जो जो जयाचा घेतला गुण
माणसांच्या सभोवताली वावरणारे छोटेसे जीव ज्यांना माणसांच्या जगात क्षुद्र म्हणून हिणवले जाते ते माणसांच्या आयुष्यात, जगण्यात आणि वाणीत नेहमी लुडबुड करत असतात. अध्यात्मामध्ये सर्व जीव सारखे आणि मोलाचे असतात; म्हणून त्यांचे दृष्टांत, दाखले वारंवार येतात. उक्रांती आणि बुद्धी यामुळे जरी जीवसृष्टी निराळी भासत असली तरी ‘जगा आणि जगू द्या’ हे सूत्र मध्यवर्ती ठेवून संत मंडळींनी दृष्टीस पडणाऱ्या, जंगलात असणाऱ्या आणि चर्मचक्षूंना न दिसणाऱ्या अशा अनेक जीवांना आपल्या वाङ्मयात स्थान दिले.
ऋतू बदलला की असंख्य जीव माणसाला सृष्टीत दिसत असतात. वसंतऋतूमध्ये कोकिळ पक्षी गाऊ लागतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला बेडूक उड्या मारताना दिसतात. डास, झुरळे, मुंग्या, पाली वातावरणात बदल झाला की सर्वत्र आढळतात. एरवी वर्षभर त्यांची माणसाला आठवणसुद्धा राहत नाही. हे सगळे जीव निसर्गनियमानुसार वागतात. माणूस मात्र स्वत:च्या मनाने वागायला जातो आणि निसर्गापासून दूर जात परावलंबी होतो. साधारण म्हटल्या जाणाऱ्या जीवामध्येही गुरुत्व असते आणि त्याची देखील सृष्टीमध्ये एक विशिष्ट जागा असते हे माणसाला समजावे म्हणून संतसाहित्यात या जीवांचा उल्लेख आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत असत की, ‘एक मोठे यंत्र आहे, ज्याला पाचशे स्क्रू आहेत. एखादा स्क्रू ढिला झाला तर यंत्र बंद पडत नाही; परंतु त्या मानाने ते यंत्र ढिले पडते. त्याप्रमाणे माणसाने जर कर्म मनापासून केले नाही तर विश्वाची रचना ढिली पडते. माणूस सृष्टीमधला सर्वात उक्रांत प्राणी आहे; परंतु स्वार्थापायी तो आंधळा होतो. त्याची दृष्टी स्थिर असावी म्हणून ज्ञात, अज्ञात जीवसृष्टीची ओळख संत करून देतात.
कडाडते ऊन्ह उतरणीला येऊन पाऊस भेटीला आला की सभोवताली अनेक जीवांची उत्पत्ती होते. त्यामध्ये माणसाला घृणा आणणारा जीव म्हणजे माशी. पावसाळ्यात जिकडेतिकडे माशा दिसू लागतात. जिथे माणसांचा समूह असतो तिथे तर त्यांची वस्तीच असते. घाणीत तर त्यांचे साम्राज्य असते. माशीसारखा नकोसा जीव माणसाच्या बोलण्यामध्ये मात्र नेहमी डोकावतो. एखाद्या मख्ख माणसाला बघून माशी आठवते. तोंडावरची माशी हलत नाही असे म्हणतात. एक प्रसिद्ध संस्कृत लोकोक्ती आहे. ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात?’ याचा अर्थ असा आहे की भोजन करण्यापूर्वीच पहिल्याच घासाला ताटात माशी पडणे. याचा उपयोग बोलण्यात कधी होतो? तर जेव्हा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना विघ्न किंवा बाधा उत्पन्न होते. ज्यामुळे काम पूर्णत्वाला जात नाही. शुभकार्यारंभापूर्वी विघ्न आले की ही लोकोक्ती ओठांवर येते. एखाद्या समारंभात वेळेपूर्वी पोहोचलेल्या माणसाच्या मनात येते की कशाला लवकर आलो. उगीचच माशा मारायला की काय? मिष्ठान्न आणि विष्ठा या दोन्हींवर बसणारी माशी नावडती असली तरी अध्यात्मात तिला स्थान आहे.
एका जनार्दन ही नाम मुद्रा धारण करणारे संत एकनाथ महाराज सगळीकडे जनी जनार्दन बघत. सार्थ श्री एकनाथी भागवतामध्ये अवधूतगीता आहे. यदु-अवधूत संवादाची सुरुवात अशी आहे, ‘जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्या केला जाण । गुरुसी आले अपारपण ।जग संपूर्ण गुरू दिसे?’ अवधूत म्हणतात, ‘हे राजा, मी दोन प्रकारच्या माशा गुरू केल्या. ‘एक ते मोहळमासी ।ग्रामवासी । दुसरी एक मधमाशी आणि दुसरी साधी माशी. घरातली माशी साखरेच्या ढिगावर बसली की आपल्या हातांनी साखर तोंडात घालते परंतु तिच्याजवळ संग्रह मुळीच नसतो. योगी, संन्याशाने मिळेल ती भिक्षा हातात घेऊन तोंडात घालायची. हात हे भिक्षापात्र तर पोट हे साठवण. याहून वेगळा संग्रह नको. अन्नाचा संग्रह भिक्षूने करू नये. संग्रहाचा नाश होतो म्हणून मी मधमाशीला गुरू केले. मधमाशी कष्ट करून अडचणीच्या जागी उंच वृक्षांवर पोळे बांधून त्यात मध साठवून ठेवते. मध ती स्वत: खात नाही व दुसऱ्या कुणास देतही नाही. एक दिवस अचानक मध जमा करणारी माणसे येऊन तिचा प्राण घेत पोळ्यातला मध घेऊन जातात. त्याप्रमाणे एखादा कृपण मनुष्य महत्प्रयत्नाने द्रव्यार्जन करून संग्रह करतो. त्याचे ते द्रव्य कुणीतरी एकाएकी हरण करतो. द्रव्य हे विनाशाचे फळ आहे तसेच नाशाचेही मूळ आहे. सत्कर्म आचरावे व शुद्ध धर्माचा संग्रह करावा. हे मर्म समजून घ्यावे हा उपदेश नाथमहाराजांनी साधकांसाठी केला आहे.
प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी श्रीदत्तमहात्म्य या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंचे वर्णन केले आहे. त्यात तेविसावा गुरू पेशस्कर आहे. पेशस्कर म्हणजे मातीच्या भिंतीला छिद्रे पाडून त्यात घर करणारी कुंभारीण माशी. निसर्ग अभ्यासक, संशोधक तिला गांधील माशीचा एक प्रकार मानतात. ती गोल मडक्यासारख्या असलेल्या छोट्या घरात आपली अंडी घालते. तिथे ती काही अळ्या आणि कीटक आणून टाकते. त्यात त्यांना आपल्या शरीरातले एक जहाल औषध टोचते. हा दंश एवढा भयंकर असतो की ते बेशुद्ध पडतात. कुंभारीण माशीच्या अळ्या जन्माला आल्या की या बेशुद्ध अळ्या त्यांचे अन्न असते. अध्यात्म थोडे वेगळे सांगते की नांगीचा दंश झालेली अळी जागी होऊन कुंभारीण माशीचा धोसरा अर्थात धाक घेते आणि तिचेच ध्यान करते. हे ध्यान पुढे इतके तीव्र होते की एक दिवस त्या अळीला पेशस्काराचेच म्हणजे कुंभारीण माशीचे रूप प्राप्त होते. अवधूत म्हणतात, अळी जर धाकाने तद्रूप होते तर मग भक्तीप्रेमाने परमेश्वराचे ध्यान करणारा मानव ईश्वरत्वाला का पावणार नाही? मुळातच ब्रह्म असलेला जीव ध्यानाच्या प्रभावाने ब्रह्म होतो. यात नवल काहीच नाही.
माणसाचे आयुष्य जेवढे वेगवान तेवढेच अस्थिर होत चालले आहे. उद्या सकाळी आपण डोळे उघडून हे जग पाहू शकू का? ही खात्री मनुष्याला देता येत नाही. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मनुष्याचा देह हा पंचमहाभूतांचा आहे आणि कर्माच्या दोरीने गुंफलेला आहे. जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून तो गरागरा फिरतो आहे. माऊली म्हणतात, ‘हे काळा न काळाचा कुंडी । घातली लोणीयाची उंडी । माशी पांखु पाखडी । तव हे सरे ।’ काळरूपी अग्नीच्या कुंडात हा देह म्हणजे लोण्याचा गोळा जणू घातलेला आहे. माशी आपले पंख फडफडवते तेवढ्या काळातच हा देह नाश पावतो. देहाची क्षणभंगुरता माऊली सांगतात तरी माणसाची देहबुद्धी काही जात नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, विस्तव आणि मिठाई दोन्ही लाल रंगाचे असतात. परंतु माशी नेमकी मिठाईवर जाऊन बसते. तिला ठाऊक असते की विस्तवावर बसलो तर आपण नष्ट होऊन जाऊ. त्याप्रमाणे मानवी मनालाही ठाऊक असते की जीवाचे ध्यान शिवावर केंद्रित झाले की जीव हा शिवस्वरूपात विलीन होतो. मनाचे रूपांतर अमनात होते. मन आणि मी व माझे यात बद्ध असलेला जीव मनपण सोडायला घाबरतो आणि मिथ्याभूत देहात व प्रपंचात गुंतून जातो. माशी दिसली की लगेच तिला हाकलून देणारा माणूस तिच्याकडूनही जगण्याचे अमूल्य शिक्षण घेऊ शकतो, हे मात्र खरे!
स्नेहा शिनखेडे