For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी थांबविले तर ?

06:30 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी थांबविले तर
Advertisement

पाकिस्तानच्या धमकीची सर्मा यांच्याकडून खिल्ली

Advertisement

वृत्तसंस्था / गुवाहाटी

भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित करुन पाकिस्तानचे पाणी अडविण्याची भाषा केली आहे. पण तशाच प्रकारे चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी अडविले तर भारताची स्थिती काय होईल, याचा विचार भारताने केला आहे काय, असा प्रश्न पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी उपस्थित केल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे. पाकिस्तानच्या नेत्याचा प्रश्न बालीश आहे, अशी टिप्पणी करत त्यांनी या प्रश्नाला चोख उत्तर दिले आहे.

Advertisement

ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्यासंबंधी सर्मा यांनी आकडेवारीसह शास्त्रशुद्ध विधान करत पाकिस्तानच्या धमकीवजा इशाऱ्यातली हवाच काढून घेतली आहे. ब्रम्हपुत्रा नदीमधून एकंदर जितके पाणी वाहते, त्याच्या केवळ 25 ते 30 टक्के पाणी चीनमधून येते. ऊर्वरित 70 ते 75 टक्के पाणी भारतातूनच या नदीत येते. त्यामुळे चीनने पाणी अडविल्यास भारताची आणि आसामची काहीही हानी होणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने चीनच्या जीवावर दिलेली धमकी पोकळ आणि हास्यास्पद आहे, असे प्रतिपादन हिमांत बिस्व सर्मा यांनी मंगळवारी केले.

नेमकी परिस्थिती केली स्पष्ट

हिमांत बिस्व सर्मा यांनी ब्रम्हपुत्रा नदीसंबंधीची नेमकी परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी आपले उत्तर ‘एक्स’ या माध्यमावर प्रसिद्ध केले. त्यांनी या साठी ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची जलविज्ञान आकडेवारी दिली आहे. ब्रम्हपुत्रा नदी कैलास मानसरोवर येथे उगम पावते. तेथून ती तिबेटमधून वहात अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतात प्रवेश करते. त्यानंतर ती आसाममधून वहात जाऊन पुढे बांगला देशात प्रवेश करते. तिबेटमध्ये पाऊस अत्यंत तुरळक पडतो. त्यामुळे या नदीच्या चीनमधील संपूर्ण प्रवासात या नदीत केवळ 25 ते 30 टक्के पाणीच येते. मात्र, ही नदी जेव्हा भारतात प्रवेशते, तेव्हा भारताच्या ईशान्य भागात वाहणाऱ्या अनेक उपनद्या ब्रम्हपुत्रेला मिळतात. त्यामुळे तिचे पाणी प्रचंड प्रमाणात वाढते. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि ईशान्य भारतात मान्सूनचा पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो. या पावसाचे पाणी ब्रम्हपुत्रेत येऊन तिचा ओघ प्रचंड बनतो. त्यामुळे ब्रम्हपुत्रा नदीचा खरा आधार भारत हाच आहे, असे सर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

आकडेवारी काय सांगते...

ब्रम्हपुत्रा नदी भारत-चीन सीमेवर तुटिंग येथे भारतात प्रवेश करते. यावेळी तिच्या पाण्याचा ओघ 2,000 ते 3,000 घनमीटर प्रतिसेकंद असा असतो. मान्सूनच्या काळात अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये ही नदी प्रचंड मोठी बनते. तिच्या पाण्याचा ओघ भारतात 15,000 ते 20,000 घनमीटर प्रतिसेकंद असा बनतो. याचाच अर्थ असा की तो या नदीच्या भारतप्रवेश बिंदूच्या तुलनेत 7 ते 8 पट मोठा होतो. या नदीला खऱ्या अर्थाने जलपुरवठा भारतातच होतो. हे पाणी घेऊन ही नदी पुढे बांगला देशात जाते. या नदीच्या वरच्या भागातून, अर्थात तिबेटमधून ही नदी फारसे पाणी आणतच नाही. त्यामुळे चीनने पाणी बंद केले तरी या नदीवर त्याचा नाव घेण्याजोगा परिणाम होणार नाही. कारण, भारतच तिचा खरा आधार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती सर्मा यांनी दिली आहे.

पुराच्या संकटातून होईल सुटका

चीनने पाणी अडविल्यास उलट आसाम आणि भारताचा लाभच होण्यासारखा आहे. कारण आसाममध्ये प्रत्येक वर्षी ब्रम्हपुत्रेच्या पुरामुळे परिस्थिती बिकट होते. लक्षावधी लोकांना सुरक्षित स्थळी न्यावे लागते. पुरामुळे शेतीची हानी होते. तसेच ब्रम्हपुत्रेच्या तीरांनजीक असणाऱ्या अभयारण्यातील प्राण्यांनाही या पुराचा धोका असतो. चीनने पाणी अडविल्यास तेव्हढे कमी पाणी नदीत येईल आणि पुराच्या नेहमींच्या समस्येतून आसामची सुटका होईल. चीनलाही ही स्थिती माहित आहे. त्यामुळे त्याने आजवर कधी असे केलेले नाही, असा टोलाही सर्मा यांनी लगावला.

पाकिस्तानची स्थिती नेमकी उलट...

पाकिस्तानची सर्व अर्थव्यवस्थाच सिंधू नदीवर अवलंबून आहे. पाकिस्तानातील सिंधू नदीला मिळणारे बहुतेक सर्व पाणी भारतातून वाहणाऱ्या सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, रावी आणि बियास या नद्यांमधूनच येते. तसेच अफगाणिस्तानातून पाकिस्तानात येणाऱ्या उपनद्यांमधून काही प्रमाणात पाणी तिला मिळते. पाकिस्तानात फारशा उपनद्याच नसल्याने तेथून फारशी भर सिंधू नदीत होत नाही. त्यामुळे भारताने या सर्व नद्यांचे पाणी अडविल्यास पाकिस्तानातील सिंधू नदी मोठ्या प्रमाणात रोडावण्याची शक्यता असून पाकिस्तानातील शेती आणि उद्योग यांची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे.

ब्रम्हपुत्रा-सिंधू तुलना अनाठायी

ड ब्रम्हपुत्रेला भारतातूनच मिळते सर्वाधिक पाणी, चीनकडून भर अत्यल्प

ड सिंधू नदीचा पाण्याचा मुख्य स्रोत भारतातून वाहणाऱ्या सहा नद्या हाच

ड भारताने या नद्यांचे पाणी वळविल्यास सिंधू नदी कोरडी होण्याचा धोका

ड चीनने पाणी अडविल्यास ब्रम्हपुत्रेवर कोणताही मोठा परिणाम होणे अशक्य

Advertisement
Tags :

.