भक्त जे जे करेल ते ते सर्व त्याने बाप्पांना अर्पण करावे
अध्याय सातवा
आपण बाप्पांच्याकडून पूजाविधी जाणून घेत आहोत. बाप्पा म्हणाले, पूजेच्या आधी स्नान करावे. नंतर प्राणायाम करून चित्त स्थिर करावे. त्यानंतर न्यास करावेत. त्यामुळे देह पवित्र होऊन त्याला पूजा करायचा अधिकार मिळतो. तसेच पूजा करत असताना मन अस्थिर होणे, ग्लानी किंवा सुस्ती येणे, भ्रम उत्पन्न होणे हे सर्व टळून जप, नामस्मरण किंवा कोणतेही कार्य करायची ताकद शरीरात निर्माण होते. शास्त्राsक्त पूजा करून झाल्यावर गुरुमुखाने प्राप्त झालेला मंत्र स्थिरचित्त होऊन जपावा. सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप करत असताना ते आपल्या पाठीशी उभे असतात. जप केल्यावर तो देवाला अर्पण करून स्तोत्रांनी अनेक प्रकारे त्याची स्तुती करावी. याप्रकारे जो माझी उपासना करतो त्याला शाश्वत मोक्ष प्राप्त होतो. त्याच्या हृदयातला अंध:कार दूर होऊन तो कायम समाधानात राहतो. म्हणून प्रत्येकाने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करावा. त्यातच मनुष्यजन्माचे कल्याण आहे.
येथून पुढील श्लोकात सर्वत्र मीच कसा व्यापून आहे ते बाप्पा सांगत आहेत.
यज्ञोऽ हमौषधं मंत्रोऽ ग्निराज्यं च हविर्हुतम् ।
ध्यानं ध्येयं स्तुतिं स्तोत्रं नतिर्भक्तिरुपासना ।। 18।। त्रयीज्ञेयं पवित्रं च पितामहपितामहऽ ।
ओंकारऽ पावनऽ साक्षी प्रभुर्मित्रं गतिर्लयऽ ।।19।। उत्पत्तीऽ पोषको बीजं शरणं वास एव च ।
असन्मृत्युऽ सदमृतमात्मा ब्रह्माहमेव च ।।20।।
अर्थ- मी यज्ञ आहे, औषध आहे, मंत्र, अग्नि, राज्य, हविर्द्रव्य, हवन, ध्यान, ध्येय, देवता, स्तुति, स्तोत्र, नमन, भक्ति, उपासना, वेदांनी जाणण्याला योग्य असे पवित्र ब्रह्म, पितामहाचा म्हणजे ब्रह्मदेवाचा देखील पितामह, पवित्र करणारा ओंकार, साक्षी, प्रभु, मित्र, गती, नाश, उत्पत्ती, पोषक, बीज, शरणस्थान, निवास, असत्, मृत्यु, सत्य, मोक्ष, हे सर्व मीच आहे.
विवरण- वरील श्लोकातून बाप्पांना हेच सांगायचं आहे की, सृष्टी जरी नाना रूपांनी नटलेली असली तरी ही सर्व रूपं त्यांचीच आहेत. ह्यावरून लक्षात येते की, सर्व समोर दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती म्हणजे बाप्पाच आहेत. तेव्हा प्रत्येकाशी वागताना, बोलताना आपण आदरानं वागलं, बोललं पाहिजे. पंढरीचे वारकरी प्रत्येकात विठुमाऊलीचं रूप पाहतात आणि म्हणूनच ते माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात. ह्यामागचं रहस्य हेच आहे. तेव्हा आपल्या समोर बाप्पाच उभे आहेत हे लक्षात घेऊन सर्वांशी आदराने वागावे, विनयाने बोलावे अशी शिकवण आपण बाप्पांच्या सांगण्यातून घेऊयात. पुढील श्लोकात बाप्पा सांगतात की, भक्त जे जे करतो ते ते त्याने मला अर्पण करावे.
दानं होमस्तपो भक्तिर्जपऽ स्वाध्याय एव च।
यद्यत्करोति तत्सर्वं स मे मयि निवेदयेत् ।।21।।
अर्थ- दान, होम, तप, भक्ति, जप, स्वाध्याय असे भक्त जे जे करेल ते ते सर्व त्याने मला अर्पण करावे.
विवरण- कुटुंबातील प्रिय व्यक्तींना मनुष्य नेहमीच कुटुंबियांना हव्या असलेल्या वस्तू अत्यंत आनंदाने व परतफेडीची कोणतीही अपेक्षा न करता द्यायला तत्पर असतो. तत्पर म्हणजे त्यांनी सांगायचा अवकाश लगेच ती वस्तू तो हजर करतो. यामागे कुटुंबियांबद्दल वाटत असलेला आपलेपणा असतो. कुटुंबियांना हवं असेल ते देण्यासाठी एक वेळ स्वत:ला नसलं तरी चालेल असा त्यामागचा विचारही स्वखुशीने होऊ शकतो. थोडक्यात आपल्या प्रिय व्यक्तीसाठी मनुष्य काय वाटेल ते करायला तयार असतो. बाप्पांची भक्तांकडून हीच अपेक्षा आहे की, भक्तानं त्यांना आपलं म्हणावं. ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबियांची आपण जे करू ते त्यांच्या भल्याचंच असणार अशी शंभर टक्के खात्री असते. त्याप्रमाणे बाप्पा जे जे करतील ते आपल्या हिताचंच असेल या खात्रीनं आनंदात रहावं.
क्रमश: