महायुतीत चाललंय काय !
राज्यात महायुतीचे सरकार आलेल्याला आता तीन महिने होतील, मात्र अद्यापही महायुतीतील खडखडाट काही कमी होताना दिसत नाही. महायुतीतील भाजपला एकनाथ शिंदे नकोसे झालेत. आधी मुख्यमंत्री मग खातेवाटप, मग पालकमंत्री पदावऊन नाराजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांचे महायुतीतील महत्त्व कमी करण्याचा कुठे तरी प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. अनेकदा त्यांची नाराजीही उघडपणे समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप, पालकमंत्री पदाच्या वाटपापर्यंत भाजप आणि शिंदे गटातील मतभेद जाहीरपणे समोर आले. त्यामुळे महायुती सरकारमध्ये काही आलबेल नसल्याचे बोलले जात होते. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोशल वॉर रूमसंदर्भात बैठक बोलावली होती.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटाल उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले. त्यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले असले तरी, यावेळी मात्र शिंदे यांनी गावाला जाण्याचे टाळले. शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद असल्याचे समोर आले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील सुंदोपसुंदी वाढताना दिसत आहे. ऐनवेळला अजित पवार महायुतीत आल्याची सल शिवसेना शिंदे गटाला आहेच, भाजप राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळेच शिंदे यांना अनदेखा करत असल्याचे बोलले जात आहे. त्याच भावनेतून शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपले पुत्र योगश कदम यांचा राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी काम केला नसल्याचा आरोप केला, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबतच अनेक दावे करताना खळबळ उडवणारे वक्तव्य केले आहे. भाजपने शिंदे यांना विधानसभा निवडणुका तुमच्यात नेतफत्वाखाली लढू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता कऊ नका, निवडणुकीत सढळ हस्ताने खर्च करा, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांना वाटत असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आमदाराने सांगितल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला, तर दुसरीकडे शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात असून, दिल्लीच्या एजन्सी हालचालींवर पाळत ठेऊन असल्याचा शिंदे यांना संशय असल्याचे देखील या जवळच्या माणसाने सांगितल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी सांगितलेली माहिती खरी की खोटी हा नंतरचा विषय मात्र यामुळे महायुतीत पडद्याआड अनेक घडामोडी असल्याचे दिसत आहे.
शिंदे गटाचे नेते एकीकडे भाजप शिवसेनेच्या सोबत नसती तर शिवसेनेला इतके यश मिळाले नसते असे बोलत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळेच राज्यात भाजपला बहुमत मिळाल्याचे सांगत आहेत. राज्यात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत व्यक्त केलेली नाराजी, शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी घेतलेला पुढाकार, त्यामुळे कुठेतरी हे नाराजी नाट्या भाजपच्या मनात कायम आहे. त्यामुळे शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत तर सहभागी कऊन घेतले, मात्र त्यांना वेळोवेळी इशारा देण्याचे काम आता भाजप करत असल्याचे दिसत आहे. भाजपचे नवी मुंबईचे मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी थेट ठाण्यात जनता दरबार घेण्याचे जाहीर केले. एकनाथ शिंदे यांच्या होमपिचवरच त्यांना शह देण्याची भाजपकडून कुठे तरी रणनिती आखली जात असल्याचे दिसत आहे, तर रविवारी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या प्रकरणाताल आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या विरोधात महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी उल्हासनगर पोलीस उपायुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढला. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत, ‘जर न्याय मिळाला नाही, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात हा मोर्चा नेऊ,’ असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे हे सर्वात भ्रष्टाचारी आहेत, माझी त्यांनी आर्थिक फसवणूक केली असून मुख्यमंत्री शिंदेंमुळेच गुंडगिरी वाढली असल्याचे माध्यमांसमोर जाहिरपणे सांगितले होते. ते पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे महत्त्वाचे. भविष्यात मुंबई ठाण्यानंतर महत्त्वाची मानली जाणारी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक होणार आहे. शिवसेनेचे वर्चस्व असणारी ही महापालिका भाजप ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे यांना ठाणे, कल्याण डोंबिवली या त्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपने तयारी केली आहे. गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यासाठी कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांची कार्यक्षमता आणि राजकीय महत्त्वकांक्षा याचा अंदाज भाजपला गेल्या अडीच वर्षात आला आहे. आजही एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर या भागातील विविध पक्षातील नाराज नेते पक्षत्याग करताना भाजपपेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेला फेव्हर करताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे यांची राजकीय विश्वासार्हता आजही कायम असल्याचे दिसत आहे. ही विश्वासार्हता भाजपसोबत सत्तेत राहून कायम ठेवण्याचे आव्हानच शिंदे यांच्यासमोर असणार आहे.
प्रवीण काळे