For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दादांनंतर पुढे काय ?

06:30 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दादांनंतर पुढे काय
Advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कणखर नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला बळकटी आलेली होती. राज्यात भाजप स्वबळावर सत्तेवर आहे. तरीदेखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना अगोदर ठरल्याप्रमाणे एकत्र घेऊन देवेंद्र फडणवीस राज्य चालवीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्याशी राजकीय नाते तोडून स्वतंत्र वेगळे झाले आणि त्याद्वारे निवडणूक लढवून ते महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सहभागी होते. त्यांच्या अनपेक्षित आणि अकाली निधनाने तमाम कार्यकर्त्यांना बसलेला धक्का हा एवढा मोठा आहे की, त्यातून कार्यकर्ते किंवा पक्ष एवढ्या लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला कधी ना कधी जावे लागणार, हे निश्चित परंतु अजितदादा पवारसारखी नेतेमंडळी अकाली एक्झिट घेतात हे एखाद्या राजकीय पक्षाला किंवा राजकारणाला देखील न परवडण्यासारखे असते. याचे कारण एक राजकीय नेता परिपक्व तयार होण्यासाठी किमान 50 वर्षे लागतात आणि असे नेते काही वर्षे जगतात, अनेकांना मार्गदर्शन करतात, अनेकांसाठी आधार बनतात आणि अनेक स्तुत्य उपक्रम राबवितात. विकासकामांमध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे अशी मंडळी जाणे हे सर्वार्थाने फार नुकसान ठरते. राष्ट्रवादीचे देखील अतोनात नुकसान झालेले आहे. स्पष्ट सांगायचे झाल्यास या पक्षात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. एवढा मोठा नेता, ज्याने खुद्द आपल्या काकाला आव्हान देऊन एक वेगळा गट स्थापन केला आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार’ असे त्याचे नामकरण केले. पक्ष भाजपबरोबर सत्तेत सामील झाला आणि त्या पक्षाचे नेतृत्व करताना अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री देखील बनले. आता त्यांच्या जाण्याने पक्षाचे जे नुकसान झालेले आहे, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही परंतु त्यांच्या जाण्यानंतर आता पुढे काय, हा प्रश्न जसा त्या पक्षातील नेत्यांना सतावीत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सत्तास्थानी असलेल्या सर्वच पक्षांना सतावित आहे. आता एका पाठोपाठ एक प्रतिक्रिया येऊ लागतील. वस्तुत: तशी सुऊवातही झालेली आहे. दादांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हातात बरेच काही आहे परंतु त्यांना जो धक्का बसलेला आहे, त्यातून त्यांना सावरण्यास काही दिवस जातील. राष्ट्रवादीचे जे काही आमदार अजित पवार यांच्या गटामध्ये होते, त्यांच्यासमोर फार मोठा प्रसंग सध्या निर्माण झालेला आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी’, असाही एक प्रसंग आहे. पुढचे पाऊल नेमके काय उचलावे, याबाबत अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे या पक्षाचे नेतृत्व जाईल काय किंवा त्या आपले दोन पुत्र पार्थ व जय यापैकी एका मुलाचे नाव नेतृत्वासाठी पाठवतील काय? हे करीत असताना अजित पवार यांनी अलीकडेच महापालिका निवडणुकीच्या दरम्यान त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार गटाकडे पुन्हा हातमिळवणी करण्याच्या उद्देशाने जी पावले उचलली, ते पाहता महाराष्ट्रात नेमके काय होणार! हा प्रश्नदेखील सर्वांनाच पडला होता आणि अजित दादांच्या निधनानंतर तो अनुत्तरीत राहिला. दादा हे तसे बिनधास्त व्यक्तिमत्त्व. त्यांचा स्वभावही तसाच. ‘पोटात एक आणि ओठात एक’, असे कधी त्यांच्या हिशोबी नव्हतेच. एका नेत्याच्या निधनानंतर किती नवे प्रश्न निर्माण होतात, याकडे आपल्याला बारकाईने पाहण्याची आज गरज आहे. नेतेमंडळी नेहमीच टीकेचे धनी बनतात परंतु एक नेता काय करू शकतो, याचे दादा हे एक ज्वलंत उदाहरण होते. त्यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीचे भवितव्य काय? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या गटाबरोबर अजितदादांचा गट जर गेला तर त्यांना सत्तेपासून चार हात दूरच राहावे लागेल. ‘उबाठा’बरोबर आघाडी करून फारसे काही साध्य होणार नाही आणि हातात आलेली सत्ता गमावून बसण्याची वेळ पक्षाच्या अनेक नेत्यांवर येऊ शकते. जर शरद पवार यांच्याबरोबर जायचे असेल तर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल आणि एवढे असून मंत्रिपद जातील, महामंडळ जातील आणि विरोधी पक्षात बसावे लागेल मात्र थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर मंत्रिपदाबरोबरच अन्य काही पदांचा लाभही होऊ शकतो. त्यातून आपल्या मतदारसंघाचा विकास करता येईल. अनेक नागरिकांची कामे करण्याची देखील नामी संधी प्राप्त होऊ शकते. अजित पवार यांनी भाजपकडे युती केली होती. ते पक्षात सामील झाले नव्हते आणि आता पवार यांच्या निधनानंतर जर भाजपमध्ये प्रवेश केला तर स्वत:चा प्रश्न सुटणार, हे निश्चित परंतु अजित पवार यांच्याशी गद्दारी केल्याचे लोक बोलतील. यामुळेच अनेक आमदारांसमोर गंभीर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. अजितदादा गटाकडे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेलसारखी अनेक नेतेमंडळी आहेत मात्र अजित पवारांची जागा, ते निश्चितच घेऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी अजित पवार गटासमोर निर्माण झालेला हा एक प्रसंग आहे. आता दुसरी बाजू सरकारची पाहिली तर भारतीय जनता पक्षाला इतर पक्षातील आमदारांना घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ अजूनही वाढत जाईल. त्यातून शिवसेना अडचणीत येऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील कसोटीची हीच वेळ आहे. एका नेत्याच्या निधनानंतर किती समस्या निर्माण होऊ शकतात, याचा विचार आपण कधी करीत नसतो. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसमोर निर्माण झालेला प्रसंग, त्यातून सहीसलामत बाहेर कसे यायचे, हा यक्षप्रश्न राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादा गटामध्ये फूट पडून, त्यातला मोठा गट जर भाजपमध्ये विलीन झाला तर उर्वरित आमदारांना देखील मोठा फटका बसू शकतो. यासाठीच महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या निधनानंतर एक गंभीर पेचप्रसंग जो निर्माण झालेला आहे, त्यावर तोडगा शरद पवार काढू शकतात मात्र आपल्या कन्येचे हित त्यांनी पाहिले आणि सर्वांना एकत्र केले तर कदाचित सुनेत्रा पवार यांच्यावरही तो अन्याय ठरू शकतो. दादांच्या निधनाने एक राजकीय गंभीर समस्या महाराष्ट्रात जी निर्माण झालेली आहे, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस नेमका कोणता उतारा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.