For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनुष्य त्रिगुणात रमला की त्याला देवाचा विसर पडतो

06:52 AM Jul 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनुष्य त्रिगुणात रमला की  त्याला देवाचा विसर पडतो
Advertisement

सात्विक, राजस, तामस हे भाव भगवंतांपासून उत्पन्न झालेले आहेत पण ते त्या भावात नसतात. माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करणारे भाव भगवंतांनी निर्माण केलेले असले तरी त्याने कोणत्यावेळी कसं वागावं हे भगवंत ठरवत नाहीत तर मनुष्य त्याच्या स्वभावानुसार ते ठरवत असतो. ज्याचा स्वभाव सात्विक असतो त्याची वर्तणूक धर्माला धरून होते. म्हणून रज, तम गुणांचे प्राबल्य असलेला स्वभाव माणसाला पूर्वप्रारब्धानुसार प्राप्त झाला असेल तर तो सात्विक होण्यासाठी त्याने संत साहित्याचा अभ्यास व नामस्मरण करावे म्हणजे हातून योग्य वर्तणूक घडत जाऊन स्वभावात सत्वगुणाची वाढ होऊन तो सात्विक होईल. त्यामुळे तो आत्मोद्धाराच्या दिशेने जलद पुढे सरकू शकेल.

Advertisement

आपण कोण आहोत हे लोकांनी ओळखावं अशी भगवंतांची फार इच्छा आहे परंतु ते सगुण रुपात असल्याने लोक त्यांना त्यांच्यापैकीच एक मानत असत. स्वत:च्या मनातली खंत बोलून दाखवताना पुढील श्लोकात ते म्हणतात, माझ्याप्रमाणे ह्या त्रिगुणांपासून वेगळे होण्याचा प्रयत्न न करता ह्या सत्व, रज व तम ह्या गुणांच्या मोहात लोक पडतात. त्यामुळे गुणांहून वेगळ्या असलेल्या आणि सुख, दु:ख, इच्छा, क्रोध हे विकार नसलेल्या मला ते ओळखत नाहीत.

ह्या गुणात्मक भावांनी विश्व मोहूनि टाकिले । ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन ।। 13।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, त्रिगुणांच्या मोहात माणसे इतकी अडकतात की, त्यापुढे त्यांना भगवंत म्हणून कोणी आहेत ह्याचा सोयीस्कर विसर पडतो. ज्याप्रमाणे पाण्यात उत्पन्न झालेले शेवाळ पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश उगीचच झाकले आहे असे वाटते त्याप्रमाणे आपण कर्ते आहोत ह्या भ्रमाने लोकांच्या दृष्टीने भगवंतांची उपस्थिती झाकली जाते. ज्याप्रमाणे आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे पडणारे स्वप्न आपल्याला इतके खरे वाटते की, त्यापुढे आपली आपल्यालासुद्धा आठवण रहात नाही. त्याप्रमाणे आपण त्रिगुणात रमलो की देवाचा विसर पडतो. म्हणून भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून डोळ्यापुढे तयार झालेला पडदा डोळ्यांची दृष्टि नाहीशी करतो त्याप्रमाणे मी तयार केलेली त्रिगुणात्मक माया पडद्याप्रमाणे माझ्या आड येऊन मला झाकून टाकते. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोती हे पाण्यापासून तयार होतात पण पाण्यात विरघळत नाहीत किंवा मातीपासून तयार झालेले मडके भाजले की, मातीशी न मिळता खापररूपाने वेगळे रहाते. त्याप्रमाणे मी तयार केलेले प्राणी माझ्याशी एकरूप होत नाहीत. जी माया भगवंतांच्यावर कुरघोडी करायच्या प्रयत्नात असते ती माणसांना दाद देणे शक्यच नाही पण तिच्यावर भगवंतांचे नियंत्रण असल्याने मायारूपी नदीतून तरुन जाण्यासाठी भगवंतांना शरण जाणे हाच राजमार्ग आहे पण हे लक्षात न घेता माणसे स्वबळावर मायेवर मात करायचा प्रयत्न करतात आणि इथेच फसतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.