For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्तशुद्धी झाली की मनुष्य विकारमुक्त होतो

06:43 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चित्तशुद्धी झाली की मनुष्य विकारमुक्त होतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

एक आदर्श जीवन कसे असावे हे अवतारकार्यातून ईश्वर दाखवत असतात. समाजापुढं उदाहरण म्हणून त्यांची दिव्य, अलौकीक कर्मे दीपस्तंभासारखी उभी असतात. असं कार्य करत असताना समाजानं आपल्या कार्याची दखल घ्यावी, कौतुक करावं अशी त्यांची बिलकुल अपेक्षा नसते. उलट समाजमन विचित्र असल्याने कित्येकदा त्यांच्या कामाची कुचेष्टा होते किंवा इर्षेपोटी त्यांच्या सामर्थ्याबद्दल शंकासुद्धा घेतली जाते. हा ईश्वरी अवतार आहे हेच बहुतेकांच्या लक्षात येत नाही पण समाजात कर्मसिद्धांत जाणणारे काही लोक असतात ज्यांना निरिच्छ होण्याचं महात्म्य समजलं असतं आणि त्यामुळे ते राग आणि भीती यापासून मुक्त असतात, विज्ञानरुपी तपाच्या बळावर जगातील वस्तू, व्यक्ती यांची नाशवंतता ते जाणून असल्याने ते कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागे लागत नाहीत. असे लोक मात्र मनुष्य देह धारण करून, पृथ्वीवर दिव्य कर्मे करणाऱ्या ईश्वराला ओळखतात. अशा लोकांची वैशिष्ट्यो बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत. असे लोक मृत्यूनंतर त्यांना जाऊन मिळतात.

निरीहा निर्भियोरोषा मत्परा मद्व्यपाश्रया ।

Advertisement

विज्ञानतपसा शुद्धा अनेके मामुपागता ।। 14।।

अर्थ- इच्छा, भय व क्रोध यांनी रहित असलेले, मत्परायण, माझा आश्रय केलेले, विज्ञानरूपी तपाने शुद्ध झालेले असे अनेक लोक मजप्रत आले आहेत.

विवरण- निरपेक्ष कर्म करणाऱ्यांना कुणाकडून कसलीच अपेक्षा नसल्याने ते इच्छा, भय, क्रोधरहीत असतात. त्यांची चित्तशुद्धी झालेली असते. त्यांना सर्वत्र ईश्वराचे दर्शन घडत असल्याने समोर दिसणाऱ्या सर्व व्यक्ती, प्राणी ही ईश्वराची रूपे दिसत असतात. त्यामुळे त्यांना कुणापासून भय वाटत नाही. जे आपल्याला मिळाले नाही ते इतरांना मिळाले ह्याबद्दल ते कुणाचा मत्सरही करत नाहीत. अशा विकारमुक्त लोकांना ईश्वरी अस्तित्वाची चाहूल सहजी लागते. उदाहरणार्थ ईश्वराचा नृसिहवतार अत्यंत भयावह व बीभत्स होता. तरीपण प्रल्हाद डगमगला नाही. तो निर्धास्तपणे त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. जीवनात इच्छा न करता जे मिळेल त्यात समाधानी राहण्याला फार महत्त्व आहे. इच्छा नसल्या की, त्या पूर्ण न होण्यामुळे येणारा राग व आता आपलं कसं होणार ही भीती या दोन्हीपासून माणसाची मुक्तता होते. तो हे जाणून असतो की, जे आपल्या नशिबात आहे ते आणि तेव्हढंच आपल्याला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात आलेला मनुष्य आपोआपच स्वस्थचित्त होतो. असा मनुष्य त्याच्या शरीरासाठी आवश्यक त्या देहाच्या हालचाली जरूर करत असतो पण ते केवळ एक आवश्यकता म्हणून. त्यातून काही विशिष्ट गोष्टी साधण्याचे त्याचे उद्दिष्ट नसते. येथील सर्व वस्तू, व्यक्ती या नाशवंत आहेत. त्यामुळे त्या त्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने उपयोगाच्या नाहीत हे तो जाणून असतो. हे जाणणे आणि त्या जाणण्यावर ठाम राहणे याला विज्ञानरुपी तप असे म्हणतात. असा मनुष्य ईश्वर आहे आणि तोच त्याचा खरा आधार आहे या ठाम समजुतीच्या बळावर शांत, समाधानी वृत्तीने जीवनयात्रा करत असतो आणि शेवटी ईश्वर त्याला त्यांच्यात सामावून घेतात. सर्व दु:खे बाजूला ठेऊन हरिनामाचा गजर करत सर्व कुटुंबासह मनुष्य यात्रेला जातो. तसं हे विश्व हेच माझं कुटुंब अशी इच्छा विरहित मनुष्याची अवस्था असते. निरपेक्ष भावनेनं जगात वावरणारा ईश्वराचा लाडका असल्याने मोक्षाचा अधिकारी होतो पण इतर भक्तांच्याकडही मी दुर्लक्ष करत नाही असं पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत.

येन येन हि भावेन संसेवन्ते नरोत्तमा ।

तथा तथा फलं तेभ्य प्रयच्छाम्यव्यय स्फुटम् ।।15 ।।

अर्थ-नरश्रेष्ठ ज्या ज्या भावनेने माझा आश्रय करतात त्या त्याप्रमाणे व्ययरहित मी त्यांना स्पष्ट फल देतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.