कित्तूर कर्नाटक स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात गैर काय?
आमदार राजू कागे यांचे वक्तव्य : प्रशासनाबाबत यापूर्वी केलेल्या विधानाचेही समर्थन
प्रतिनिधी/ बेंगळूर
कित्तूर कर्नाटक सर्वच क्षेत्रात मागे आहे. त्यामुळे विशेष अनुदान आणि स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात गैर काय? सरकारच्या दुर्लक्षामुळे स्वतंत्र राज्याची मागणी झाली आहे. या मागणीला माझी सहमती आहे, असे आमदार आणि वायव्य परिवहन निगमचे अध्यक्ष राजू कागे यांनी सांगितले.
सोमवारी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कल्याण कर्नाटक भागासाठी विशेष अनुदान आहे. तेथील प्रत्येक आमदाराला 500 कोटी रुपये अनुदान दिले जाते. मात्र, मुंबई कर्नाटक भागाच्या विकासासाठी कोणतेही विशेष अनुदान नाही. पूर्वीपासूनच या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील आमदारांत एकीचा अभाव असल्याने प्राधान्य मिळत नाही. त्यामुळेच कल्याण कर्नाटक स्वतंत्र राज्याची मागणी झाली आहे. या स्वतंत्र राज्याच्या मागणीला माजी संमती आहे. दुर्लक्षित झालेला प्रत्येक भाग स्वतंत्र राज्याची मागणी करणे साहजिकच आहे, असे समर्थन त्यांनी केले.
मी सरकारच्या बाजूने आहे, विरोधात नाही. यापूर्वी प्रशासकीय सुधारणेबाबत काही सल्ले दिले होते, सरकारविरुद्ध वाच्यता केलेली नाही. आमदारांच्या भेटीसाठी मंत्री उपलब्ध असले पाहिजे, असे माझे मत होते. आजही त्या मतावर मी ठाम आहे. सरकारमध्ये असणाऱ्या चुकांची दुरुस्ती व्हावी, असा माझा हेतू होता, असेही ते म्हणाले.
सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा
सरकारच्या योजनांमध्ये आणि प्रशासनामध्ये पारदर्शकपणा असावा, असे म्हणणे चुकीचे आहे का? अनेक श्रीमंत सरकारच्या योजनांचा लाभ घेतात. या योजना पात्र लाभार्थ्यांनाच मिळाव्यात, अशी भूमिका घेण्यात गैर काय?, अशी वक्तव्ये केली तर ते सरकारविरोधी ठरतात का? उत्तर कर्नाटकातील भाषा शैलीमुळे काही जण तसा अर्थ काढत असतील, अशी टिप्पणीही आमदार राजू कागे यांनी केली.
मंत्रिपदासाठी इच्छुक
मी मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. पहिली अडीच वर्षे माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पक्षात माझ्यासारखे अनेकजण जेष्ठ आहेत. त्यांना पुढील अडीच वर्षांकरिता संधी द्यावी असे माझे मत आहे. मला मंत्रिपद दिले तर इतरांपेक्षाही चांगल्या रितीने काम करेन, असे सांगून त्यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.