संयुक्त उमेदवारासाठी विरोधी पक्षांनी कसली कंबर
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक : सहकारी पक्षांशी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा संपर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचा संयुक्त उमदेवार उतरविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव ठरविणे आणि सहमती तयार करण्यासाठी आघाडीच्या घटकपक्षांशी संपर्क साधत आहेत. या निवडणुकीत स्वत:च्या दमदार कामगिरीद्वारे सत्तारुढ पक्षाला चुरशीची लढत देता येईल असे इंडी आघाडीचे मानणे आहे.
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीवरून सत्तारुढ रालोआ आणि विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’ने कंबर कसली आहे. रालोआने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांना उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याचा अधिकार दिला आहे. तर विरोधी पक्षांची आघाडी इंडीने देखील उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी चर्चा सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांच्या नावांवर विचारविनिमयासाठी इंडी आघाडीत सामील पक्षांदरम्यान चर्चा सुरू आहे. तर सहमती तयार करण्यासाठी विरोधी पक्षांशी खर्गे संपर्क साधत आहेत.
इंडी आघाडीने उपराष्ट्रपतिपदासाठी संयुक्त उमेदवार उभा करावा यावर घटकपक्षांदरम्यान सहमती आहे. भाजपच्या उमेदवाराच्या घोषणेनंतरच इंडी आघाडीने स्वत:चा उमेदवार निश्चित करावा असे या आघाडीतील एका वर्गाचे मानणे आहे.
धनखड यांचा राजीनामा
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन 21 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. मतदान 9 सप्टेंबरला होईल आणि मतमोजणी देखील त्याच दिवशी होणार आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याचे कारण देत उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता.
विरोधी आघाडीदरम्यान वाढतेय एकता
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’त सामील राजकीय पक्षांदरम्यान एकता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. विरोधी पक्षांची आघाडी बिहारमधील मतदारयादीचे विशेष सखोल पुनर्परीक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या विरोधात एकजूट आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांच्या डिनर पार्टीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. आता खर्गे हे सोमवारी म्हणजेच आज इंडी आघाडीच्या खासदारांसाठी रात्रिभोजनाचे आयोजन करणार आहेत.
संसदेतील संख्याबळ
उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रालोआला स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. 543 सदस्यीय लोकसभेत पश्चिम बंगालच्या बशीरहाटची एक जागा रिक्त आहे, तर 245 सदस्यीय राज्यसभेत 5 जागा रिक्त आहेत. राज्यसभेच्या 5 रिक्त जागांपैकी 4 जम्मू-काश्मीरमधील तर एक पंजाबमधील आहे. दोन्ही सभागृहांची प्रभावी सदस्य संख्या 782 असून विजयासाठी उमेदवाराला 391 मतांची आवश्यकता भासणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये रालोआला बहुमत प्राप्त असल्याने या निवडणुकीत रालोआचे पारडे जड आहे.