For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाकावरच्या रागाला औषध काय ?....

06:50 AM Jul 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाकावरच्या रागाला औषध काय
Advertisement

अपेक्षा, आनंद, आश्चर्य, स्वीकार, भीती, घृणा, राग, दु:ख या आठ मुख्य भावना आणि त्यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या शेकडो छटा आपले भावनिक आयुष्य समृद्ध करत असतात. राग ही भावना तर अगदी छोट्या बाळात देखील दिसून येते. वय वाढते तसे या भावनेचे आविष्कार बदलत जातात आणि छटाही!

Advertisement

माझ्याकडे पंधरा सोळा वर्षांची नेहा तिच्या आई वडिलांसोबत येत असे. आई वडिल दोघेही उच्चशिक्षित! आई अत्यंत शिस्तीची, तर वडील अतिलाड करणारे आणि तेवढेच रागीटही!

ही नेहा अभ्यासात अत्यंत हुशार परंतु तितकीच हट्टी होती. रागावर ताबा नाही त्यामुळे वागण्याबोलण्याला काही ताळतंत्र नव्हते. तिच्या मनाविरुद्ध कोणी काही बोलले की थयथयाट सुरु. घरचे जेवण फारसे आवडत नाही म्हणून सतत बाहेरचे खाणे. दुकान, हॉटेलमधेही अगदी क्षुल्लक गोष्टींवरुनही तिथेही भांडत बसायचे, शाळेतही तीच तऱ्हा. सतत डोकेदुखीची तक्रार. ना कधी मैत्रीणींजवळ पटायचे ना धाकट्या बहिणीसोबत.

Advertisement

व्यक्तीमत्व समस्येसाठी तिला मानोविकारतज्ञांची औषधे सुरु होती.

नेहाच्या वडिलांनी परिक्षेतील यशामुळे तिला छान मोबाईल घेऊन दिला. परंतु ती तासनतास मोबाईल पाहु लागली. एक दिवस इअरफोन्स घालुन गाणी ऐकण्यात मग्न असलेल्या नेहाला वडिलांच्या हाका ऐकुच गेल्या नाहीत. हाका मारुनही ती प्रतिसाद देत नाही यामुळे वडील इतके चिडले की त्यांनी मोबाईल घेऊन भिंतीवर आपटला. मोबाईलचा चुराडा झाला.

भेटायला आलेली तिची आई म्हणाली, ‘मॅडम आधी या माणसाला राग आवरायला शिकवा. मग नेहाचे काय ते पाहुया. दोघांचेही हे स्वभाव सांभाळताना मी हैराण झाले आहे. सगळं घरपण हरवुन गेलंय हो!

मॅडम, खरंच रागावर नियंत्रण आणता येते का हो? मी म्हटले हो. ठरवले तर नक्की आणता येते. परंतु थोडा अवधी लागेलच! हरकत नाही पण घराला घरपण तरी येईल!

खरंतर, यामध्ये माझी कसरत होती कारण मला एकाच घरातील दोन भिन्न वयोगटातील व्यक्तींबरोबर काम करायचे होते. शिवाय वडीलांना स्वत:च्या रागाला आवर घालताना लेकीच्या रागाचे नियमन कसे करायचे हे शिकविणे आवश्यक होते. काही भावनिक कौशल्य, आवेगाला आवर कसा घालायचा याची काही तंत्र आणि कोणत्याही गोष्टींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या विचारांना विवेकाची जोड कशी द्यायची यासाठी काही काळ सेशन्स सुरु राहिले. हळुहळु दोघांमध्येही फरक पडू लागला. राग नियंत्रीत करणे जमू लागल्यावर नेहाच्या वडिलांची छातीत दुखण्याची तक्रार आणि नेहाची डोकेदुखीची तक्रारही कमी झाली.

"Any one can become angry that is easy. But to be angry with the right person, to the right degree, at the right time, for the right purpose, and in the right way, this is not easy"

अॅरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्त्याचे हे वाक्य एका चर्चासत्रात आमच्या सरांकडून ऐकले आणि त्या वाक्याने मनाचा ठावच घेतला. रागाच्या संदर्भात इतका साधा, सरळ आणि तरीही दिशादर्शक विचार तोपर्यंत मी ऐकला नव्हता.

राग या भावनेवर लेखन करावेसे वाटते कारण नेहासारखी अनेक माणसे सातत्याने भेटत असतात. नकारात्मक आणि विघातक भावनेच्या आहारी जाऊन शाब्दिक आणि शारीरिक मारामाऱ्या करणाऱ्यांची संख्या समाजामध्ये लक्षणीयरित्या वाढतेय हे असंख्य केसेसमधून आज आपण सारेच पाहतोय.

अपेक्षा, आनंद, आश्चर्य, स्वीकार, भीती, घृणा, राग, दु:ख या आठ मुख्य भावना आणि त्यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या शेकडो छटा आपले भावनिक आयुष्य समृद्ध करत असतात. राग ही भावना तर अगदी छोट्या बाळात देखील दिसून येते. वय वाढते तसे या भावनेचे आविष्कार बदलत जातात आणि छटाही! आधी अस्वस्थता, त्रासिकपणा, चिडचिड मग संताप चीड, वैफल्य क्षोभ किंवा क्रोध आणि अखेर उद्रेक स्फोट वा भडका असे रागाचे टप्पे गाठले जातात.

लहानपणी प्रेमळ, सौहार्दपूर्ण, सुखद अनुभव वाट्याला आल्यास स्वीकार, आनंद, प्रेम, समाधान यासारख्या सकारात्मक भावनांचे संवर्धन होते. या उलट प्रतिकूल, असुखद अनुभवांमुळे निराशा, भीती, राग, दु:ख यासारख्या नकारात्मक भावना वृद्धिंगत होतात. थोडक्यात आपल्या सभोवतालची माणसे, त्यांच्याकडून आपल्या भावनांना मिळणारा प्रतिसाद, आपल्या आजूबाजूचे वातावरण, त्यातून येणारे अनुभव, मिळणारी माहिती अशा सर्व गोष्टीतून व्यक्तीचे भावविश्व आकार घेत असते.

कुठल्याही नकारात्मक भावनेचे परिणाम व्यक्तीच्या शरीरावर आणि मनावर होत असतात आणि त्याचे प्रकटीकरण सुद्धा होते. रागामुळे शरीरावर होणारे दृश्य परिणाम जसे डोळे लाल होणे, हाताच्या मुठी आवळल्या जाणे, कपाळावर आठ्या, शरीर थरथरणे, दात ओठ खाणे इत्यादी अनेकांनी अनुभवले असतील. रागाचे परिणाम सर्व शरीरसंस्थावर सुद्धा होत असतात. जसे अन्नावरची वासना उडणे, आम्लपित्त, रक्तदाब वाढणे, रक्तातील साखर वाढणे, छातीतील धडधड वाढणे, छातीत दुखणे, डोके जड होणे इ.

विशेष म्हणजे इतर कुठल्याही नकारात्मक भावनेपेक्षा राग आणि वैरभावनेमुळे हृदयावर सर्वाधिक हानिकारक परिणाम होत असतात. रागामुळे हृदयाची शरीरात रक्ताभिसरण करण्याची कार्यक्षमता किंवा (पंपिंग एफिशियन्सी) कमी होते. रागामुळे मानसिक स्तरावर होणारे परिणाम हे रागाच्या तीव्रतेनुसार सौम्य ते तीव्र स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ कामातील लक्ष आणि एकाग्रता ढळते. व्यक्तीच्या संवेदनशक्तीवर परिणाम झाल्यामुळे काहीवेळा ती नीटपणे बघू, ऐकू वा बोलू शकत नाही. तिची विश्लेषण शक्ती आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते. अविवेकी विचारांमुळे वितंडवाद, आरडा-ओरडा, शिवीगाळ यांसारखे विपरीत वर्तन घडते. प्रसंगी शारीरिक हिंसा सुद्धा घडते. तीव्र स्वरूपाच्या रागामुळे तर व्यक्ती स्वत:ची जबाबदारी, कर्तव्य इत्यादीचे भान हरवून बसते.

राग हा खरोखर अग्नी बनून स्वत:बरोबर वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला जाळत जातो. क्रोधाला कुठलीही ओळख चालत नाही, की कोणते नाते समजत नाही.

षड्रिपुंपैकी दुसऱ्या क्रमांकावर असलेला क्रोध काय करु शकतो हे सांगणारा गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक सुपरिचीत आहेच.

क्रोधात् भवति संमोह: संमोहात् स्मृतिविभ्रम:।

स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश: बुद्धिनाशात् प्रणश्यति ।।

क्रोधामुळे व्यक्तीचा विवेक सुटतो, तो सुटल्यामुळे स्मृतिदोष जडतो. स्मृतीदोषामुळे बुद्धिनाश होतो आणि त्यामुळे अखेर व्यक्तीचा विनाश होतो.

रागाचे दुष्परिणाम सांगणारा वरील श्लोक रागाला आवर घालायला हवा हेही सुचवितो. अर्थात हे सारे एकाच लेखात मांडणे शक्य नाही.

राग आणि रागाला आवर घालण्यासाठी काय करता येईल हे जाणुन घेऊया पुढच्या लेखात.

अॅड सुमेधा देसाई

Advertisement
Tags :

.