For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेव्हा टप्प्यात आलेली शिकार निसटते...

11:09 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेव्हा टप्प्यात आलेली शिकार निसटते
Advertisement

पोलिसांची चाहूल लागताच अट्टल घरफोड्या दुचाकी टाकून पळाला

Advertisement

बेळगाव : वाढत्या चोऱ्या, घरफोड्या रोखण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे. एक अट्टल घरफोड्या मंगळवारी मध्यरात्री बेळगावात आला होता. पोलिसांना त्याची माहितीही मिळाली. त्याच्यासाठी जाळे टाकण्यात आले, मात्र काही क्षणात या अट्टल घरफोड्याने अमननगरमधून पळ काढल्याची घटना घडली आहे. खाजा अस्लम ऊर्फ रफिक सय्यद ऊर्फ शेख (वय 32) रा. सत्यसाई कॉलनी वैभवनगर असे त्याचे नाव आहे. चोरीसाठी त्याने आणलेली केए 22 ईएक्स 9949 क्रमांकाची होंडा डिओ दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून घरफोडीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी रॉडही ताब्यात घेण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत खाजा पळतो आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकाऱ्यांनी खाजाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. मंगळवारी रात्री घरफोडीसाठी खाजा बेळगावात आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यासाठी आठ ते दहा पोलिसांचे पथक अमननगरला पाठविण्यात आले होते. पोलिसांना पाहताच खाजाने आपली दुचाकी तेथेच सोडून पळ काढला आहे. खाजा हा एक अट्टल गुन्हेगार असून बेळगाव शहर, जिल्ह्याबरोबरच हुबळी-धारवाड, बळ्ळारी, होस्पेट, गुंटकल, महाराष्ट्र, गोव्यातही त्याने 20 हून अधिक चोऱ्या व लुटमारी केल्याचे उघडकीस आले आहे. खाजाला ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी रात्रभर पोलिसांनी परिसर पिंजून काढला.

नागरिकांना आवाहन

Advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोऱ्या करण्यासाठी येताना खाजा आपल्याजवळ शस्त्रs बाळगतो. बेळगावात चोऱ्या केल्यानंतर तो बळ्ळारी, गुंटकलच्या दिशेने पळून जातो. बळ्ळारी, होस्पेट, आंध्रप्रदेशला तो आश्रयासाठी जातो, अशी माहिती उघडकीस आली आहे. खाजाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. खाजाविषयी कोणाला माहिती असल्यास 9480804107 या क्रमांकावर माळमारुती पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.