For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे स्थानकातील बग्गी गाडीचा उपयोग काय?

11:07 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे स्थानकातील बग्गी गाडीचा उपयोग काय
Advertisement

वयोवृद्ध दाम्पत्यांना सेवा देण्यास नकार : प्रवाशांमधून संताप

Advertisement

बेळगाव : प्रवाशांच्या सोयीखातर रेल्वेकडून बेळगाव रेल्वे स्थानकात बॅटरीवर चालणारी बग्गी कार उपलब्ध करून दिली. परंतु चालकाच्या मनमानी कारभारामुळे त्याचा वापर होत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. वयोवृद्ध प्रवाशांनी बग्गी कारसाठी विचारणा केली तरी भाडे आहे, असे सांगून बग्गी कार रेल्वेस्थानकात उभी करून ठेवण्यात आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. देशातील मोठ्या रेल्वेस्थानकामध्ये प्रवासी व त्यांच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी बॅटरीवर चालणारी बग्गी कार उपलब्ध करून देण्यात आली.  सध्या बेळगाव रेल्वे स्थानकात फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू असल्याने प्रवाशांना बग्गी कारची आवश्यकता भासत आहे.

परंतु चालकाच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांशी वादावादी होत आहे. सोमवारी रात्री बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने टिळकवाडी येथील वयोवृद्ध जोडपे जाणार होते. वयानुसार चालता येत नसल्याने त्यांनी बग्गी कारची मागणी केली. परंतु बुकिंग करण्यात आले असल्याचे कारण देत चालकांनी येण्यास नकार दिला. अखेर त्या वयोवृद्ध दाम्पत्याला एकमेकांचा आधार घेत रेल्वे गाठावी लागली. त्यामुळे त्या दाम्पत्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली बग्गी गाडी उपलब्ध होत नसल्याने या सेवेचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.