चार अंब्यांची किंमत किती ?
अंबा हे फळ भारतात सर्वत्र अत्यंत लोकप्रिय आहे. महाराष्ट्रतला ‘हापूस’ अंबा तर जगभरात आवडता आहे. तथापि, सर्वात महागडा अंबा ‘मियाझकी’ या नावाने ओळखला जातो. भारतात या अंब्याचे उत्पादन उत्तर प्रदेशात अधिक प्रमाणात होते. उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यात संदीप चौधरी नामक एक बागायतदार आहेत. त्यांनी या अंब्याची लागवड केली आहे. आता त्यांना अंब्याच्या या वाणापासून लक्षावधी रुपयांची प्राप्ती होऊ लागली आहे. नुकतेच त्यांनी गुजरातमधील प्रवीण गुप्ता या व्यापाऱ्याला अशा चार अंब्यांची विक्री केली असून त्यांना त्यांचे 2 लाख 11 हजार रुपयांचे मूल्य मिळाले आहे. हे अंबे 1 किलोत साधारणत: चार येतात. म्हणजेच यांची किंमत एका किलोला 2 लाख 11 हजार रुपये इतकी आहे. हा अंबा जगातील सर्वात महाग म्हणून ओळखला जातो. तो मूळचा जपानमधील आहे. आता भारतातही त्याची लागवड करण्यात येत आहे.
काही जणांच्या मते या अंब्याला एवढी किंमत येते, हा केवळ एक बनाव आहे. कोणत्याही अंब्याला इतकी किंमत येऊ शकत नाही. तथापि, संदीप चौधरी यांनी या अंब्यांची 1 लाख 11 हजार रुपये इतकी किंमत चेकने घेतली आहे. उरलेली रक्कम त्यांना लवकरच रोख रकमेत मिळणार आहे. या अंब्याची लागवड त्यांनी केली, तेव्हा लोकांनी त्यांना वेड्यात काढले होते. तथापि, आता त्यांनी या अंब्याची लागवड साध्य करुन दाखविली आहे. हा अंबा भारतातील बागायतदारांचेही भले करु शकतो, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणावरुन सिद्ध केले आहे. मियाझकी हा अंबा चवीला उत्कृष्ट तर मानला जातोच. तसेच त्यात अनेक शरीरोपयोगी क्षार, जीवनसत्वे आणि पोषक द्रव्ये असतात. हा मूळचा जपानमधील अंबा असून तो त्याचा रंग पिकल्यानंतर भडक तांबडा होतो. याची लागवड भारतात गेल्या 10 वर्षांपासून केली जात असून तो लोकप्रिय होत आहे.