For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाच्या सुरक्षेवर नजर ठेवणाऱ्या यंत्रणा रॉ अन् आयबीमध्ये काय आहे फरक?

06:13 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशाच्या सुरक्षेवर नजर ठेवणाऱ्या यंत्रणा रॉ अन् आयबीमध्ये काय आहे फरक
Advertisement

अमेरिकेची सीआयए, इस्रायलची मोसाद आणि ब्रिटनची एमआय6 यासारख्या गुप्तचर संस्थांची जगभर चर्चा होते. भारताच्या सुरक्षाव्यवस्थतेही दोन महत्त्वाच्या गुप्तचर संस्था आहेत रॉ आणि आयबी. यातील रॉचे मुख्य काम देशाबाहेरील घडामोडींवर लक्ष ठेवणे, तर आयबी देशांतर्गत सुरक्षेशी संबंधित गुप्तचर माहिती गोळा करते. मात्र दोन्ही संस्थांमध्ये नेमका फरक काय? त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते आणि ‘कोण अधिक शक्तिशाली?’ या प्रश्नाचे उत्तर काय? जाणून घेऊया....

Advertisement

देशाला असलेले अनेक धोके सीमेवर दिसत नाहीत. काही धोके शत्रूराष्ट्रांच्या हालचालींमध्ये दडलेले असतात, तर काही देशाच्या आतच आकार घेत असतात. अशावेळी युद्ध सुरू होण्याआधीच संभाव्य धोका ओळखणे, महत्त्वाची माहिती मिळवणे आणि ती सरकारपर्यंत पोहोचविणे हे काम पडद्यामागून गुप्तचर यंत्रणा करत असतात. भारताच्या या गुप्तचर व्यवस्थेतील दोन महत्त्वाची नावे म्हणजेच रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’ आणि इंटेलिजेन्स ब्युरो अर्थात ‘आयबी’. एकाचे लक्ष प्रामुख्याने देशाच्या सीमेपलिकडे तर दुसऱ्याचे लक्ष देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर असते. मात्र, दोन्हींचे अंतिम उद्दिष्ट एकच-भारताची राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे.

‘रॉ’ची स्थापना होण्यामागे 1962 चे चीनसोबतचे युद्ध आणि 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध यांचे अनुभव महत्त्वाचे ठरले. त्यानंतर भारताने बाह्या गुप्तचर माहितीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आणि 21 सप्टेंबर 1968 रोजी रॉ अस्तित्वात आली. परदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बाह्या घटकांची माहिती मिळविण्यासाठी रॉ ची स्थापना करण्यात आली आहे. दुसरीकडे आयबीचा इतिहास ब्रिटिशकालीन भारतापर्यंत पोहोचतो. देशांतर्गत सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती गोळा करण्याचे काम इंटेलिजेन्स ब्युरो अर्थात ‘आयबी’ करते. दोन्ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असल्या तरीही त्यांच्या कामाचे स्वरुप, कार्यक्षेत्र आणि प्रशासकीय नियंत्रण वेगवेगळे आहे.

Advertisement

1962, 1965 च्या युद्धानंतर भासली गरज

भारताच्या गुप्तचर व्यवस्थेत स्वतंत्र बाह्या गुप्तचर संस्थेची गरज 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनुभवामुळेही परदेशातून धोरणात्मक आणि लष्करी माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता अधिक स्पष्ट झाली. त्या काळात देशांतर्गत तसेच परदेशातील गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी प्रामुख्याने आयबीकडे होती. मात्र परदेशातील धोके आणि लष्करी हालचालींची माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र, विशेषीकृत यंत्रणा असावी, असा विचार पुढे आला. याच पार्श्वभूमीवर 21 सप्टेंबर 1968 रोजी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉची स्थापना करण्यात आली. रॉचे पहिले प्रमुख म्हणून आर.एन. काओ यांनी जबाबदारी स्वीकारली.

रॉ आणि आयबीमधील नेमका फरक

रॉचे प्रमुख काम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक हितांवर परिणाम करणाऱ्या परदेशातील घडामोडींशी संबंधित गुप्त माहिती मिळविणे आणि तिचे विश्लेषण करणे आहे. विविध देशांची राजकीय, लष्करी आणि धोरणात्मक भूमिका, त्यांच्या हालचाली तसेच भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या बाह्या धोक्यांची माहिती रॉसाठी महत्त्वाची असते.

दुसरीकडे आयबीचे मुख्य कार्यक्षेत्र देशांतर्गत सुरक्षा आहे. दहशतवाद, हेरगिरी, उग्रवाद, फुटिरवादी कारवाया आणि इतर अंतर्गत सुरक्षा धोक्यांशी संबंधित माहिती गोळा करणे हे आयबीच्या प्रमुख कामांपैकी एक आहे. आयबी राज्यांच्या पोलीस यंत्रणा तसेच इतर सुरक्षा संस्थांशीही आवश्यकतेनुसार गुप्त माहितीची देवाणघेवाण करते.

कोणत्या यंत्रणेवर कोणाचे नियंत्रण?

रॉ आणि आयबीमधील महत्त्वाचा फरक त्यांच्या प्रशासकीय रचनेत आहे. रॉ ही कॅबिनेट सचिवालयाशी संबंधित संस्था आहे. कॅबिनेट सचिवालय थेट पंतप्रधानांच्या अधीन कार्य करते. रॉचा प्रमुख सचिव (संशोधन) म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींमध्ये रॉची माहिती देशाच्या सर्वोच्च राजकीय आणि सुरक्षा व्यवस्थेपर्यंत पोहोचते.

दुसरीकडे आयबी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय चौकटीत कार्य करते. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाकडे आयबीशी संबंधित प्रशासकीय आणि आर्थिक बाबी येतात. राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या विषयांमध्ये रॉ आणि आयबी या दोन्ही यंत्रणांकडून मिळणारी माहिती संबंधित उच्चस्तरीय यंत्रणांपर्यंत पोहोचू शकते.

रॉ अन् आयबीचे बजेट

या दोन्ही यंत्रणांच्या बजेटबाबत मोठ्या प्रमाणात गोपनीयता असते. सामान्य सरकारी विभागांप्रमाणे रॉ आणि आयबीच्या कामकाजावरील संपूर्ण खर्च स्वतंत्रपणे आणि तपशीलवार सार्वजनिक केला जात नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात कॅबिनेट सचिवालय आणि गृह मंत्रालयासाठी विविध तरतुदी असतात, मात्र त्यावरून रॉ किंवा आयबीच्या प्रत्यक्ष कामकाजावर किती खर्च होतो हे स्वतंत्रपणे अचूकपणे ठरविणे सोपे नाही. गुप्तचर यंत्रणांच्या कामाचे स्वरुप लक्षात घेता त्यांचे अधिकारी, स्रोत, नेटवर्क, मोहिमा आणि खर्चाची संपूर्ण माहिती सार्वजनिक न करण्यामागे सुरक्षेचे कारण असते.

आयबी 1887 मध्ये, तर रॉ 1968 मध्ये

आयबीची सुरुवात ब्रिटिश राजवटीत 1887 साली झाली. त्यानंतर तिच्या कार्यपद्धतीत आणि नावात काळानुसार बदल झाले. स्वातंत्र्यानंतरही आयबी भारताच्या अंतर्गत गुप्तचर व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग राहिली. याउलट 21 सप्टेंबर 1968 रोजी रॉची स्थापना झाली.

रॉला कायदेशीर आधार कोणता?

रॉची स्थापना स्वतंत्र संसदीय कायद्याने झालेली नसून 1968 मध्ये कॅबिनेट सचिवालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेत तिची निर्मिती झाली. रॉचे पहिले प्रमुख आर.एन. काओ होते. त्यांनी संस्थेची सुरुवातीची रचना आणि कार्यपद्धती विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

समन्वय का आवश्यक?

बाह्या आणि अंतर्गत सुरक्षेचे धोके अनेकदा एकमेकांशी जोडलेले असू शकतात. उदाहरणार्थ परदेशातून चालविले जाणारे एखादे नेटवर्क भारतातील कारवायांशी संबंधित असेल, तर बाह्या आणि अंतर्गत गुप्तचर माहितीचा समन्वय महत्त्वाचा ठरतो. गुप्तचर संस्थांकडून मिळालेली माहिती राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादविरोधी उपाययोजना, सीमासुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि धोरणात्मक निर्णयांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

कार्य कसे चालते?

गुप्तचर संस्थांचे काम केवळ एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे किंवा गुप्त माहिती मिळविणे एवढ्यापुरते मर्यादित नसते. विविध स्रोतांकडून मिळालेली माहिती एकत्र करणे, तिची सत्यता तपासणे, वेगवेगळ्या घटनांमधील संबंध शोधणे आणि त्यातून संभाव्य धोका ओळखणे हा त्याचा महत्त्वाचा भाग असतो. आजच्या काळात मानवी स्रोतांबरोबरच तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उपग्रहीय छायाचित्रे, डिजिटल माहिती, दूरसंचाराशी संबंधित माहिती, खुल्या स्रोतांमधून मिळणारी माहिती आणि सायबर क्षेत्रातील संकेत यांचे विश्लेषण करून सुरक्षा यंत्रणांना संभाव्य धोक्यांचा अंदाज घेण्यास मदत होते.

‘ह्यूमन इंटेलिजेन्स’पासून ‘टेक्निकल  इंटेलिजेन्स’पर्यंत

गुप्तचर क्षेत्रात माहिती मिळविण्याच्या अनेक पद्धती आहेत. व्यक्ती किंवा मानवी स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीला ह्यूमन इंटेलिजेन्स म्हटले जाते. दुसरीकडे तांत्रिक साधनांमधून मिळणारी माहिती टेक्निकल इंटेलिजेन्स या व्यापक संकल्पनेत येते. याशिवाय सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली वृत्तपत्रे, सरकारी कागदपत्रे, अहवाल, उपग्रहीय छायाचित्र आणि इंटरनेटवरील माहितीचे विश्लेषणही महत्त्वाचे असते. याला ओपन-सोर्स इंटेलिजेन्स म्हटले जाते. गुप्तचर संस्थांचे काम केवळ ‘गुप्त’ माहिती मिळविण्यापुरती मर्यादित नसून उपलब्ध माहितीचे अचूक विश्लेषण करून त्यातून सुरक्षा-संबंधित निष्कर्ष काढणे हा त्याचा मोठा भाग आहे.

अन्य यंत्रणाही कार्यरत

भारताची गुप्तचर व्यवस्था केवळ रॉ आणि आयबीपुरती मर्यादित नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत. डिफेन्स इंटेलिजेन्स एजेन्सी (डीआयए) संरक्षणदलांशी संबंधित गुप्तचर माहितीचे समन्वय आणि विश्लेषण करते. त्याचप्रमाणे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनयाजेशन (एनटीआरओ) तांत्रिक गुप्तचर क्षमतेशी संबंधित महत्त्वाची भूमिका बजावते.

एका नजरेत रॉ अन् आयबी

मुद्दा                                      रॉ                                       आयबी

पूर्ण नाव                  रिसर्च अँड अॅनालिसिस विंग                इंटेलिजेन्स ब्युरो

स्थापना                    21 सप्टेंबर 1968                                 1887

मुख्य कार्यक्षेत्र          बाह्या/परदेशी गुप्तच माहिती                  अंतर्गत गुप्तचर माहिती

प्रशासकीय चौकट          कॅबिनेट सचिवालय                          केंद्रीय गृह मंत्रालय

प्रमुख लक्ष                 बाह्या सुरक्षा व धोरणात्मक हित                  अंतर्गत सुरक्षा

गुप्तचर संस्थांची आवश्यकता

गुप्तचर संस्थांची आवश्यकता नेमकी का असते, हा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही स्वतंत्र आणि सार्वभौम देशाला बाह्या शक्तींकडून नेहमी धोका असतो. विशेषत: जर तो देश त्याला कोणत्याही कारणास्तव शत्रूस्थानी मानणाऱ्या देशांनी वेढलेला असेल, किंवा असे देश त्याचे शेजारी असतील, तर त्या देशाला नेहमीच आपल्या सुरक्षेसंबंधात सावध आणि सजग तसेच सज्ज असावे लागते.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हे संतवचन कोणत्याही स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचे ब्रीदवाक्य असावे लागते. शत्रूचा प्रत्यक्ष हल्ला होण्यापूर्वीच त्याला नामोहरम करण्याची आवश्यकता असते. कारण एकदा का शत्रूचा हल्ला झाला, की पडेल ती किंमत मोजून तो हाणून पाडावा लागतो. पण ज्या देशाच्या गुप्तचर संस्था प्रबळ आणि प्रभावी आहेत, अशा देशांना शत्रूच्या रणनीतीचा आणि मनसुब्यांचा आधीच  मागोवा घेता येतो. त्यामुळे शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच तो देश सावध होतो.

देशांतर्गत शत्रूंच्या नायनाटासाठीही...

शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच त्याला घेरतो आणि त्याच्या सर्व योजना अयशस्वी करणे, यासाठी गुप्तचर संस्था महत्वाच्या असतात. इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष देशातही अनेकदा आतील शत्रूही प्रबळ असतात. ते देशाला आतून पोखरण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. अशा अस्तनीतील निखाऱ्यांनाही विझविण्याचे महत्त्वाचे कार्य गुप्तचर संस्थांना करावे लागते. असे कितीतरी प्रसंग आपल्या देशात घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ थांबलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला होता, ही कार दहशतवाद्याची होती. या घटनेच्या आधीच काही दिवस दहशतवाद्यांची हिंसाचार आणि रक्तपात घडविण्याची एक मोठी योजना आपल्या गुप्तचरांनी वेळीच उघड केली होती. त्यामुळे ती योजना फसली. पण त्याच योजनेत सहभागी असणारा एक दहशतवादी काही स्फोटके घेऊन या कारमधून पळ काढण्याच्या विचारात होता. गुप्तचर संस्था प्रबळ नसत्या, तर दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले असते आणि फार मोठ्या प्रमाणात हिंसा आणि रक्तपात झाला असता. तो वेळीच गुप्तचरांनी माहिती दिल्याने टळला. या प्रसंगावरुन गुप्तचर संस्थांचे महत्व आणि त्यांची आवश्यकता यांचा परिचय आपल्याला होतो.

- उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :

.