रंकाळा तलावावर हे चाललंय तरी काय ?
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूरला निसर्गाची मिळालेली मोठी देणगी आहे. शहरालगत इतका विस्तीर्ण तलाव अन्य शहरात क्वचितच आहे. या तलावाने एक काळ कोल्हापूर शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. शेतीसाठी ही रंकाळा तलावाचा आडवा पाट कायम वाहत राहिला. रंकाळा हे कोल्हापूरचे भूषण म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण, आता रंकाळा तलाव अंगात येणे, अंगात आलेल्याने हलगीच्या कडकडाटात घुमत राहणे, काळ्या बाहुल्या, लिंबू त्याचे पूजन करणे आणि निखळ पूजा सोडून अन्य तांत्रिक-मांत्रिक पूजा करण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी रंकाळ्याचा काठ आणि रंकाळा टॉवर ही ठिकाणे अशा विधीसाठी वापरली जाऊ लागली आहेत.
रंकाळा काठावरील ज्या मंदिरासमोर हे विधी होत आहेत, ते मंदिर महादेवाचे आहे आणि अगदी अलीकडे रंकाळाप्रेमींनी ते बांधलेले आहे. त्याला प्राचीन परंपरा नाही आणि असले तांत्रिक-मांत्रिक विधी करण्यासाठी अन्य जिह्यातील भाविक येथे येत आहेत, असल्या विधीत कोल्हापूरचे कोणीही नाही, हे वास्तव आहे. पण अन्य काही जिह्यात रंकाळा तलावाची ही वेगळीच ओळख पसरली आहे आणि असल्या तांत्रिक-मांत्रिक विधी करण्यासाठी बाहेरील जिह्यातील लोक गाड्या भरून येत आहेत. असे प्रकार अलीकडच्या काळातच सुरू झाले आहेत. रंकाळ्dयाची अशी ओळख होणे म्हणजे या नैसर्गिक सुंदर जलस्त्रोताचा अवमान आहे.
सहाव्या-सातव्या शतकापासून रंकाळा तलावाचे अस्तित्व आहे. याच तलावाच्या मूळ जागेतील दगड काढून त्या दगडातून अंबाबाई मंदिराची उभारणी झालेली आहे. रंकाळा तलाव अशाच सहा ते सात दगडाच्या खाणीची मूळ जागा आहे. या तलावाच्या पाण्यावर एक काळ कोल्हापूर जगले आहे. कारण रंकाळा तलावातून कोल्हापूरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. तलावातून पाणी आणि तलावाच्या विस्तीर्ण अशा क्षेत्रातून पूर्वेच्या दिशेला शहरावरून वाहणारे थंडगार वारे वाहत होते आणि त्यामुळेच कोल्हापूरचे आरोग्य सावरत होते.
महापालिकेचे पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी चौपाटीला ऐसपैस असे रूप दिले. अलीकडच्या काळात आणखी अनेक बदल झाले. अर्थात त्यामुळे नैसर्गिक रंकाळा, त्याचे मूळ स्वरूप नक्कीच हरवले आहे. पण तरीही रंकाळा आणि कोल्हापूर हे नाते खूप चांगल्या अर्थाने कायम राहिले आहे. कोल्हापूरची ओळख रंकाळा तलावाचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी स्थिती आहे.
अलीकडे मात्र मंगळवारी आणि शुक्रवारी परजिह्यातून गाड्या भरून भाविक येथे येत आहेत. ते पर्यटन म्हणून नव्हे तर काही धार्मिक विधीसाठी ते येत आहेत. हलगीचा त्यावेळी कडकडाट होतो आहे, चाबकाचे फटकारे आहेत. कोणाच्यातरी अंगात येत आहे आणि रंकाळा चौपाटीच्या अगदी सुरुवातीलाच आता हे सर्वांच्या साक्षीने सुरू आहे.
धार्मिक विधी असल्याने कोणी त्याला आक्षेप घेत नाही. धार्मिक भावना हा ज्याचा-त्याचा भाग आहे. पण रंकाळा चौपाटीवर कधीच असे विधी होत नव्हते. रंकाळा चौपाटीची ओळख अशा तांत्रिक-मांत्रिक पूजेसाठी, अंगात येण्यासाठी नाही, हे परजिह्यातून येणाऱ्या भाविकांना समजावून सांगण्याची हीच वेळ आहे. नाहीतर एकाचे ऐकून दुसरा, दुसऱ्याचे ऐकून तिसरा, असे करत रंकाळ्याची एक नको ती वेगळीच ओळख बाहेर पसरली जाणार आहे.
प्रयोगशाळेने तर रंकाळ्यातले पाणी पिण्यास नव्हे तर चूळ भरण्यासाठीची योग्य नाही, असा अहवाल दिलेला आहे. पण हे परजिह्यातून येणारे भाविक रंकाळ्यातले पाणी तीर्थ म्हणून सोबत नेत आहेत. त्याचा या भाविकांना आरोग्याच्या दृष्टीने त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रंकाळा तलावाच्या काठावर चालणारे हे मांत्रिक, तांत्रिक प्रकार अशा भाविकांना समजावून सांगूनच थांबवण्याची गरज आहे. नाही तर रंकाळ्याची एक नको ती वेगळीच ओळख बाहेर पसरली जाणार आहे.
- रंकाळा संवर्धनाद्वारे कोल्हापूरची वेगळी ओळख
रंकाळा तलावाची जपणूक करण्यासाठी कोल्हापूरकर कायम पुढे आहे. रंकाळा प्रेमींकडून तलावाच्या काठाची श्रमदानाने स्वच्छता केली जात आहे. पाण्यात बाटल्या कागद, कचरा टाकू नये म्हणून अनेक वर्ष ते प्रयत्न करत आहेत. रंकाळ्यात होणारे गणेश मूर्तींचे विसर्जन आज नाही, काल नाही तर 37 वर्षांपूर्वीच कोल्हापूरकरांनी थांबवले आहे. या निमित्ताने कोल्हापूरची एक वेगळी ओळख देशात तयार झाली आहे.