असं काय घडलं, लढाईपूर्वीच तलवार म्यान केली ?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर जिह्यात उलटसुलट प्रतिक्रिया - पराभवाची भिती की विरोधकांचे दबावतंत्र या दोन मुद्यांवरून तर्कवितर्क
कोल्हापूर/ कृष्णात चौगले :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपतींनी माघारीची मुदत संपण्यापूर्वी शेवटच्या काही मिनिटांत उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिव-शाहूंचा वारसा असलेल्या राजघराण्यातील सदस्यांनी असा तडफडकी निर्णय का घेतला ? असं काय घडलं, लढाईपूर्वीच तलवार म्यान करावी लागली ? असे अनेक प्रश्न जिह्यातील राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत. या माघारीमागे विरोधकांचे दबावतंत्र होते की राजेश लाटकर यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांना पराभवाची भिती होती ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. या नाट्यामय घडामोडींमुळे मात्र ‘उत्तर’मधून महाविकास आघाडीचे चिन्ह गायब झाले असून अपक्ष उमेदवार लाटकर यांना महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूक रणनिती आणि गनिमी काव्याचा वापर करून शत्रूला नामोहरम केले. प्रचंड ताकदीच्या मोघलशाहीला हद्दपार केले. शत्रू ताकदवर आहे म्हणून त्यांनी स्वराज्य रक्षणाची लढाई थांबवली नाही. मग त्यांचेच वारसदार असलेल्या छत्रपती घराण्यातील स्नुषा मधुरिमाराजे यांना कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली असताना त्यांनी अचानकपणे माघार का घेतली ? त्यांच्या मागे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची ताकद असताना तसेच स्वत:चा एक सक्षम गट असताना त्यांनी लढाईपूर्वीच तलवार म्यान का केली ? असा प्रश्न काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून उपस्थित केला जात आहे. या सर्व घडामोडी कशा घडल्या ? त्याच्या पाठीमागे काय हालचाली झाल्या ? याबाबत काहीच माहिती नाही हे कार्यकर्त्यांना सांगताना आमदार सतेज पाटील यांना आपल्या पोराबाळांची शपथ घ्यावी लागत असले तर त्यामागे कोणती अदृष्य शक्ती काम करत असावी ? असे एक ना अनेक प्रश्न काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांतून उपस्थित केले जात आहेत.
मतविभागणीचा धोका की माघारीसाठी दबावतंत्र
अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर ते माघार घेतील असा एक अंदाज होता. त्यामुळे मधुरिमाराजे विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी प्रमुख दुरंगी लढत होईल असे सुरुवातीस चित्र होते. पण माघारी दिवशीच लाटकर ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे काँग्रेसमध्येच मतविभागणी होण्याचा धोका ओळखून मधुरिमाराजेंनी माघार घेतली असावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे विरोधकांकडून माघारीसाठी काही दबावतंत्र झाले आहे का ? असा प्रश्नही जाणकारांतून उपस्थित केला जात आहे.
ज्यांना विरोध, त्यांचाच करावा लागणार प्रचार
मधुरिमाराजे यांच्या माघारीनंतर आता महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार केले आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून ‘राजेश विरुद्ध राजेश’ अशी लढत होणार आहे. या लढतीमध्ये काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना लाटकर यांच्या प्रचारासाठी ताकदीने उतरावे लागणार आहे. पण ज्या काही माजी नगरसेवकांनी लाटकर यांना र्कॉग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर तीव्र विरोध केला होता, त्या नगरसेवकांना आता लाटकर यांचा प्रचार करावा लागणार आहे.
विरोधकांना मिळाला प्रचाराचा प्रमुख मुद्दा
मधुरिमाराजेंच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या घडमोडींमांगे पडद्याआड नेमके काय झाले ? याबाबत जिह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माघार घेतल्याची घटना प्रथमदर्शनी सहजसोपी वाटत असली तरी एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने निवडणूकीतून माघार घेतली असल्याचा संदेश राज्यातच नव्हे तर देशभर पोहोचला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये निवडणुक लढवितानाच अस्थिरता असेल तर निवडणुकीनंतर काय होईल ? हा विरोधकांना प्रचाराचा प्रमुख मुद्दा मिळाला आहे.
सतेज पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न
आमदार सतेज पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना राज्यातील राजकारणाच्या प्रमुख प्रवाहात घेतले आहे. काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उबाठा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी आमदार पाटील यांचे घनिष्ठ संबंध आहेत. तसेच ‘मविआ’कडून विधानसभा निवडणुकीतील ध्येय, धोरणे निश्चित करण्याबरोबरच जिह्यातील प्रचारयंत्रणेची प्रमुख जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे पाटील यांना काही मतदारसंघाच्या बाहेर पडता येऊ नये, पश्चिम महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघात लक्ष घालता येऊ नये यासाठी विरोधकांकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याची .राजकीय वर्तुळात चर्चा आहे.