या समाधीवर कधी डोके टेकायचे ?
पुनाळ गावी छत्रपती संभाजी महाराजांच्या शिलेदाराची समाधी
ज्योत्याजीराव केसरकर यांची समाधी गावापुरतीच..?
कोल्हापूरः सुधाकर काशीद
सहल म्हणजे खाणे पिणे, वॉटर पार्क, जंगल सफारी हे ठीक आहे. कोल्हापुरात तर ठराविक ‘ठिकाणीच’ सहल केंद्रित झाली आहे. ती ठिकाणे गर्दीने अक्षरश: फुलली आहेत. नोकरी, शिक्षण, संसार या व्यापातून थोडा विरंगुळा यातून मिळतो, हेही खरे आहे. पण कोल्हापुरात केवळ सहल म्हणून नव्हे तर प्रत्येकाने पाहिले पाहिजेच, असे एक गाव आहे. पण तेथे बाहेरचा माणूस क्वचितच येतो, अशी परिस्थिती आहे. हे गाव कोल्हापूरपासून अवघ्या 30 किलोमीटरवर आहे आणि या गावात छत्रपती संभाजी महाराज होय, शिवाजी पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या एका लढवय्या विश्वासू शिलेदाराची समाधी आहे. पण तिकडे कोणाची पावले फारशी वळत नाहीत, हे वास्तव आहे.
हे गाव म्हणजे पन्हाळा तालुक्यातील पुनाळ. तेथे समाधी आहे, त्या गावातील जोत्याजीराव केसरकर या शिलेदाराची. कोल्हापूर ही जणू अशा शिलेदारांचीच भूमी आहे. म्हणूनच विशाळगड येथे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, नेसरी येथे सेनापती प्रतापराव गुजर, विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दीपाजी राऊत राव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर हे सात शिलेदार, पन्हाळा येथे शिवा काशीद, टोप संभापूरला दुसरे संभाजी यांची समाधी आहे. सेनापती धनाजी जाधव यांची समाधी वडगावमध्ये आहे. दुसरे संभाजी महाराजांची समाधी कोल्हापुरात पचगंगेच्या काठावर तर हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर याची समाधी पन्हाळा येथे आहे. अशा ज्ञात-अज्ञात शूरवीरांच्या समाधी आपल्या परिसरात आहेत. म्हणजेच त्यांच्या समाधीच्या रूपाने त्यांचे अस्तित्व या ठिकाणी आहे. आपले नशीबही चांगले आहे, त्यांच्या थेट समाधीवरच डोके टेकायची आपल्याला संधी आहे. पण आपण ही संधी घ्यायला कमी पडत आहोत. कारण सहलीच्या आपल्या कल्पना वेगवेगळ्dया झाल्या आहेत. त्यामुळे त्या शूरवीरांच्या समाधीस्थळांकडे वाकडी वाट काढून जायला कदाचित आपल्याला वेळच नाही की काय, असे वाटण्यासारखी अवस्था झाली आहे.
नुकताच म्हणजे दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा झाला. तो कोल्हापुरातही झाला. पण या छत्रपती संभाजी महाराजांचा एक विश्वासू शिलेदार कोल्हापूर जिह्यात होता, त्याची समाधी आजही पुनाळ गावात आहे, हा इतिहास मात्र त्या दिवशी थोडा विसरलाच गेला. पुनाळ गाव कळे, बाजारभोगावच्या पुढे आहे. या गावातला ज्योत्याजीराव केसरकर हा छत्रपती संभाजी महाराजांचा साथीदार. छत्रपती संभाजी महाराजांना बुरहानखानने फंदफितुरीने संगमेश्वराजवळ पकडले. त्यांना घेऊन जात असताना बत्तीस शिराळ्याजवळ या ज्योत्याजीराव केसरकर व त्याच्या सहकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी थेट प्रतिकार केला. बुरहानखानाची मोठीच्या मोठी फौज. त्यामुळे या फौजेपुढे ज्योत्याजीरावांचा टिकाव लागला नाही. ते जखमी झाले, त्यांचे अनेक साथीदार गतप्राण झाले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा हा पहिला प्रयत्न असफल झाला.
ज्योत्याजीरावांचे हे शौर्य त्यांच्या भावी सेवेत मात्र खूप मोलाचे ठरले. त्यांनी पुढे महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहूंच्या सेवेत आपले मोठे योगदान दिले. ज्योत्याजीरावांची समाधी त्यांच्या पुनाळ गावात आहे. घुमट म्हणून ती ओळखली जायची. इतिहासतज्ञ गुळवणी सरांनी या समाधीचा शोध लावला. पुनाळ गावात ज्योत्याजीरावांचे वंशज केसरकर आणि पाटील परिवारात आहेत. गावातले लोक ज्योत्याजीरावांच्या समाधीला रोज वंदन करतात. या समाधीच्या साक्षीनेच गावातले सर्व कार्यक्रम होतात. पण ज्योत्याजीराव पुनाळचे. मग आपला काय त्यांच्याशी संबंध, अशीच इतरांची भावना आहे की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आणि ज्योत्याजीरावांचा इतिहास पुनाळ गावच्या बाहेर जगाच्या क्षितीजावर आणण्याची गरज आहे. आणि आपणही अशा शिलेदारांच्या समाधीवर एकदा सहलीच्या निमित्ताने डोके टेकवले तर काय हरकत आहे? दोष आपलाही नाही. कारण आपल्याला जगातल्या इतर लढायाच शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या आहेत. जोत्याजीरावांचे नाव शालेय पातळीवरच्या इतिहासाच्या पुस्तकात शोधूनही सापडणार नाही, हे वास्तव आहे.