For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

त्या’ डायरीत काय दडलंय? ईडीच्या धाडीत लागली हाती

06:33 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
त्या’ डायरीत काय दडलंय  ईडीच्या धाडीत लागली हाती
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : बेळगावसह कर्नाटकातील चौदा ठिकाणी ईडीने केलेल्या कारवाईत कोट्यावधींचे घबाड हाती लागले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी पूर्ण केली असली तरी कारवाईत जप्त केलेल्या डायरीत आणखी कोणाची नावे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ईडीने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या डायरीचा उल्लेख आहे.

अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. डी. मंजुनाथ, जगदीश नायक, के. एम. तम्माण्णा, त्यांचे कुटुंबीय, मित्र, वाहनचालक आदींच्या घरांवर बुधवारी 24 जून रोजी पहाटे 5.30 पासून दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 6 पर्यंत तब्बल चौदाहून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे.अबकारी विभागात चालणारा भ्रष्टाचार, त्यासाठी तयार करण्यात आलेला सिंडिकेट, त्या सिंडिकेटचे काम कसे चालते? आदींचा ईडीने पर्दाफाश केला आहे. तपासणी दरम्यान जप्त केलेल्या एका डायरीभोवती सध्या अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.त्या डायरीत आणखी कोणाची नावे आहेत? दरमहा किती पैसा जमत होता? त्याचे वाटप कसे केले जात होते? याची खोलवर चौकशी झाली तर आणखी काही अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्याही अडचणी वाढणार आहेत.

Advertisement

डॉ. वाय. डी. मंजुनाथ यांच्या कारचालकासह कुटुंबीयांच्या निवासस्थानातून तब्बल 13 कोटी 3 लाख रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले आहे. 7.8 कोटीचे सोन्याचे दागिने ईडीने ताब्यात घेतले आहेत. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जमवलेला पैसा बाजारात वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कशा पद्धतीने गुंतवला जात होता, याचा तपशीलही ईडीच्या चौकशीत आढळून आला आहे.

केवळ कर्नाटकच नव्हे तर शेजारच्या महाराष्ट्र, गोवा व परदेशातही अधिकाऱ्यांचे व्यावसायिक संबंध व गुंतवणूक असल्याचा संशय बळावला असून त्या दिशेने चौकशी केली जात आहे. 17 जानेवारी 2026 रोजी बेंगळूर शहर अबकारी जिल्हा-8 चे उपआयुक्त जगदीश नायक यांना नव्या परवान्यासाठी 25 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अटक केली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारावरून ईडीनेही चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

बेळगाव, बेंगळूर, म्हैसूर, अरसीकेरेसह चौदा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांनी एक सिंडिकेटच तयार केले होते. सिंडिकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच गोळा केली जात होती. या व्यवहाराचा संपूर्ण तपशील एका डायरीत नोंदविण्यात आला असून ती डायरीच आता ईडीला सापडली आहे. डायरीमुळे आणखी कोणाच्या अडचणी वाढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :

.