बांगला देशात काय चालले आहे?
भारतानेच स्वत:चे रक्त सांडून पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या बांगला देशमध्ये सध्या मोठीच अनागोंदी माजल्याचे दिसून येत आहे. त्या देशाच्या नेत्या शेख हसीना यांच्या विरोधात तेथील विद्यार्थी संघटनेने बंड केल्याने 5 ऑगस्ट 2024 या दिवशी त्यांना पदच्युत करण्यात आले. तेव्हापासून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ मानले गेलेले मोहम्मद युनुस यांचा या बंडाला आशीर्वाद होता. त्यामुळे सत्तांतर झाल्यानंतर तेथील लष्कराच्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागारपद त्यांना देण्यात आले. कागदोपत्री त्यांची नियुक्ती सल्लागार म्हणून असली, तरी तेच आता व्यवहारी अर्थाने त्या देशाचे सर्वेसर्वा बनले आहेत. सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी त्यांचे खरे भारतविरोधी दात दाखवायला प्रारंभ केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या नेतृत्वात बांगला देशचे एका कट्टर आणि धर्मांध देशात रुपांतर होताना दिसत आहे. परिणामी, त्या देशाची वाटचाल दुसरा पाकिस्तान होण्याच्या मार्गावर वेगाने होत आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर तेथे हिंदूधर्मियांवर अत्याचार होत आहेत. हिंदूंची घरे पाडणे आणि जाळणे, त्यांची मंदिरे तोडणे आणि अन्य प्रकाराची धर्मांध कृत्ये तेथील मुस्लीम धर्मवादी संघटनांकडून केली गेली. गेल्या तीन चार महिन्यांमध्ये हे प्रकार काही प्रमाणात थांबल्याचे दिसत असले तरी कोणत्याही साध्या निमित्तानेही ते पुन्हा उफाळून येऊ शकतात, इतक्या थराला तेथील अस्थिरता गेली आहे. युनुस प्रशासनानेही हिंदूंवरोधात मोठीच पक्षपाती भूमिका घेऊन परिस्थिती आणखी बिघडविली आहे. भारताने आतापर्यंत तेथील परिस्थितीत हस्तक्षेप केलेला नाही. तथापि, युनुस प्रशासनाला समज दिली आहे. तसेच, बांगला देशवर आर्थिक दबाव आणण्याच्या दृष्टीने भारताने अनेक कठोर पावले उचलली आहेत. बांगला देशला दिल्या जाणाऱ्या व्यापारी सुविधा बंद केल्या आहेत. तसेच भारताच्या बंदरांचा उपयोग त्याच्या मालाच्या आयात-निर्यातीसाठी करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. युनुस यांनी काही काळापूर्वी भारताच्या संबंधात प्रक्षोभक विधान केले होते. ईशान्य भारतातील 7 राज्ये (सेव्हन सिस्टर्स) भारतापासून अलग करु, अशी गर्भित धमकी त्यांनी दिली होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे त्यांनी काही काळापूर्वी चीनचा दौरा केला होता. बंगालच्या उपसागरातील सर्वात बलवान नौदल आपल्याच देशाकडे असून या सागरावर आपले नियंत्रण आहे, अशी बिनबुडाची बढाई त्यांनी मारली होती आणि चीनने उर्वरित भारत आणि ईशान्य भारत यांना जोडणारी चिंचोळी पट्टी (चिकन नेक) ताब्यात घ्यावी, अशी अप्रत्यक्ष सूचना केली होती. वास्तविक भारताला धोका पोहचविण्याइतकी बांगला देशची सामरिक किंवा आर्थिक शक्ती नाही. तथापि, भारताला धमकाविण्याची खुमखुमी मात्र, तो देश अलीकडच्या, सत्तांतरानंतरच्या काळात दाखवू लागला आहे. 1995 ते 2015 या काळात त्या देशाने बऱ्यापैकी आर्थिक प्रगती साधून दरडोई उत्पन्नात पाकिस्तानलाही मागे टाकले होते. तथापि, त्यानंतर त्या देशाची अर्थव्यवस्था घसरणीला लागल्याचे दिसून येते. आता त्याची परिस्थिती पाकिस्तानसारखीच झाली आहे. अशावेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून युनुस भारताची कळ काढण्याचा नसता उद्योग करीत आहेत. त्यामुळे भारतालाही त्या देशाविरोधात कठोर व्हावे लागत आहे. ज्यावेळी एखाद्या देशात असे वातावरण असते, तेव्हा त्या देशामधले अंतर्गत वादही उफाळून येत असतात. मोहम्मद युनुस यांना आता हा अनुभव येत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घेऊन शेख हसीना यांच्या नेतृत्वातील लोकनियुक्त सरकार उलथविले, त्याच प्रमाणात आता त्यांच्याही विरोधात तेथील लष्कराने बंड करण्याची तयारी केल्याची वृत्ते येत आहेत. त्या देशात सार्वत्रिक निवडणूक केव्हा घ्यायची, हा दोघांमधील वादाचा विषय आहे. लष्कराचे प्रमुख वाकर उझ झमान यांना ही निवडणूक येत्या नोव्हेंबरात हवी आहे. तर युनुस यांना आधी त्या देशात महत्त्वाच्या ‘सुधारणा’ करायच्या आहेत. त्यानंतर निवडणूक होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात हा वाद इतका विकोपाला पोहचला होता, की युनुस यांची हकालपट्टी करण्यासाठी लष्कराने पावले टाकली होती. पण युनुस यांनी नमते घेऊन झमान यांच्याशी तडजोड करुन आणि नोव्हेंबर-डिसेंबरात निवडणूक घेण्याची मागणी मान्य करुन कशीबशी स्वत:ची गादी वाचविली. तथापि, दोघांमधील वाद पूर्णपणे थांबल्याचे दिसत नाही. तेथील आणखी एक नेत्या खलिदा झिया यांनी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. लष्कराचा प्रयत्न खलिदा झिया यांचा आवामी लीग हा पक्ष आणि खलिदा झिया यांचा बांगला देश पीपल्स पार्टी हा पक्ष यांनी युती करुन निवडणूक लढवावी असा असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. हे पक्ष एकत्र आल्यास मोहम्मद युनुस यांचे काही चालणार नाही आणि त्यांना लवकर निवडणूक घोषित करणे भाग पडेल असे झमान यांचे अनुमान आहे. याच बजबजपुरीचा लाभ उठवत तेथील जमाते इस्लामीसारख्या कट्टर धर्मवादी संघटना डोके वर काढू लागल्या आहेत. 84 वर्षांचे युनुस यांच्या हाताबाहेर ही परिस्थिती चालली आहे, असे दिसून येत आहे. अशा स्थितीत भारताने अत्यंत सावधान राहिले पाहिजे. नुकताच भारताचा पाकिस्तानशी सशस्त्र संघर्ष झाला होता आणि त्यात भारताने पाकिस्तानात मोठा विध्वंस घडवून त्या देशाला त्याची योग्य जागा दाखवून दिली होती. बांगला देशचेही या संघर्षाकडे लक्ष होते. भारताने पाकिस्तानला दणका दिल्याने आता बांगला देश अधिक वळवळ निदान सध्यातरी करणार नाही, असे दिसते. तथापि, ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. पाकिस्तान, बांगला देश आणि चीन या आपल्या तीन्ही शेजाऱ्यांचे ध्येय भारताला दाबून ठेवणे हेच आहे. त्यामुळे हे तीन्ही देश एकत्र येऊन भारतविरोधी आघाडी उघडू शकतात. त्यामुळे भारताने आपल्या संरक्षणाची पुरेशी व्यवस्था करणे अगत्याचे आहे.