पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी काय केले?
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत तसेच शासनाकडे प्रलंबित प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला.
जिह्यात मागील अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. हजारो हेक्टर शेती नापीक झाली आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी पंचगंगा नदीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने सादर केलेला 252 कोटींचा प्रस्ताव शासनाने नामंजूर केला. याबाबत जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नव्याने प्रस्ताव करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही, हे खरे आहे काय असल्यास प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पंचगंगा नदीच्या प्रदूषण निर्मुलनाबाबत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी हा स्वच्छ भारत मिशन, 15 व्या वित्त आयोगाचा निधी, जिल्हा नियोजन समिती आणि पर्यावरण विभागांच्या तरतुदीमधून उपलब्ध करुन घेण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने 24 जानेवारी आणि 24 फेब्रुवारीच्या पत्रान्वये कळविले आहे, असे सांगितले.