For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या मनात काय?

06:26 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या मनात काय
Advertisement

महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपच्या बाजुने आश्चर्यकारक निकाल लागल्यापासून राजकीय विश्लेषकांना दिल्लीत देखील चमत्कार घडू शकतो असे वाटू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सोमवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली. आता आजच्या दिवसात दोन्ही बाजुंनी समाजमाध्यमांवर जो आरोप प्रत्यारोप सुरू होईल त्याचीही आता देशाला सवय लागलेली आहे. गेली 27 वर्षे दिल्लीच्या सत्तेतून बाहेर असलेला भाजप आणि तीन निवडणुका सर्व विश्लेषकांच्या अंदाजांना सपशेल तोंडावर पाडणारा आप यांच्यामध्येच खरी लढत आहे. कधीकाळी दिल्लीत आपला दबदबा निर्माण केलेल्या काँग्रेसला शीला दीक्षित यांच्यानंतर सर्वसमावेशक आणि सर्वमान्य नेतृत्व लाभलेले नाही. 2012 मध्ये निर्माण झालेल्या वातावरणानंतर त्यांची सद्दी संपली आणि आम आदमी पक्षाचा उदय झाला. आता हा पक्ष आणि भाजप हेच प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत असे देशभर वातावरण आहे. दिल्लीच्या मनात आताच्या घडीला काँग्रेसबद्दल काय भावना आहे आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेनंतर बदललेल्या वातावरणाचा काय परिणाम होणार याचे उत्तर यावेळी तरी काँग्रेसच्या बाजुने जनता देते का? हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवडणूक फॉर्म्युल्याने देशातील निवडणुकीचे वातावरणच बदलून गेलेले आहे. निकालादिवशी सकाळपासून पुढे चाललेले उमेदवार दुपार होईपर्यंत पराभवाच्या छायेत पोहोचतात असे चमत्कार अनेकदा झालेले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ठराविक भाग म्हणजे अमूक एका पक्षाची पक्की मतपेढी असा विश्वास आता देशातील कुठल्याही भागात लोक किंवा नेते धाडसाने व्यक्त करू शकतील अशी स्थिती राहिलेली नाही. त्यादृष्टीने सुक्ष्म व्यवस्थापन करणारी भाजपची यंत्रणा लक्षात घेतली आणि प्रचार ते ज्या गांभिर्याने घेतात ते लक्षात घेतले तर दिल्लीपुरते तरी त्यांची लढाई आम आदमी पक्षाच्या तितक्याच सुक्ष्म पध्दतीने राबविल्या जाणाऱ्या प्रचार पध्दतीशीच होऊ शकते. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हे बारा महिने, चोवीस तास निवडणूक मोडमध्ये असतात. आम आदमी पक्षाचे नेते तसे दाखवत नसले तरी त्यांची प्रत्येक कृती आणि कार्यक्रम हा लोकांना आपल्या पक्षासोबत जोडुन ठेवणाराच असतो. त्यादृष्टीने दिल्लीच्या गल्ली बोळात त्यांनी केलेले काम या पक्षाच्या स्थापनेपासून त्याला घवघवीत यश देत आले आहे. केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने असो किंवा काँग्रेसने असो ज्या तीव्रतेने प्रचार केला त्याचा फारसा परिणाम दिल्लीच्या जनतेवर गेल्या तीन निवडणुकात तरी झालेला दिसलेला नाही. उलट देशात मोदींची लाट आली असताना सुध्दा त्यांच्या पक्षाची दिल्ली विधान सभेतील अवस्था दयनीय अशीच होती. वैशिष्ट्या म्हणजे राज्यातील भल्या भल्या नेत्यांच्या राजकीय पक्षांमध्ये फाटाफूट झाली. आमदार फुटले, सत्तांतर घडले. पण, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रमुख नेते जेलमध्ये धाडले तरी सुध्दा सत्तांतर घडेल इतके आमदार दिल्लीत भाजपला फोडता आले नाहीत. ऑपरेशन लोटसचा देशभर परिणाम होत असताना तो दिल्लीत मात्र यशस्वी झाला नाही. निवडणूक काळात उमेदवारी जाहीर होताना या पक्षातील काही मंडळींनी भाजप व इतर पक्षात प्रवेश केला. मात्र प्रत्यक्ष विधानसभा अस्तित्वात असताना त्यांच्यातील कोणीही फुटले नाहीत हा देशातील एक वेगळाच चमत्कार ठरलेला आहे. भले भले नेते गेल्या 11 वर्षात आपला तगडा राजकीय पक्ष सोडून भाजपच्या तंबूत दाखल झाले. काही तर भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत बरबटलेले असताना देखिल पवित्र होऊन पक्ष त्यागकर्ते झाले. पण, आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाच्या बाबतीत हे घडू शकले नाही हे लक्षात घेण्यासारखेच आहे. राजकारणाची दोन मॉडेल्स दिल्लीच्या दृष्टीने विचारात घेतली तर नरेंद्र मोदी यांच्या विकास आणि आक्रमक हिंदूत्ववादाच्या विचाराचे एक मॉडेल आहे. त्याला राष्ट्रवादाची जोड देण्यात ते कधीही मागे पडत नाहीत. त्याचा परिणाम देशातील ओबीसी या प्रभावी घटकावर इतका मोठा झाला आहे की, त्यांनी या देशातील निवडणूक निकालांना अनेक राज्यात भाजपच्या बाजुने एकतर्फी केले. काही ठिकाणी तर भाजप आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेपेक्षाही भरभरून दिले. याचा परिणाम दलित आणि मुस्लीम हे जे घटक आहेत ते कधीच भाजपला मतदान करणार नाहीत असा अनेकांचा अंदाजही फोल ठरल्याचे अनेक ठिकाणांच्या मतदानातून लक्षात आले आहे. अर्थात या विरोधात देशातील सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमचा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत आता काय होते याची त्यामुळेच अधिक उत्सुकता आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात वसंत पंचमीत ऋतू बदलतो तसा 5 फेब्रुवारीनंतर दिल्लीतील राजकीय ऋतु भाजपच्या बाजुचा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर त्या वक्तव्याच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे. अर्थात हा मतदार किंवा दिल्लीतील मध्यमवर्ग हा गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपचा मतदार झाला आहे. त्या मतदाराला देवदर्शन यात्रा वगैरे करून भाजपच्या फॉर्म्युल्याला टक्कर देण्याचा केजरीवाल यांनी प्रयत्न केला. दिल्लीत लाडकी बहिण योजनेचाही उच्चार झाला असला तरी तिथे आपने तो आधीपासून सुरू केला होता आणि एकाअर्थाने तिथला प्रतिसाद पाहूनच देशातील इतर राज्यांनी त्याची नक्कल केली होती. त्यामुळे याहून वेगळा प्रयत्न भाजप काय करणार? हा प्रश्न होता. तो निर्मला सीमारामन यांच्या बजेटने 12 लाखापर्यंत करमुक्ती करून धक्का दिला आहे. दलितांसाठी आणि महिलांसाठी भाजपने केलेल्या घोषणा काय परिणाम साधणार हा देखिल महत्वाचा मुद्दा असेल. दिल्लीसोबत आम आदमी पक्षाला पंजाबची सत्ता मिळाली ती शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर झाल्याने. शीख आणि पंजाबी समुदाय यंदाच्या निवडणुकीत काय भूमिका घेतो यावर आम आदमी पक्षाचे लक्ष आहे. अशा या दोन्ही बाजुंच्या ताकदीची तोल, मोल करणाऱ्या घटकांसोबतच काँग्रेसही एक कंगोरा आहे. मतदार यामध्ये कोणाकडे अधिक कृपादृष्टी करतात, दिल्लीच्या मनात काय आहे हे समजून घेण्यास त्यामुळेच देश उत्सुक झाला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.