For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीसच चोर बनले तर...

10:35 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोलीसच चोर बनले तर
Advertisement

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचा पोलीस दलातील भ्रष्टाचारावर घणाघात

Advertisement

बेळगाव : कर्नाटकात पोलिसांना एक आदर होता. एखादी घटना घडली की पोलिसांना बोलवा, असे सांगायचे. आता पोलीसच चोर बनले आहेत. त्यामुळे आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? राज्यातील कारागृहे रिसॉर्ट बनली आहेत. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. बुधवारी सायंकाळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियम 69 वर चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर आरोपांची सरबत्ती केली. लॉजमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा कारागृहात मिळत आहेत.

किती पैसे मोजतील त्या प्रमाणात त्यांना सुविधा दिली जात आहे. यावर अनेक वृत्तपत्रांनी अग्रलेखही लिहिले आहेत. कारागृहातील कर्मचारी व पोलिसांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. लाखो रुपयांची डिलिंग केली जात आहे. बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात गुब्बची सिना या गुंडाचा वाढदिवस साजरा होतो. कारागृहात केक कापला जातो. वाढदिवसानिमित्त नाचगाण्याचा कार्यक्रम होतो. कारागृहात केक कसा पोहोचला?, चित्रपट अभिनेता दर्शनचे निवांत खुर्चीवर बसून धूम्रपान करतानाचे फोटो छापून आले. दहशतवादी कारवायात गुंतलेल्या शकील मुन्नाकडे स्मार्टफोन आहे. दहशतवाद्याकडे फोन कसा पोहोचला? असे सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केले.

Advertisement

कारागृह अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा पगार कशासाठी?

दहशतवाद्याकडे फोन पोहोचणे हा विषयच गंभीर आहे. कारागृह अधिकारी, पोलीस काय करीत होते? त्यांना लाखो रुपयांचा पगार कशासाठी द्यायचा? पोलीस आयुक्तांनी दरमहा कारागृहांना भेटी देऊन तपासणी केली पाहिजे, असा नियम आहे. किती आयुक्तांनी भेटी दिल्या आहेत. यापूर्वी पार्टीसाठी कारागृहात बाहेरून दारू पोहोचवली जात होती. आता कारागृहातच दारू तयार होते आहे. यासाठी त्यांना स्पिरिट कोणी दिले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कारागृहात जामर, पण मोबाईल कसा चालतो?

राज्य पोलीस महासंचालक डॉ. सलीम यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वागणुकीत सुधारणा करण्यासाठी पत्र पाठवावे लागत आहे. याचाच अर्थ राज्यात काय परिस्थिती आहे, हे लक्षात येते. अनेक अधिकारी व पोलीस गुन्हेगारी कारवायात गुंतले आहेत. पोलीसच चोर बनले तर कोणावर विश्वास ठेवायचा. कारवार कारागृहामध्ये अमली पदार्थ पोहोचवले नाहीत म्हणून कारागृह अधिकाऱ्यावर हल्ला झाला. वेगवेगळ्या कारागृहात बसविण्यात आलेल्या जामरमुळे कारागृहाबाहेर नेटवर्क येत नाही मग कारागृहात मोबाईल कसा चालतो?, असा परखड प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बेंगळूर येथे भरदिवसा 7 कोटी रुपयांचा दरोडा झाला. सात जणांना अटक झाली. दरोड्याची योजना बनविणारा पोलीस होता. बिदरमध्ये भरदिवसा दरोडा झाला. दरोडखोरांच्या गोळीबारात एकट्याचा जीव गेला. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना मंगळूरमध्ये बँक दरोडा झाला. पोलीस आयुक्त कार्यालयात उभी करण्यात आलेल्या एका कारमध्ये 11 लाख रुपये एका पोलिसाने काढून घेतले. पोलीसच चोर का बनले आहेत? पोस्टींगसाठी पैसे घेत असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर कोणाकडून पैसे घेणार नाहीत, असेही टिप्पणीही विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली.

गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही. पोलीस दलाच्या माहितीनुसार राज्यात 23 हजार सक्रिय गुंड आहेत. 43 हजार बाईक चोरीच्या घटना घडल्या आहेत. सायबर गुन्हे वाढले आहेत. डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले आहेत. केवळ तीन वर्षात 5 हजार 474 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटले आहेत. पोलिसांनी केवळ 627 कोटी रुपये जप्त केले आहेत. डॉक्टर, इंजिनियर आदी उच्चशिक्षितच सायबर गुन्हेगारीला बळी पडत आहेत, असे सांगत त्यांनी पोलीस दलातील गुन्हेगारांचा पाढा वाचला.

वर्षभरात बेंगळूरमध्ये 130 पोलीस निलंबित

एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना बोलवा, असे म्हणायचे. पोलीस आले की सर्व काही ठीक होईल, असे लोकांना वाटायचे. आता पोलीसच चोर बनले आहेत. केवळ 11 महिन्यात एका बेंगळूर शहरामध्ये 130 अधिकारी व पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. चोऱ्या, दरोडे, अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांना साहाय्य करणे आदी गुन्हेगारी प्रकरणात गुंतल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. संपूर्ण राज्यातील स्थितीही काही वेगळी नाही, असेही आर. अशोक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.