For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लेंडी नाल्याला संरक्षक भिंत कधी ?

11:58 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
लेंडी नाल्याला संरक्षक भिंत कधी
Advertisement

नागरिकांचा धोकादायक प्रवास : सांडपाणी समर्थनगर-ओमनगर येथे शिरण्याची शक्यता

Advertisement

बेळगाव : जुना धारवाड रोडपासून समर्थनगर येथून जाणाऱ्या लेंडी नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने धोका वाढला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नाल्यात पाणी आल्याने रस्त्याच्या पातळीवरून पुढे वाहून जात होते. रात्रीच्यावेळी जरा जरी वाहन कडेला गेले तर थेट नाल्यामधून वाहून जाण्याची शक्यता आहे. दररोज शेकडो नागरिक नाल्याच्या बाजुच्या रस्त्याने ये-जा करीत असल्याने धोका निर्माण झाला आहे. पावसाळा आला तरी अद्याप नालेसफाई करण्यात आले नाही. हिंद कारखान्यापासून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या लेंडी नाल्याचे पात्र कमी झाले आहे. साचलेला गाळ, प्लास्टिक, त्यात वाढलेली झाडे यामुळे नाल्यामधून पाण्याचा निचरा होताना अडथळे येत आहेत.

त्यामुळेच 2019 रोजी आलेल्या महापुरामुळे नाला फुटून सर्व सांडपाणी समर्थनगरमध्ये शिरले होते. मंगळवारी झालेल्या पावसामुळे नाला तुडूंब भरून वाहत होता. सध्या समर्थनगर तसेच राष्ट्रीय महामार्ग परिसरात रहिवासी वसाहती वाढत आहे. नाल्याच्या बाजुने अरुंद असा काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. परंतु काँक्रीटच्या बाजुला वाहन गेल्यास थेट नाल्यात कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात नाल्यामध्ये कमी प्रमाणात पाणी असल्याने धोका नसतो. परंतु पावसाळ्यात मात्र नाला तुडुंब भरून वाहत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांसह आसपासचे नागरिक, लहान मोठे व्यापारी ये-जा करीत असतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

Advertisement

संरक्षक भिंतीचा विसर का?

शहरातील सर्व सांडपाणी लेंडी नाल्यामार्गे राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे निघून जाते. तरीदेखील या नाल्याला अद्याप संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास समर्थनगर, ओमनगर या भागामध्ये सांडपाणी शिरण्याची भीती आहे. त्यामुळे या नाल्यांच्या संरक्षक भिंतीसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून नागरिकांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. संरक्षक भिंत उभारल्यास गाळ अथवा जलपर्णी उगवणे थांबणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

लेंडी नाल्याच्या स्वच्छतेबाबत शेतकरी संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. नाल्यात पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली झाडे अडकली आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने हे सांडपाणी थेट शिवारांमध्ये शिरत आहे. लेंडी नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून वेळोवेळी करण्यात येऊन देखील दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Tags :

.