या फेरीत काय होणार ?
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. गेला पूर्ण महिना मध्यपूर्वेतील युद्धात गेल्यामुळे या निवडणुका वृत्तपत्रीय किंवा माध्यम प्रसिद्धीच्या संदर्भात काहीशा मागे पडल्या. या पाच प्रदेशांपैकी सर्वाधिक चर्चेत पश्चिम बंगाल हे राज्य राहिले आहे. या निवडणुका राष्ट्रीय दृष्टीकोनातूनही महत्त्वाच्याच आहेत.
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. येत्या गुरुवारी, अर्थात 9 एप्रिल या दिवशी आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये, तसेच पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभांसाठी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकांची ही फेरी केंद्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने विचार केला, तर या पक्षाला सर्वात जास्त स्वारस्य आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये असणार हे उघड आहे. कारण, आसाममध्ये हा पक्ष आपल्या मित्रपक्षांसह यंदा हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहे. पश्चिम बंगाल या राज्यात मागच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने लक्षणीय यश मिळवले. त्यामुळे यावेळी यापेक्षाही पुढचा टप्पा गाठून सत्तेप्रत पोहचण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. तामिळनाडूत मुख्य संघर्ष या राज्यातील परंपरागत प्रतिस्पर्धी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांमध्येच असल्याचे दिसून येते. जे. जयललिता यांचे निधन झाल्यानंतर अद्रमुक या पक्षाला उतरती कळा लागली. पक्षात फूटही पडली. याचा लाभ द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांना मिळाला. ते गेली दहा वर्षे सत्तेत आहेत. त्यांनीही हॅटट्रिक करण्यासाठी कंबर कसलेली दिसते. पण यावेळी अद्रमुक पक्षाने पुन्हा जोमाने रणसंग्रामात प्रवेश केला असून त्याने भारतीय जनता पक्ष आणि अन्य काही छोटे तामिळ पक्ष यांच्याशी युती केली असून हे सर्व पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. अभिनेता टी. के. विजय याचा नव्याने स्थापन झालेला तमिळगा वेत्री कझगम अर्थात टीव्हीके पक्षही रिंगणात असल्याने या राज्यातील लढत प्रेक्षणीय आणि अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. केरळमध्येही संघर्ष डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडी यांच्यातच नेहमीप्रमाणे आहे. या राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठे यश प्राप्त केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या पक्षाच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या असणे स्वाभाविक. या राज्यात डावी आघाडी गेली दहा वर्षे सत्तेत आहे. तिही हॅटट्रिकसाठी प्रयत्नरत आहे. पुदुच्चेरी हा लहान केंद्रशासित प्रदेश असून त्याचे राष्ट्रीय महत्त्व विशेष नाही. येथे सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीच सत्ता आहे. ती टिकविण्यासाठी आघाडी प्रयत्न करीत आहे. या विधानसभा निवडणूक फेरीला राष्ट्रीय महत्त्व अशासाठी असते, की हे पाच प्रदेश मिळून लोकसभेच्या 116 जागा आहेत, ज्या लोकसभेच्या एकंदर जागांच्या एक पंचमांशापेक्षा काहीशा अधिक आहेत. तामिळनाडूत संघर्ष अद्रमुक आणि द्रमुक अशा दोन स्थानिक पक्षांमध्ये, केरळमध्ये तो मार्क्सवादी आणि काँग्रेस अशा दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये, आसामधील संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये, पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस अशा एक राष्ट्रीय आणि एक प्रादेशिक पक्षामध्ये, तर पुदुच्चेरीत तो दोन स्थानिक पक्षांमध्ये, असे एकंदर स्वरुप आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष आणि स्थानिक पक्ष यांना या निवडणुकांमध्ये स्वारस्य असणे स्वाभाविक आहे. गेला संपूर्ण महिना मध्यपूर्वेतील युद्धात गेला. त्यामुळे वृत्तपत्रे आणि वृत्त माध्यमे यांच्या अग्रस्थानी युद्धाचीच वृत्ते राहिली. परिणामी,निवडणुकांना प्रसिद्धी कमी मिळाली. तरीही, या पाचही प्रदेशांमध्ये पश्चिम बंगालमधील घडामोडी सर्वाधिक चर्चेत राहिल्या. कारण, तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या ‘मतदारसूची सखोल पुनर्सर्वेक्षण अभियाना’ला (एसआयआर) केलेला जीवाच्या आकांताने केलेला विरोध हे आहे. वास्तविक ही प्रक्रिया निवडणुकीला सामोरे जात असलेल्या सर्वच प्रदेशांमध्ये झाली आहे. तामिळनाडूत तर 90 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पण पश्चिम बंगाल सोडून प्रत्येक प्रदेशात ही प्रक्रिया सुरळीत आणि विनासायास पार पडली आहे. बॅनर्जी यांनी मात्र ही प्रक्रिया रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अद्यापही ते त्या करीत आहेत. पण आतापर्यंत प्रत्येकवेळी न्यायालयांनी त्यांना दणका दिला आहे. तेव्हा या राज्यातील विधानसभा निवडणूक यंदा कशा प्रकारे पार पडते, ते पाहणे निश्चितच स्वारस्यपूर्ण ठरणार आहे.