सीबीटी बसस्थानक उद्घाटनाचा मुहूर्त कधी?
सहा वर्षे उलटली : विविध कारणांनी लोकार्पणास विलंब, प्रवाशांची होतेय गैरसोय
बेळगाव : कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र कित्येक दिवसांपासून उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दैनंदिन सार्वजनिक बस वाहतुकीवर ताण वाढू लागला आहे. या बसस्थानकाचे उद्घाटन करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा पुरविण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. मात्र सीबीटी बसस्थानकाच्या कामाला विविध कारणांनी विलंब झाला आहे.
त्यामुळे प्रवाशांना या बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना आणि इतर कारणामुळे सहा वर्षांचा कालावधी उलटला तरी निर्धारित कालावधीत बसस्थानकाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना पार्किंग, फलाट, आसने आणि इतर सुविधांची कमतरता जाणू लागली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र सध्या हा ताण केवळ मध्यवर्ती बसस्थानकावर आहे. सीबीटी बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांचा ताणही कमी होणार आहे. शिवाय बससेवाही सुरळीत धावणार आहे.
सीबीटी बसस्थानकात तळ मजला, दुचाकी पार्किंग, यात्रीनिवासी, सुसज्ज शौचालय, आरक्षण कक्ष, तिकीट काऊंटर, बसपास काऊंटर, चौकशी कक्ष, महिला विश्रांतीगृह आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मात्र अद्याप उद्घाटन झाले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. सीबीटी बसस्थानकात अंर्तगत सुविधा उपलब्ध करून सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. यामध्ये फरशी, सजावट, इलेक्ट्रीकची कामेही करण्यात आली आहेत. रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. शिवाय प्रवाशांसाठी निवासी खोल्या आणि ऑफिस रुमही उभारण्यात आले आहेत. मात्र किरकोळ कामासाठी उद्घाटन रखडले आहे.
लवकरच हस्तांतराची प्रक्रियाही पूर्ण होणार
सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. इमारतीमध्ये काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर बसस्थानकाचे उद्घाटन होणार आहे. शिवाय लवकरच हस्तांतराची प्रक्रियाही पूर्ण होणार आहे. कोरोना आणि इतर कामांमुळे बसस्थानकाच्या कामात अडथळा निर्माण झाला.
- सईदाबानू बळ्ळारी (व्यवस्थापकीय संचालक स्मार्ट सिटी)