नाकावरच्या रागाला औषध काय?
रागामुळे मानसिक स्तरावर होणारे परिणाम हे रागाच्या तीव्रतेनुसार सौम्य व तीव्र स्वरूपाचे असतात. अस्वस्थता वाढते, अविवेकी विचारांमुळे आरडाओरडा, आकांडतांडव, शिवीगाळ तर प्रसंगी शारीरिक हिंसा सुद्धा घडते.काही जणांना इतका राग येतो की त्यामुळे वैचारिक क्षमता झाकली जाते. नाकावरचा राग असला तरी त्यावर औषध आहेच.
मागच्या लेखातील नेहा आणि तिच्या वडिलांसारख्या संतापाने ग्रासलेल्या अनेक व्यक्ती, भावनांचे विविध कंगोरे हे सतत वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतच असतात.
कधी या व्यक्ती स्वत: आपली समस्या घेऊन येतात तर कधी एखादी स्त्राr तीची व्यथा मांडते, काय सांगू
मॅडम..आमचे हे जमदग्नीचा अवतारच. मी आणि मुले भीतीच्या छायेखालीच वावरतो. कशाने चिडतील काही भरवसा नाही. अहो रस्त्यावर ट्रॅफीकने हैराण केलं तरी राग आमच्यावर..काहीही कारण पुरतं..पण शांत असतील तेव्हा यांच्यासारखा माणूस नाही. काय करावं तेच कळत नाही...
अनेकदा आयुष्य घडविण्याचं वा बिघडविण्याचे काम भावनांमार्फतच होत असतं. राग किंवा क्रोधाचा यात पहिला नंबर लागेल असं म्हटल्यास वावगं ठरु नये. अगदी क्षुल्लक कारणांवरुन रागावणारी आणि वर्षानुवर्षे अबोला धरणारी माणसं पावलोपावली भेटतात. भावांभावांमध्ये वितुष्ट येतं, पती-पत्नी, पालक-पाल्य, मैत्री अशा अनेक नात्यांमध्ये राग आणि त्यातून विस्कटणारे नातेसंबंध अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. क्रोधाचे होणारे अनेक शारिरिक आणि मानसिक परिणाम सर्वज्ञात आहेतच. अर्थात केवळ क्रोधच नव्हे तर कोणत्याही विघातक भावनेची तीव्रता वाढत गेली की वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागतात.
खरंतर विचार करण्याची पद्धत, निर्माण होणाऱ्या भावना याकडे आपले लक्ष असणे फार गरजेचे आहे.
रागाच्या बाबतीत बोलायचे तर अनेकदा आपल्याला अपेक्षीत आहे तसे घडले नाही की राग येतो.
राग उत्पन्न करणारी काही उदाहरणे पाहुया.
आपण रांगेत उभे आहोत..अचानक आपल्यामागून कुणीतरी भरभक्कम माणूस येतो आणि आपल्यापुढे घुसतो. वर्गात अनेक मुले बोलताआहेत परंतु ‘अमेय गप्प बस’ म्हणून शिक्षक फक्त अमेयलाच ओरडतात.
काहीवेळा ग्रुपमध्ये बऱ्याच जणांचे एकमत होते आणि आपण बाजूला पडतो. रस्त्याने जातोय आणि
ट्रॅफिक जाम झाले. घरात भांवडं आहे आई दटावते, ‘ही वस्तु तुझी एकट्याचीच नाही..त्यालाही दे.’
पहा हं..या सर्व उदाहरणामध्ये एक समान सूत्र आहे की उदाहरणातील व्यक्तीला टीका, वरचढपणा, नकार, कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना, आपलं आहे ते हिरावून घेतले जाणे किंवा विरोध हे सर्व अप्रिय आहे. तुमची सुरक्षा, सन्मान, इच्छा, अपेक्षा यांना हानी पोहचली किंवा अशा पद्धतीच्या नावडत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं की पटकन राग येतो. मलाच नेहमी ओरडा खावा लागतो..माझ्या बाबतीत असंच होतं, माझं मत त्यांनी विचारात घेतलेच नाही, अशी समजूत करुन घेतली की रागाचा पारा अजूनच वाढतो. पटकन् राग येणाऱ्या व्यक्तीला संतापासाठी किरकोळ कारणही पुरतं.
रागाच्या कारणांची यादी करून म्हटले तर तिला अंत नाही. सामान्यत: ज्या कारणामुळे व्यक्तींना राग येतो त्यातील प्रमुख काही कारणे अशी आत्मसन्मानाला किंवा स्व: प्रतिष्ठेला धोका पोहोचणे, अन्यायकारक व अपमानास्पद रीतीने मिळालेली वागणूक, अवहेलना होणे व कमी लेखले जाणे, उद्दिष्ट प्राप्तीत अडथळे निर्माण होणे व त्यामुळे नैराश्य, कामात आलेले विघ्न आणि त्यामुळे झालेला खोळंबा, गरजा आणि अपेक्षा यांची पूर्तता न होणे, भूक लागणे, शारीरिक व मानसिक आजार त्यामुळे आलेली दुर्बलता, व्यसनाधीनता, आर्थिक व कौटुंबिक समस्या. इ. रागामुळे मानसिक स्तरावर होणारे परिणाम हे रागाच्या तीव्रतेनुसार सौम्य व तीव्र स्वरूपाचे असतात. अस्वस्थता वाढते, अविवेकी विचारांमुळे आरडाओरडा, आकांडतांडव, शिवीगाळ तर प्रसंगी शारीरिक हिंसा सुद्धा घडते.
काही जणांना इतका राग येतो की त्यामुळे वैचारिक क्षमता झाकली जाते. राग म्हणजे कुठल्यातरी कारणास्तव दिलेली प्रतिक्रिया असते. म्हणून रागाच्या मुळाशी कोणते कारण आहे ते शोधणे महत्त्वाचे ठरते.
राग निवळण्यासाठी आपल्या मनात उत्पन्न होणारे नकारात्मक विचार कितपत वास्तवाला धरून आणि अर्थपूर्ण आहेत याची तर्कशुद्ध छाननी करणे उपयुक्त ठरते. मनात पुन्हा-पुन्हा घोळणारे विचार क्रोधाग्नी भडकवण्याचे काम करत असतात म्हणून ते कागदावर लिहून काढावे. जेवढ्या लवकर हे ‘स्वगत’ लिहिण्याची प्रक्रिया व त्याची छाननी घडेल तेवढी राग येण्याची किंवा तो वाढण्याची शक्यता कमी होईल.
तसेच राग निर्माण करणाऱ्या परिस्थितीचा जरा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर रागाच्या ज्वाला निश्चितच कमी होतात अर्थात त्यासाठी परिस्थितीचा सकारात्मकतेने पुनर्विचार करण्याची, जुनी पारंपारिक विचारांची चौकट मोडण्याची तयारी मात्र हवी! हे करता आले म्हणजे ज्यांचा आपण तिरस्कार करतो किंवा ज्यांचे दोषच आपल्याला ठळकपणे दिसतात ती माणसे आपण समजतो तितकी वाईट नसून आपल्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे आपण ती वाईट ठरवत आहोत हे लक्षात येते व आपला नकारात्मक दृष्टिकोन बदलून त्या व्यक्तीशी सौहार्दपणे नाते जुळू शकते. जिथे राग टोकाचा असतो तिथे तीव्रता अत्याधिक असते. रागावलेल्या व्यक्तीची वैचारिक क्षमता झाकली जाऊन समस्या जटील झालेली असते. अशावेळी निसर्गामध्ये फिरायला जाणे, व्यायाम करणे, संगीत ऐकणे, बागकाम करणे या गोष्टी सुद्धा रागाचा पारा खाली आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. राग आला की दहापर्यंत आकडे मोजणे, पेलाभर पाणी पिणे दीर्घ श्वास घेणे, फेऱ्या मारणे या पारंपारिक पद्धतीने शास्त्राrय आधार आहे. कारण तेवढ्या वेळेत मेंदूमधील भावनिक वादळ शमते तसेच रासायनिक असमतोल बराच कमी होतो आणि मन योग्य दिशेने विचार करू लागते. त्यामुळे रागाच्या भरात दिल्या जाणाऱ्या अविवेकी प्रतिक्रियांना आपोआप वेसण घातली जाऊन संभाव्य नुकसान टळू शकते. पाऊस पडण्यापूर्वी जसे एक विशिष्ट वातावरण तयार होते अन् पावसाची पूर्वसूचना मिळते तसाच काहीसा प्रकार रागाच्या बाबतीतही असतो.
आपला स्वत:वरचा ताबा सुटतोय, आता आपल्याला राग येणार आहे अशी पूर्वसूचना देणारे संदेश शरीर पाठवत असते. अस्वस्थ वाटणे, ताण जाणवणे हे त्यातूनच होते. काही जणांचे डोके दुखू लागते, पोटात गडबड सुरू होते, तर काहींची मान आखडते, तळहाताला घाम येतो, कधी तोंडाला कोरड पडते, अंगाला खाज सुटते, तर कधी छातीची धडधड वाढते, मुठी आवळल्या जातात. ही सर्व लक्षणे म्हणजे भावनिक अस्वास्थ्याची नांदी आहे. याला ‘फिलिंग फिंगरप्रिंट्स’ असे म्हणतात. प्रत्येकाच्या बोटाचे ठसे जसे वेगवेगळे असतात तसेच भावनांचे ठसेही वेगळे असू शकतात.
ते ओळखण्याची सजगता मात्र हवी! एकदा ती सजगता अंगी बाणली तर रागाच्या नियंत्रणातील ती पहिली पायरी ठरते. कारण ‘रागाचे काय परिणाम होऊ शकतील’ ते लक्षात घेऊन ‘तो कसा व्यक्त करायला हवा’ हा विचार करण्यासाठी मध्ये वेळ उपलब्ध करून देतात. ‘कृती करण्यापूर्वी विचार करा’ आणि ‘कृतीच्या परिणामांची कल्पना करा’ ही दोन साधी वाक्य रागावर नियंत्रण नसणाऱ्यांसाठी संरक्षक काम करू शकतात. खरंतर रागावर किंवा एकूणच स्वत:च्या भावनांवर नियंत्रण आणण्याचे शिक्षण अगदी लहानपणापासून देता येते आणि द्यायलाही हवे. खरं तर यामध्ये विविध भावनिक कौशल्य शिकवता येतील. जसे स्वत:च्या भावना ओळखणे, त्या शब्दबद्ध करता येणे. इतरांच्या भावना समजून घेऊन त्याचा आदर करणे. नकारात्मक भावनांकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे. भावना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात व्यक्त करणे. विसंवाद टाळून सहकार्याने काम करणे व समस्येतून मार्ग काढणे वगैरे..
थोडक्यात भावनिक साक्षरता व त्या दृष्टीने सजगता फार आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की, आपली चूक नाही आणि समोरच्याची चूक असली तरी रागवायचं नाही का? अन्यायाविरुद्ध राग ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. हे अगदी खरं. परंतु केवळ राग-राग करत वादावादी करुन ‘अॅग्रेसीव्ह’((aggressive)अर्थात आक्रमक होण्यापेक्षा आपल्याला ‘अॅ सरटीव्ह’ (assertive) ‘आग्रही’ होऊन आपला मुद्दा मांडता येईल का हे पाहणे जास्त शहाणपणाचे नाही का?
ऑास्ट्रियातील सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ व्हिक्टर एमिल फ्रँक यांचे एक सुंदर वाक्य खरंच विचार करण्याजोगे आहे.
Between stimulus and response there is space. In that space lies our freedom and power to choose our response.
खरंतर माणूस म्हणून प्रतिसादाकडे वळायचे की प्रतिक्रियेकडे याची निवड करण्याची देणगी आपल्याला मिळाली आहे.
अॅड सुमेधा देसाई