हा वास कशाचा ?
कोल्हापूर :
सहज जाणवणारा पण रासायनिक असणारा एक तीव्र स्वरूपाचा विचित्र वास गेले काही दिवस शहरात जाणवत आहे. हा वास सलग नाही. पण ठराविक वेळेनंतर जाणवत राहतो आणि या वासाची नोंद आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातही जागरूक नागरिकांनी तक्रार दिली आहे. एखाद्या रासायनिक प्रक्रियेतूनच हा वास बाहेर पडत असावा, असा अंदाज आहे. असेल वास कशाचा तरी, या समजुतीने लोक सहन करत आहेत. पण आता तक्रारीनंतर या वासाचा शोध घेणे सुरू झाले आहे.
हरी पूजा नगरमध्ये सुभाष नियोगी हे उद्योजक राहतात. त्यांना व त्या परिसरातील लोकांना हा वास तीव्रतेने जाणवू लागला. वास घशात गेला की त्या पाठोपाठ एकामागून एक पटापट पाच-सहा शिंका येऊ लागल्या. घसा कोरडा पडू लागला. पण हा वास आणि त्यानंतर शिंका आणि जळजळ याचा काही संबंध आहे का, हे त्यांना कळेना. अनेक जण त्यांना म्हणायचे, आम्हाला सर्दी-पडसे नाही. पण अचानकच पटापट शिंका येतात. पण त्यात फार काही नवीन नसल्याने आम्ही या वासाकडे दुर्लक्ष करत आहोत.
नियोगी यांनी याबद्दल जुना राजवाडा पोलिसांना कल्पना दिली. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी हा प्रश्न आपल्या कक्षेत नाही, हे सांगतानाच त्यांनी वासाचा अंदाज घेण्यासाठी एकदा मध्यरात्री हरी पूजा नगरमध्ये दोन पोलीस पाठवले, त्या पोलिसांनाही या वासाचा अनुभव घेतला. नियोगी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला याची कल्पना दिली आणि तक्रारही केली. पर्यावरण व निसर्ग अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर, पारस ओसवाल यांनी तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जयंत हजारे, प्रमोद माने यांच्याशी थेट संपर्क साधला. रितसर तक्रार केली. एका विशिष्ट उंचीवरून हा वास पसरत असल्याने तो विशेषत: दुसऱ्या- तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना जाणवतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ एका पाहणीत हा वास कशाचा? तो किती घातक आहे, याचा अंदाज येऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी हा वास कधीही जाणवू लागला की एका कर्मचाऱ्याला तातडीने त्या परिसरात पाठवतो, असे सांगितले आहे.
धकाधकीच्या जीवनात धूळ, धूर हा तर नित्याच भाग झाला आहे. धूळ शहरात पावलाला जाणवते. अस्वस्थ करते, पण कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अचानक सर्दी-पडसे नसतानाही पाच-सहा शिंका पटापट लोकांना का येत आहेत, याचा निष्कर्ष सर्वसाधारण माणसांना काढता येत नाही. ‘असेल काहीतरी..’ अशा दोन शब्दांवर लोक मनाची समजूत घालत आहेत. पण काहीतरी गंभीर रसायनाचा हा वास असला तर त्याचे परिणामही गंभीर होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे डॉ. बाचुळकर, सुभाष नियोगी यांनी जरूर जागरूकता दाखवली आहे. प्रदूषण नियंत्रणाने लक्ष घातले आहे. मात्र लवकर निष्कर्ष येण्याची गरज आहे .
- गांभिर्याने उपायाची गरज
हा वास ठराविक परिसरातच आहे, असे नाही. पण सर्वसामान्य माणसाला त्याचे परिणाम काय, हे कळत नाही. विशेषत: दुसऱ्या, तिसऱ्या मजल्याच्या पातळीवरून हा वास जाणवतो. याकडे नक्कीच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सुभाष नियोगी