स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण केले की, इच्छित मनोरथ पूर्ण होते
अध्याय तिसरा
भगवंत अर्जुनाला म्हणाले, तू वाट्याला आलेले कर्तव्यकर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. कर्म केल्याशिवाय तुझी शरीरयात्राही उत्तम प्रकारे पार पडणार नाही. तू युद्ध करायचे सोडून पळून गेलास तर तू तुझे कर्तव्य टाळलेस असे होईल. जो धर्माचे आचरण करतो, त्यास मोक्षाची निश्चित प्राप्ती होते. निष्काम कर्म करण्याएव्हढे महत्त्वाचे काहीच नाही कारण निष्काम कर्म माणसाला कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. तो संपूर्ण समाधानी असतो. संपूर्ण समाधानी असणे म्हणजेच मोक्षपदी आरूढ होणे होय. म्हणून जो निरपेक्षतेने कर्म करतो त्याला मोक्ष मिळणे हा त्याचा विशेषाधिकारच असतो. म्हणून हे अर्जुना, तू कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म कर ह्या अर्थाचा
यज्ञार्थ कर्म सोडूनि लोक हा बांधिला असे । यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त-संग तू ।।9।। हा श्लोक आपण पहात आहोत. माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, आपला जो धर्म म्हणजे कर्तव्य आहे ते पार पाडणे हाच आपल्यासाठी नित्य करायचा यज्ञ होय. तो करत असताना त्यात पाप प्रवेश करू शकत नाही. ह्या स्वधर्माचा एखाद्याने त्याग केला म्हणजे निरपेक्षतेने कर्म करण्याचे टाळले, तर केलेल्या कर्मातून पाप, पुण्याची निर्मिती होऊन, मनुष्य जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो. यज्ञाचा एक अर्थ त्याग करणे असाही आहे म्हणून स्वधर्माचे आचरण करणे म्हणजे नित्य यज्ञ-याजन करण्यासारखे आहे. जो असे स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीसुद्धा बंधक होत नाही. मात्र जो माणूस आपल्या नित्य यज्ञाला चुकला तो कर्माने बध्द होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन होतो.
पुढील श्लोकात स्वधर्माची चर्चा करताना भगवंत म्हणाले, ह्याविषयी मी तुला एक कथा सांगतो. ती अशी की, ब्रम्हदेवाने उत्पत्ती, स्थिती, लय ह्या अवस्था असलेली सृष्टी निर्माण केली आणि आरंभी प्रजेला म्हटले की, तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करील.
पूर्वी प्रजेसवे ब्रम्हा यज्ञ निर्मूनि बोलिला । पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा काम-धेनु चि ।। 10 ।।
माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, ब्रह्मदेवानी लोकांची आणि नित्य आचरणाच्या धर्माची निर्मिती बरोबरच केली परंतु लोक या स्वधर्मरुपी यज्ञाला जाणत नव्हते. स्वधर्मरूप यज्ञ म्हणजे कर्तव्याचे पालन करणे परंतु कुणाचे काय कर्तव्य आहे हे लोकांना समजत नव्हते. ते ब्रह्मदेवांच्याकडून जाणून घ्यावे म्हणून सर्व लोकांनी ब्रम्हदेवाना विनंती केली की, देवा, या लोकात आम्ही कसे वागले म्हणजे ते यथायोग्य होईल हे आम्हाला सांगा. त्यावेळी ब्रह्मदेवानी लोकांना सांगितले की, प्रत्येकाला मी योग्य ती कामे नेमून दिलेली आहेत. त्यालाच स्वधर्म म्हणतात. त्याचे आचरण करावे, म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. याशिवाय तुम्हाला वेगळे कोणतेही व्रत- नियम करण्याची काही आवश्यकता नाही. अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही. तसेच, दूर कोठे तीर्थयात्रेस जाण्याची जरुरी नाही. योग वगैरे साधने, सकाम उपासना तसेच, मंत्रतंत्रादिक अनुष्ठाने करण्याची गरज नाही. स्वधर्म सोडून इतर देवतांची पूजाअर्चा करण्याचे कारण नाही. तुम्ही फक्त सहजपणे प्राप्त झालेल्या स्वधर्माचरणरूप यज्ञाचे आचरण करावे. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्राr निष्काम बुद्धीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निरपेक्षतेने आचरण करा.
क्रमश: