जे योगमार्गाने साधते ते अनन्य भक्तीनेसुद्धा साध्य होऊ शकते
अध्याय आठवा
भगवंत म्हणाले, योगी नित्यस्मरण करत असलेला परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी असून, सामान्यांच्या नजरेच्या पलीकडे असतो. जे त्याला शरण जातात त्यांच्यावर त्याची कृपा होऊन त्यांना मात्र त्याचे दर्शन होते. असे योगी मरणसमयी एकाग्र मनाने, भक्तीने व योगबलाने युक्त होऊन, दोन भुवयांच्यामध्ये प्राणवायूची स्थापना करून त्याचे स्मरण करतात आणि पुरुषाप्रत जातात ह्या अर्थाचा
प्रयाण-काळी स्थिर चित्त राखे । प्रेमे तसा योग-बळे कसूनि? भ्रू-संगमी प्राण जडूनि ठेवी । तेंव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य ।। 10।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, अनन्य योगी नेहमीच परमपुरुषाची आठवण काढत असल्याने मृत्यूसमयी त्याची आठवण त्यांना हमखास होते. त्यावेळी ते पद्मासन घालून, उत्तरेकडे तोंड करून बसतात. कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख ते अंत:करणात साठवतात. त्यांनी अष्टांगमार्गाने योगसाधना केलेली असल्याने त्यांना योगसिद्धी प्राप्त झालेली असते. त्यायोगे त्यांचा प्राण सुषुम्ना नाडीच्या मध्यममार्गाने, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास निघतो. जेव्हा प्राणवायू मूर्ध्नीआकाशात प्रवेश करतो, तेव्हा प्राणांचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो परंतु मनाच्या स्थिरतेने, भक्तीच्या भावाने व योगबलाने आवरलेला प्राणवायु चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घटाखाली झाकलेला दिवा केव्हा विझला हे कळत नाही त्याप्रमाणे त्यांनी केव्हा प्राणत्याग केला हे समजत नाही. ते ब्रह्मस्वरूप होऊन राहतात.
केवळ योग्यालाच ब्रह्मस्वरूप होता येते असे वाटून इतरांना ब्रह्मस्वरूप होण्याची संधी आहे की नाही असा प्रश्न मनात येईल. त्याचे उत्तर असे की, जे योगमार्गाने साधते ते अनन्य भक्तीनेसुद्धा साध्य होऊ शकते. श्री दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथात, श्री गजानन महाराजांनी त्यांचे परम शिष्य भास्कर पाटलाना कसे ब्रह्मस्वरूप केले त्याचे वर्णन आलेले आहे ते असे, तो वद्य पंचमीचा दिवस होता. सकाळी समर्थ भास्करांना म्हणाले, ‘भास्करा तुझे प्रयाण आज आहे. पद्मासन घालून पूर्वेकडं तोंड करून बैस. चित्त स्थिर करून त्यात हरि साठव. आता वेळ जवळ आली. सावध रहा !’ इतर जनांना महाराज म्हणाले तुम्ही विठ्ठल विठ्ठल नारायण असं उच्च स्वराने भजन करा. हा तुमचा श्रेष्ठ भाऊ आज वैकुंठाला चाललाय. त्याचं माळ बुक्का वाहून पूजन करा.’ भास्करानी पद्मासन घातलं. नासाग्री दृष्टि ठेवून सर्व वृत्ति लीन केल्या आणि ते अंतर्मुख झाले. भक्त भास्कराचे पूजन करत होते. माळा, बुक्का वहात होते. समर्थ दूर बसून कौतुक पहात होते. असे प्रहरभर भजन झाले. मध्यान्हीची वेळ झाली. महाराजांनी ‘हरहर’ शब्द मोठ्याने उच्चारला. त्यासरशी भास्करांचा प्राण वैकुंठाला गेला. संतांनी ज्याचा हात धरलेला असतो, तो हरीचा पाहुणा होतो. म्हणून श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, योगसाधनेत नाम नसलं तरी नामात योगसाधनेचा समावेश आहे. म्हणून सतत नाम घ्या म्हणजे अंत्यसमयी तुमचा निश्चित उध्दार होईल.