‘व्हॉटस्अप’ घरगुती हिंसा
अनेक महिला किंवा पुरुषही गृहातंर्गत हिंसेचे बळी ठरतात, याची आपल्याला माहिती आहे. अशा हिंसाचारापासून संरक्षण व्हावे म्हणून भारत सरकारने काही वर्षांपूर्वी गृहांतर्गत हिंसा विरोधी कायदा केलेला आहे. तथापि, ही समस्या केवळ भारतातच आहे, असे नाही, तर ती चीनसारख्या प्रगत देशातही आहे. चीनच्या शांघाय शहरात एका पतीने आपल्या पत्नीच्या विरोधात व्हॉटस्अप गटावर काही अवमाजनक टिप्पणी पोस्ट केली आहे. चीनमधील न्यायालयाने ही व्हॉटस्अप टिप्पणीही गृहांतर्गत हिंसा असल्याचे मान्य करत आरोपीविरोधात टिप्पणी केली आहे. घटना अशी आहे, की हा व्यक्ती आपल्या पत्नीपासून अतिशय त्रासात आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने पत्नीविरोधात व्हॉटस् अप गटांवर काही मते मांडण्यास प्रारंभ केला, हे संदेश तो आपल्या पुत्राच्या व्हॉटस् अप गटावरही टाकू लागला. त्यामुळे त्याच्या पुत्राची स्थिती अवघड झाली. हे संदेश व्हॉटस् अप गटाच्या माध्यमांमधून अनेकांच्या हाती पडले. त्यामुळे त्याच्या पुत्राचीही कोंडी होऊ लागली. त्याची त्याच्या वयोगटातील मित्रांमध्ये चेष्टा होऊ लागती. अखेर, त्याच्या पुत्राने त्याच्या विरोधात तक्रार सादर केली. पोलिसांनी चौकशी करुन त्याच्या विरोधात अभियोग सादर केला. या प्रकरणात सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता, की व्हॉटस्अप संदेश हा गृहांतर्गत हिंसेचा पुरावा होऊ शकतो काय, तसेच असे संदेश हा गृहांतर्गत हिसेंचा प्रकार मानला जाऊ शकतो काय ? या प्रश्नांची उत्तरे शांघायच्या न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे दिली आहेत.
आपल्या घरातील बाबी व्हॉटस्अप किंवा अन्य प्लॅटफॉर्मस्च्या माध्यमातून सार्वजनिक करणे, ही गृहातंर्गत हिंसाच आहे, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. तसेच पित्याने अशा प्रकारच्या वर्तनापासून स्वत:ला रोखावे, असेही निर्णयात स्पष्ट केले आहे. ही घटना जरी चीनमधील असली, तरी भारतातही लागू होण्यासारखी आहे. घरातील व्यक्तींची निंदा सार्वजनिक सोशल मिडिया माध्यमांवर केल्यास तो गृहांतर्गत हिंसेचा गुन्हा ठरु शकतो. तसेच आपल्या घरातील खासगी बाबी सार्वजनिक माध्यमांवर उघड करुन आपल्या कुटुंबियांची अवमानना करणे किंवा त्यांना लाज आणणारे संदेश पाठविणे, हा देखील गुन्हा मानला जाऊ शकतो.