काय होणार सोन्याचं?
जागतिक स्तरावर अमेरिकेने विविध देशांना व्यापारी शुल्काची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून त्यांचे इतर देशांशी संबंध काहीसे तणावाखाली असणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये विविध देशांकडून प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर व्यापार शुल्क आकारणीचे धोरण राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच दरम्यान भारतामध्ये सध्याला सोन्याबाबत चर्चा होताना पहायला मिळते आहे. 90 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असणारा आजचा सोन्याचा दर येणाऱ्या काळामध्ये 55 हजार रुपयांपर्यंत घसरणार असल्याची चर्चा विविध माध्यमांवर होते आहे. त्या अनुषंगाने भारतीयांना याबाबत अधिक उत्सुकता लागून राहिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी शुल्काची घोषणा केल्यानंतर सोन्याचे दर भारतात 55 हजार रुपयांच्या स्तरावर येतील, अशी माहिती पुढे आली आहे. अमेरिकेतील वित्तीय सेवा फर्म मॉर्निंग स्टार यांनी तसा अंदाज वर्तविला होता. त्यांच्या अहवालामध्ये भारतात सोन्याच्या किंमती येणाऱ्या काळात प्रती 10 ग्रॅम 55 हजारांपर्यंत खाली येऊ शकतील, असे म्हटले आहे. याबाबत मात्र भारतातील तज्ञ गुंतवणूकदारांनी किंमती इतक्या खाली येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वरील 55 हजार रुपयांचा अंदाज त्यांच्याकडून पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सोन्याचा पुरवठा वाढून मागणी कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रिय बँका जागतिक स्तरावर सोन्याचा साठा करण्याचे प्रमाण कमी करु शकते. जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहितीनुसार 71 टक्के केंद्रिय बँका या आपल्या सुवर्णसाठ्यामध्ये कपात करु शकतात किंवा आहे तीच स्थिती ठेवू शकतात, असेही म्हटले जात आहे. पुरवठा वाढला, मागणी कमी झाली की दर कमी होतात, हा कल आपण पाहतो. पण तसे सोन्याच्या बाबतीत होईलच म्हणून सांगता येत नाही. 2024 मध्ये पाहता सोन्याचे भाव 30 टक्के वाढलेत तर 2025 मध्ये आतापर्यंत भाव 20 टक्के वाढले आहेत, असेही समजते.
मंदी, व्यापारी शुल्क आणि शेअर बाजार घसरणीत असताना बऱ्याचदा सोन्याच्या किंमती मजबूत होताना पहायला मिळाल्या आहेत. 2008 मध्ये मंदी आली तेंव्हा सोन्याचे भाव 39 टक्के वाढले होते. यानंतर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा समभाग 35 टक्क्यांपर्यंत घसरलेले होते, त्यावेळी सोने 32 टक्के इतके वाढलेले पहायला मिळाले. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता अमेरिकेतील बाजार सरासरी 21 टक्क्यांपर्यंत घसरलेले आहेत. सोन्याच्या किंमती पाहता आधीपासूनच 21 टक्के इतक्या वाढलेल्या असून येणाऱ्या काळामध्ये यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतिहासात असेही दिसून आले आहे की, शेअर बाजार एका तिमाहीत 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला तर सोने वाढताना दिसते. भारतामध्ये येणाऱ्या तीन ते सहा महिन्यात सोन्याच्या किंमती 95 हजारांचा स्तर गाठू शकेल, असे म्हटले जाते. गेल्या 25 वर्षांच्या काळामध्ये पाहता शेअर बाजार जेंव्हा जेंव्हा घसरलेला होता तेंव्हा तेंव्हा सोन्याने गुंतवणूकदारांना सुरक्षा आणि नफा दोन्ही देऊ केले आहे.
आजही सोन्यामध्ये मजबूतता कायम आहे. भूराजकीय तणाव, डॉलरपेक्षा सोन्याची होणारी खरेदी, शेअर बाजारात घसरण आणि महागाई व मंदीची भीती या स्थितीमध्ये सोन्याचे दर वाढतात, असे दिसून येते. वर म्हटल्याप्रमाणे सोन्याची किमत खाली आल्यास महिलावर्ग सर्वात खुश होणार आहे. पण तसे होते का हे येणाऱ्या काळात समजू शकणार आहे. किमती खाली आल्या तरी वर उल्लेख केल्याएवढ्या खाली येणार नसल्याचे अनेक तज्ञांना वाटते. मध्यंतरी सोने 80 हजाराच्या आसपास असतानाच 90 हजारावर सोने जाणार असा अंदाज वर्तवला होता. आणि तो नंतर खराही ठरला. असो. तुर्तास सोन्याचं काय होणार म्हणजेच किमती कमी होणार की वाढणार हे पाहण्यासाठी काही कालावधी थांबावे लागणार आहे.
-दीपक कश्यप