लोटेतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’चे काय होणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक ही कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इटलीतील मिटेनी या प्रदुषणामुळे बंद पडलेल्या कंपनीचे तंत्रज्ञान व उपकरणे या कंपनीने खरेदी करून लोटे येथे आणल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांकडून होतो आहे. यामुळे कोकणात प्रदुषणाचा मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली असून वातावरण तापू लागले आहे.
प्रदूषण, मानवी आरोग्यास धोका, विस्थापन आणि जमिनी परप्रांतीय भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या मुद्यांवरून रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प आणि ग्रीन रिफायनरी या दोन भव्य प्रकल्पांना स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि काही राजकीय पक्षांकडून झालेला तीव्र विरोध सर्वश्रुत आहे. आता या प्रकल्पविरोधी संघर्षात आणखी एका प्रकल्पाची भर पडतेय की काय, अशी परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. फरक एवढाच आहे की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि बारसू रिफायनरी प्रकल्प उभा राहण्याअगोदरच त्याला प्रखर विरोध झाला होता. लक्ष्मी ऑरगॅनिकचे मात्र तसे नाही. पाच वर्षापूर्वी कंपनीला विविध परवानग्या तसेच भूखंड प्राप्त झाला. त्यानंतर कंपनीची उभारणी पूर्ण झाली. सुमारे चारशे कामगारांची भरती होऊन उत्पादन चाचणीदेखील सुरू झाली आहे. स्थानिकांना विविध कंत्राटेही देण्यात आली आहेत. परंतु आता कंपनीतून उत्पादने बाहेर पडण्याच्या वेळेला अचानकपणे प्रदुषणकारी कारखाना म्हणून या कंपनीला विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे संबंधित कारखाना प्रदुषणकारी आहे किंवा नाही हे समजायला इतके दिवस का लागले, हा प्रश्न येथे उपस्थित होतो. राजकीय पुढाऱ्यांनाही याचा काहीच मागमूस लागला नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होते आहे. आता विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेते आणि प्रकल्पविरोधी आंदोलन कितपत यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
इटली देशाने बंदी घातलेला प्रदुषणकारी प्रकल्प कोकणात येऊ घातल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाला अन् एकच खळबळ उडाली. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उद्योग तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एखादा प्रकल्प कोकणच्या मुळावर उठणारा असेल तर तो आपण कधीही होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जर कंपनी घातक आहे, असे स्पष्ट झाले तर कंपनीवर बंदी आणली जाईल. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटिसांचा अधिकृत खुलासा होईपर्यंत इतर कोणत्याही माहितीवर जनतेने विश्वास ठेऊ नये. कोकणच्या पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याला धोका ठरणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला शासन पातळीवर थारा दिला जाणार नाही. सरकार कायम जनतेच्या बाजूने असेल, असा शब्द सामंत यांनी दिला आहे. याचदरम्यान 22 डिसेंबर रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबईतील मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लोटेत चौकशीसाठी दाखल झाले होते. सध्या या कंपनीने आपल्या उत्पादनासाठी केवळ चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांमधील टाकाऊ माल जाळण्यासाठी तळोजा येथे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पुढे आली आहे. 4 नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तो पुढे तज्ञ समिती स्थापून त्यांच्याकडे पाठवला जाणार आहे. या तज्ञ समितीकडून खात्रीशीर अहवाल आल्यानंतरच कंपनीबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. एकूणच हा प्रकल्प सध्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर आला आहे.
लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीसुद्धा 24 डिसेंबर रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल़ी कंपनीने कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन कराव़े स्थानिक नागरिकांच्या भावना आणि चिंता समजून घ्याव्यात, अशा सूचना पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आल्या. सध्या कंपनीतील तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पेटंट्स यांसह विविध परवाने आदींची तपासणी केली जात आहे. त्यानिमित्तानं नेमकं खरे काय आणि खोटे काय, याविषयीची तपासणी सुरू झाली आहे.
निर्माण झालेल्या वादाबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (एलओआयएल) कामकाजाची माजी इटालियन कंपनी मिटेनी स्पा यांच्या कार्यपद्धतीशी करण्यात येणारी तुलना पूर्णत: चुकीची व दिशाभूल करणारी आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड भारतातील आघाडीची वैविध्यपूर्ण रसायन उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या लोटे येथील कारखान्याचे कामकाज लागू असलेल्या भारतीय पर्यावरणीय, सुरक्षा आणि नियामक आवश्यकतांचे पूर्ण पालन करून सुरू आहे. स्थापनेपासून सर्व वैधानिक मंजुरी कंपनीने प्राप्त केलेल्या आहेत. सर्व प्रक्रिया उत्सर्जने आणि सांडपाण्याची शास्त्राrय पद्धतीने प्रक्रिया करून शासन मान्यताप्राप्त सुविधेमध्ये विल्हेवाट लावली जाते. लोटे सुविधा केंद्रातून पर्यावरणात कोणत्याही प्रकारचे घातक सांडपाणी सोडले जात नाही. मिटेनी प्रकरणामध्ये अनेक दशकांपर्यंत थेट सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे तेथे गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक परिणाम झाले. भारताच्या कठोर नियामक चौकटींतर्गत अशा पद्धतींना परवानगी नाही. येथे कठोर पर्यावरणीय मंजुरी, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि कडक अनुपालन मानके अनिवार्य आहेत. कंपनीची लोटे उत्पादन सुविधा क्लोज्ड-लूप प्रणालींवर कार्यरत असून त्यामुळे कोणतेही हानीकारक पदार्थ पर्यावरणात सोडले जाण्यापासून प्रतिबंध केला जातो. घातक कचरा आणि सांडपाणी राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त सामायिक घातक कचरा प्रक्रिया, साठवण व विल्हेवाट सुविधा केंद्रात पाठवले जाते. तिथे त्याची शास्त्राrय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यामध्ये जाळून नष्ट करणे याचाही समावेश आहे. कंपनी घातक कचरा व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतींचे पालन करते. त्यात पूर्ण डिजिटल ट्रेसिबिलिटी, प्रगत सुरक्षा प्रणाली, उच्च क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया पायाभूत सुविधा, कंटेन्मेंट उपाययोजना आणि अभेद्य फ्लोअरिंग यांचा समावेश आहे. अशा प्रकारे कठोर नियामक अनुपालन सुनिश्चित होते आणि कोणताही हानीकारक पर्यावरणीय परिणाम होण्यास प्रतिबंध केला जातो. कंपनीचे लोटे येथील प्रकल्पस्थळ हे बहु-तंत्रज्ञान आणि बहु-उत्पादन स्थळ असून त्यामध्ये फ्ल्युरिनयुक्त आणि
नॉन-फ्ल्युरिनयुक्त उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने सेमी कंडक्टर्स, संरक्षण, वीज ग्रिड्स, इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी रसायने, औषधनिर्माण उद्योग इत्यादी अनेक नव्या, अत्याधुनिक व सध्या सुऊ असलेल्या उद्योगांसाठी अत्यावश्यक आहेत. फ्ल्युरिनयुक्त उत्पादने भारतात तसेच जागतिक स्तरावर जबाबदारीने आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात, असे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान कंपनीकडून प्रकल्प निर्धोक असल्याचा दावा केला जात असला तरी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला आहे. इटलीने हद्दपार केलेल्या कारखान्याला परवानगी कोणी आणि का दिली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. कारण हा प्रकल्प त्यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात येतो. विशेष म्हणजे खासदार तटकरे आणि त्यांची कन्या तथा महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे या सत्तेत सहभागी आहेत. ठाकरे शिवसेनेनेही या प्रकल्पास विरोध दर्शवला आहे.
काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी 8 जानेवारी रोजी कंपनीसमोर निदर्शने करणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिलेल्या सर्व रासायनिक व अन्य कंपन्यांची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. एकूणच हा प्रकल्प विरोधी सूर पाहता याक्षणी त्यापुढे टीकाव धरण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीसमोर आहे. तर खात्रीशीर अहवाल प्राप्तीनंतर शासन काय भूमिका घेते, याकडे कोकणवासियांचे लक्ष लागून आहे.
महेंद्र पराडकर