्याला काय म्हणावे? असा प्रश्न गाडगीळ यांना भेडसावत आहे. यातून "कुठलेही कृत्य केल्यास समोरच्याचे नुकसान होईल, पण भरपाई काहीच मिळणार नाही," अशा गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांना अशा प्रकारच्या कृत्यांमुळे बळ मिळणार आहे, अशी भीती गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.